बारामतीत जोर लावणाऱ्या भाजपकडे उमेदवाराची वानवा | BJP still searching candidate for baramati Lok Sabha election print politics news amy 95 | Loksatta

बारामतीत जोर लावणाऱ्या भाजपकडे उमेदवाराची वानवा

भाजपकडे सध्यातरी बारामतीसाठी उमेदवारांची वानवा आहे. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने बारामतीसाठी कायम दुबळा उमेदवार उभा करून पवारांसाठी वाट मोकळी करून दिलेली आहे.

बारामतीत जोर लावणाऱ्या भाजपकडे उमेदवाराची वानवा
बारामतीत जोर लावणाऱ्या भाजपकडे उमेदवाराची वानवा

सुजित तांबडे

बारामतीवर कब्जा करण्यासाठी भाजपने ‘मिशन बारामती’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा आरंभ करून आगामी लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपुढे कडवे आव्हान उभे करण्याचे मनसुबे रचले आहेत. मात्र, आतापासूनच प्रचाराची राळ उडविणाऱ्या भाजपने बारामतीमध्ये उमेदवार कोण असेल, हे आतापर्यंत गुलदस्त्यातच ठेवले आहे. ऐनवेळी वलयांकित उमेदवार उभा करून धक्का देण्याचे भाजपने ठरविले असले, तरी आयात उमेदवाराला मतदार स्वीकारतील का, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा >>> गोव्यात विजय सरदेसाईंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? राजकीय वर्तुळात चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. आज (२४ सप्टेंबर) या दौऱ्याची सांगता होणार आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघ आता चर्चेत आला आहे. सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र उमेदवार कोण असेल, याबाबत गुप्तता पाळली आहे.

हा मतदार संघ कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राहिला आहे. १९८४ पासून या मतदार संघावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचेच वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व कायमचे संपविण्यासाठी भाजपने ‘मिशन बारामती’ ही मोहीम आखली असली, तरी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण, हे भाजप जाहीर करायला तयार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षबांधणी आणि पक्षवाढीसाठी ही मोहीम असल्याचे भाजपची नेतेमंडळी सांगत आहे. ऐन निवडणुकीमध्ये दिल्ली पातळीवरून कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे दौऱ्यावर आलेल्या सीतारामन यांनी जाहीर केले आहे. मात्र, उमेदवार कोण, हा गूढ प्रश्न कायम आहे.

हेही वाचा >>>पश्चिम विदर्भात राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलीत काय ?

भाजपने बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे. निवडणूक जवळ आल्यावर धक्कातंत्राचा अवलंब भाजपकडून केला जाण्याची शक्यता वर्तविली जाते. स्थानिक पातळीवर भाजपकडे पवार कुटुंबीयांना टक्कर देत आव्हान उभे करणारा उमेदवार सध्यातरी नाही. कारण या मतदार संघातील खडकवासला वगळता अन्य ठिकाणी भाजपला फारसा जनाधार नाही. ‘मिशन बारामती’ ही मोहीम म्हणजे जनाधार निर्माण करण्यासाठी भाजपची चाललेली धडपड आहे.

भाजपकडे सध्यातरी बारामतीसाठी उमेदवारांची वानवा आहे. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने बारामतीसाठी कायम दुबळा उमेदवार उभा करून पवारांसाठी वाट मोकळी करून दिलेली आहे. असे उमेदवार पवार कुटुंबीयांसमोर तग धरू शकेलेले नाहीत. आजपर्यंत अनेकदा या मतदार संघात भाजपच्या उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.

हेही वाचा >>> ठरलं! अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, राजस्थानचं नेतृत्व कोणाकडे?

या मतदार संघातून शरद पवार यांनी पहिल्यांदा १९८४ मध्ये समाजवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यांच्यविरोधात काँग्रेसचे शंकरराव पाटील उभे होते. त्यावेळी पवार हे सुमारे एक लाख ४० हजार मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये पवार यांचे मताधिक्य हे वाढतच गेले. समाजवादी काँग्रेस ही पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर पवार हे १९८८ मध्ये राज्यात परत येऊन मुख्यमंत्री झाले. त्यामुळे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार हे उमेदवार नव्हते. त्यावेळी काँग्रेसचे शंकरराव पाटील हे निवडून आले. १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात भाजपने प्रतिभा लोखंडे यांना उमेदवारी दिली होती. अजित पवार हे तब्बल तीन लाख ३६ हजार मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतरच्या १९९६ च्या निवडणुकीत पुन्हा अजित पवार आणि लोखंडे यांच्यात लढत झाली. तेव्हा अजित पवार यांचे मताधिक्य एक लाख ६० हजार होते. १९९८ च्या निवडणुकीत शरद पवार हे परत दिल्लीतील राजकारणात सक्रिय झाल्याने काँग्रेसकडून निवडणूक लढविली. तेव्हा त्यांच्याविरोधात भाजपने विराज काकडे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पवार यांचे मताधिक्य दोन लाख ६८ हजार होते. १९९९ मध्ये पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्याविरोधात भाजपने लोखंडे यांना उमेदवारी दिली. पवार यांनी दोन लाख ९८ हजार मताधिक्याने विजय साकारला. २००२ च्या निवडणुकीत पवार यांच्या समोर भाजपने पृथ्वीराज जाचक यांना तिकीट दिले. या निवडणुकीत पवार यांनी विक्रमी चार लाख २२ हजार ९७५ मताधिक्याने विजय साकारला.

हेही वाचा >>> बाळासाहेब ठाकरे ४६ वर्षे तर करुणानिधी ५० वर्षापेक्षा अधिक पक्षाचे प्रमुख

या निवडणुकीनंतर पवार यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक न लढविता सुप्रिया सुळे यांना २००९ मधील लोकसभा निवडणुकीत उभे केले. तेव्हा भाजपने कांता नलावडे यांना उभे केले. मतदारांनी सुळे यांना भरघोस मतदान केले. त्यामुळे सुळे यांना तीन लाख ३६ हजार मताधिक्य मिळाले होते. मात्र, हे मताधिक्य मागील दोन निवडणुकांमध्ये कमी झाले. २०१४ मध्ये भाजप पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली. जानकर यांना ६९ हजार ८४३ मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या २०१९ निवडणुकीत सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात लढत झाली. सुळे यांचा या निवडणुकीत एक लाख ५५ हजार मतांनी विजय झाला. मात्र, खडकवासला विधानसभा मतदार संघातून त्यांना मिळालेली कमी मते हा काळजीचा विषय झाला.

या पार्श्वभूमीवर भाजपला बारामतीमध्ये बदल घडू शकतो, याची जाणीव झाली आहे. ‘मिशन बारामती’ हा त्याचाच एक भाग आहे. मात्र, भाजपचा उमेदवार कोण असेल, यावर बारामतीत बदल घडणार की नाही, हे स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ३२ जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य?; बहुमताने सरकार स्थापन करण्याचाही अमित शाहांना विश्वास!

संबंधित बातम्या

प्रवीण दरेकर – राजकीय वाऱ्यांची दिशा हेरणारे व्यक्तीमत्त्व
प्रसाद लाड : कायम नेत्यांच्या मर्जीत राहण्याचे कसब
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ‘भाऊ’ की ‘भैय्या’? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर चर्चेला उधाण
शिंदे समर्थक आमदार गोगावले यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग
टीआरएसचे सर्व समुदायांपर्यंत पोचण्यासाठी आत्मीय संमेलनाचे आयोजन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“गेली अनेक वर्ष…” प्रथमेश परबच्या वाढदिवशी त्याच्या कथित गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत
FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या गोलवर रोनाल्डोचा दावा? Video शेअर करत नेटिझन्सने केले ट्रोल
विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना भुजबळांनी करुन दिली बाळासाहेबांची आठवण; म्हणाले, “ते शेवटपर्यंत…”
Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय