राम भाकरे

नागपूर : निवडणुका कोणत्याही असोत, त्या जवळ आल्या की, राजकीय पक्ष सक्रिय होतात. पक्ष जर सत्ताधारी असेल तर मग निवडणूकपूर्व काळात येणारे सण, उत्सव त्यांच्यासाठी पर्वणीच ठरते. नागपुरात पुढच्या काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे पॅकेजच नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहे. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

हेही वाचा… भाजपच्या ‘मिशन बारामती’ची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीपासून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका विविध कारणांमुळे लांबल्या असल्या तरी भाजपची तयारी मागच्याच वर्षीपासून सुरू झाली. खुद्द गडकरी यांच्या नेतृत्वातच या निवडणुकीची तयारी केली जात असून त्यासाठीच्या तयारीचा एक भाग म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. शहरात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या पुढाकारातूनच खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती स्थापन झाली. या समितीने यंदा गणेशोत्सवावर लक्ष केंद्रित केले. समितीकडून सार्वजनिक मंडळांना नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून दिले जात आहेत. त्यात नाटक, कविसंमेलन, कीर्तन व तत्सम कार्यक्रमांचा समावेश असतो. आतापर्यंत १५० हून अधिक मंडळांकडे अशाप्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांसाठी स्थानिक सांस्कृतिक मंडळे, संस्था, कलावंतांची मदत घेण्यात आली. या संस्थांशी समन्वय साधण्याची जबाबदारी संस्कार भारतीकडे आहे. कलावंतांच्या मानधनाचा खर्च समिती करते. ज्या मंडळाकडे हा कार्यक्रम होतो तेथे खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सौजन्याने असा फलक लावला जातो. त्या भागातील भाजपचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते जास्तीत जास्त मंडळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे म्हणून प्रयत्नशील असतात. या उपक्रमामुळे मंडळांना नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ झाला. त्यामुळे तेही खूश आहेत.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीला अशोक चव्हाणांच्या हजेरीमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चेला अर्धविराम

दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे खासदार महोत्सव समितीकडून सांगण्यात आले.