Bjp on congress over Ladakh violence बुधवारी (२४ सप्टेंबर) लडाखमधील लेह शहरात हिंसाचार उसळला. आंदोलकांनी भाजपपाच्या कार्यालयाला आणि सीआरपीएफच्या व्हॅनला आग लावली. या हिंसाचारात किमान चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर लेहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजपाने लडाखमधील हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसचे नगरसेवक त्सेपाग हिंसक जमावाचा भाग असल्याचे दर्शविणारे फोटो आणि व्हिडीओ भाजपाने शेअर केले, ज्याने चर्चांना उधाण आले. लडाखमधील या अशांततेत चार लोकांनी आपला जीव गमावला, तर ९० लोक जखमी झाले. भाजपाने शेअर केलेल्या व्हिडीओत काय? काँग्रेसवर कोणी काय आरोप केले? लडाखमध्ये हिंसाचार भडकण्याचे कारण काय? जाणून घेऊयात…

व्हिडीओमध्ये नक्की काय?

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्यांनी आरोप केला आहे की, अप्पर लेह वॉर्डचे काँग्रेस नगरसेवक फुंतसोग स्टॅन्झिन त्सेपाग हे लडाखमधील अलीकडील दंगलींमध्ये जमावाला भडकवताना दिसले होते. मालवीय यांनी प्रश्न उपस्थित केला, “हीच का ती अस्वस्थता, ज्याची राहुल गांधी स्वप्ने पाहतात?”

“लेह, लडाखमधील सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर आज जेन-झीच्या तरुणांची वेळ आली- ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि भाजपाला त्यांनी वास्तव दाखवून दिले,” असे काँग्रेसशी संबंधित एकाने लिहिले होते. काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच भारतातील युवक आणि जेन-झीला लोकशाही वाचवा, असे आवाहन केले होते आणि निवडणुकीतील कथित गैरव्यवहारांवर टीका केली होती. भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, ते तरुणांना भडकवून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हिंसाचारानंतर लेह जिल्ह्यात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि स्थानिक पोलिसांसह इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) तैनात करण्यात आले. लोकांना संवेदनशील ठिकाणी प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यांवर ‘कॉन्सर्टिना वायर’ (तार असलेली जाळी) लावण्यात आली.

बुधवारी (२४ सप्टेंबर) लडाखमधील लेह शहरात हिंसाचार उसळला. (छायाचित्र-रॉयटर्स)

या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ४८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एका एफआयआरची नोंद झाली आहे. कारगिलच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १६३ अंतर्गत निर्बंध लादले आहेत, त्यात सभा, मोर्चे आणि जमावबंदी घालण्यात आली आहे. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस मोठ्या संख्येने तैनात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

भाजपाच्या आरोपांवर सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया

मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, जाळपोळ आणि रस्त्यांवरच्या संघर्षादरम्यान हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लडाखसाठी राज्य दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी केलेले १५ दिवसांचे उपोषण मागे घेतले. वांगचुक यांनी भाजपाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, काँग्रेसचा लडाखमधील युवकांवर इतका प्रभाव नाही की, ते त्यांना आंदोलनासाठी एकत्र करू शकतील.

“काँग्रेसचा इथे इतका प्रभाव नाही की, ते पाच हजार तरुणांना रस्त्यावर उतरवू शकतील,” असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. वांगचुक पुढे म्हणाले की, काल रुग्णालयात दाखल झालेले दोन लोक त्यांच्या गावचे असल्यामुळे त्या नगरसेवकाने रागाने नक्कीच काही केले असावे; पण काँग्रेसकडे युवकांना प्रभावित करण्याची ताकद नाही, असे ते म्हणाले.

सरकारने काय म्हटले?

गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांना आपल्या चिथावणीखोर भाषणातून जमावाला भडकवल्याबद्दल जबाबदार धरले आहे. लडाखसाठी राज्याचा दर्जा आणि घटनात्मक सुरक्षा उपायांची मागणी करीत १५ दिवसांच्या उपोषणावर असलेले वांगचुक यांनी काल लेहमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर लगेचच आपले उपोषण मागे घेतले. सरकारने म्हटले आहे की, वांगचुक यांनी उपोषणादरम्यान लोकांना भडकवण्यासाठी नेपाळमधील अलीकडील ‘जेन-झी’ (Gen Z) आंदोलनाचा उल्लेख केला.

“अनेक नेत्यांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करूनही, त्यांनी ‘अरब स्प्रिंग-शैली’च्या आंदोलनाचा आणि नेपाळमधील ‘जेन-झी’ आंदोलनाचा उल्लेख करून लोकांची दिशाभूल करीत ते सुरूच ठेवले,” असे गृह मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, वांगचुक यांच्या चिथावणीखोर भाषणांनी प्रेरित झालेल्या जमावाने उपोषणाच्या ठिकाणाहून बाहेर पडून एका राजकीय पक्षाच्या कार्यालयावर, तसेच सीईसी (मुख्य कार्यकारी परिषदेचे), लेह यांच्या सरकारी कार्यालयावर हल्ला केला. “वांगचुक यांनी केलेल्या चिथावणीखोर विधानांमुळेच जमाव हिंसक झाला,” असे गृह मंत्रालयाने म्हटले.

लडाखमधील हिंसक आंदोलनात भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आणि त्याला आग लावण्यात आली, तसेच अनेक वाहने जाळण्यात आली. दूरवरून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.