संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही राजकीय पक्षाचा कायमस्वरुपी किंवा तहहयात अध्यक्ष नेमणे हे लोकशाही विरोधी असून, ठराविक कालावधीत पक्षाच्या अंतर्गत निवडणुका झाल्याच पाहिजेत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने पक्षाची कायमस्वरुपी सूत्रे आपल्याच हाती ठेवणाऱ्या नेत्यांना चपराक बसली आहे.युवाजना श्रमीका रयतू काँग्रेस म्हणजेच वायएसआर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची कायमस्वरुपी किंवा तहहयात अध्यक्षपदी जुलै महिन्यात निवड करण्यात आली होती. याबद्दल निवडणूक आयोगाने पक्षाकडे विचारणा केली होती. यावर पक्षाने दिलेल्या उत्तरात काहीच स्पष्ट करण्यात आले नव्हते. पण पक्षाच्या अध्यक्षपदी जगनमोहन रेड्डी यांची तहहयात अध्यक्षपदी निवड करण्याची योजना असल्याचे स्पष्ट झाले होते.

यावरून निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षपदी कायमस्वरुपी किंवा तहहयात अध्यक्षपदी निवड करता येणार नाही, असे स्पष्टपणे बजावले आहे. राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात यावी, अशी निवडणूक आयोगाने तरतूद केली आहे. पक्षांतर्गत निवडणुकांचा कायदा नाही पण टी. एन. शेषन हे निवडणूक आयुक्त असताना त्यांनी पक्षांतर्गत निवडणुकांचा प्रशासकीय आदेश बजावला होता, असे निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : कट्टर विदर्भवाद्यांनीच प्रशांत किशोर यांच्या बैठकीकडे फिरविली पाठ

विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे पक्षाचे नेतृत्व केले आहे. पण निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर अतंर्गत निवडणुकांची औपचारिकता पार पाडली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९६६ मध्ये शिवसेना स्थापन झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे २०१२ पर्यंत शिवसेनेचे प्रमुख होते. तब्बल ४६ वर्षे त्यांनी संघटनेचे नेतृत्व केले. मध्यंतरी काही घटनांनंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख पद सोडण्याचा निर्णय जाहीर करताच शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ बाहेर गर्दी करून निर्णयाचा फेरविचार करण्यास भाग पाडले होते. तमिळनाडूतील द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी पक्षाचे ५० वर्षांपेक्षा अधिक काळ नेतृत्व केले. सर्वाधिक काळ पक्षाचे नेतृत्व करण्याचा त्यांचा विक्रमच मानला जातो.

हेही वाचा : शिवसेनेमागे लागणार चौकशांचे शुक्लकाष्ठ ; मुंबईसाठी भाजपची निवडणूक रणनीती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे १० जून १९९९ पासून आजतागायत शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण पक्षांतर्गत निवडणुकांमधूनच पवारांची निवड केली जाते. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात पवारांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याकडे अण्णा द्रमुकची जवळपाळ तीन दशके सूत्रे होती. मुलालयमसिंह यादव, प्रकाशसिंग बादल, लालूप्रसाद यादव, डॉ. फारुक अब्दुल्ला आदींनी पक्षाची सूत्रे दुसऱ्या पिढीकडे सोपविली असली तरी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत या नेत्यांचाच शब्द अंतिम असतो. सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री व सिक्कीम डेमाॅक्रेटिक पक्षाचे संस्थापक पवनकुमार चामलिंग हे गेली तीन दशके पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. यापैकी सलग २५ वर्षे ते मुख्यमंत्री होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointing permanent president of the party anti democratic role of election commission balasaheb thackeray karunanidhi print politics news tmb 01
First published on: 24-09-2022 at 13:11 IST