येणाऱ्या काही महिन्यांत छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक आयोजित केली जाणार आहे. सध्या येथे काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेसला खाली खेचून आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भाजपाने येथे तयारीदेखील सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीची घोषणा झालेली नसतानाही भाजपाने येथील २१ जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. विशेष म्हणजे छत्तीसगडचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघासाठीही भाजपाने उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपाने येथे बघेल यांचे पुतणे विजय बघेल यांना उमेदवारी दिलेली आहे.

स्थानिक पातळीवरील नेत्यांना उमेदवारी

भाजपाने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण २१ मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर भाजपाचा २०१८ सालच्या निवडणुकीत पराभव झाला होता. या जागांवर यावेळी भाजपाने बहुतांस जागांवर जिल्हा पातळीचे नेते तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्यांना उमेदवारी दिली आहे.

पाटण मतदारसंघात होणार काका-पुतण्याची लढाई

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. बघेल यांच्यावर मात करण्यासाठी भाजपाने मोठी राजकीय खेळी केली आहे. या जागेवर भाजपाने बघेल यांचे पुतणे विजय बघेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवर काका-पुतण्या अशी लढाई होऊ शकते. २००८ सालच्या विधानसभा निवडणुकीत विजय बघेल यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत भूपेश बघेल यांना पराभूत केले होते. २०१८ साली भूपेश बघेल हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाचे मोतीलाल साहू यांना पराभूत केले होते. भूपेश बघेल यांनी पाटण या मतदारसंघातून १९९३ सालापासून आतापर्यंत पाच वेळा विजय मिळवलेला आहे. विजय बघेल यांच्याविरोधात लढताना फक्त एकदाच ते पराभूत झालेले आहेत. भूपेश बघेल यांनी विजय बघेल यांना २००३ आणि २०१३ सालच्या निवडणुकीत पराभूत केले होते.

भाजपाने महत्त्वाच्या नेत्यांना दिली उमेदवारी

भाजपाने विजय बघेल यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ते भाजपाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत. विजय बघेल यांच्याव्यतिरिक्त भाजपाने आदिवासी समाजाचे वरिष्ठ नेते रामविचार नेताम यांना बलरामपूर-रामानुजगंज जिल्ह्यातील रामानुजगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते २००८ साली याच मतदासंघात विजयी झाले होते. रायगडमधील साहू समाजाचे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हा सचिव महेश साहू यांनादेखील भाजपाने खारिसा या मतदारसंघासाठी उमेदवारी दिली आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिक्षणमंत्री उमेश पटेल हे करतात. साहू यांची आमदारकीची ही पहिलीच निवडणूक असेल.

भूपेश बघेल यांची भाजपावर टीका

भाजपाने सार्वजनिक केलेल्या या पहिल्या यादीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपाच्या या यादीतून घराणेशाही प्रतिबिंबीत होते, अशा शब्दांत टीका केली. उदाहरणादाखल त्यांनी विक्रांत सिंह यांचे नाव घेतले. विक्रांत सिंह हे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे पुतणे असून भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपासाठी घराणेशाही नाही का?”

“आमच्या सर्व बैठकांची माहिती सामान्य लोकांना असते. मात्र भाजपाच्या बैठका कधी होतात याची कोणालाची माहिती नसते. माध्यमांनादेखील याची कल्पना नसते. आमच्याकडे लोकशाही पद्धतीने उमेदवाराची निवड केली जाते. ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते, ते तसा अर्ज करू शकतात. भापजाने विक्रांत सिंह यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे आता हा पक्ष रमण सिंह तसेच अभिषेक सिंह (रमण सिंह यांचे पुत्र) यांना तिकीट देणार का? हे पाहुया. घराणेशाही फक्त अन्य पक्षांसाठीच आहे का? भाजपासाठी घराणेशाही नसते का?” असे भूपेश बघेल म्हणाले.