भंडारा : भाजपच्या पहिल्या यादीत भंडारा जिल्ह्यातील तीनपैकी एकाही मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला असून उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महायुतीत जिल्ह्यातील तीनपैकी केवळ एक जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात आहे. साकोली विधानसभा भाजपच्या वाट्याला, तर भंडारा शिवसेना शिंदे गटाकडे आणि तुमसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

सध्या जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाही. तुमसर वगळता साकोली आणि भंडाऱ्याच्या तिकिटासाठी भाजपमधून इच्छुकांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. भाजपचे जिल्हा महामंत्री आशू गोंडाणे यांच्यासह अनुप ढोके हे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नावाची चर्चा असून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : ठाणे मतदारसंघ भाजपकडे कायम राहिल्याने शिंदे गटात अस्वस्थता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमसर विधानसभा मतदारसंघातही उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होती, मात्र राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे हेच महायुतीचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. साकोली मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. माजी आमदार बाळा काशीवार यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, सोमदत्त करांजेकर, विजया नंदुरकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र पहिल्या यादीत कुणाचेही नाव आले नाही. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येथील विद्यमान काँग्रेस आमदार नाना पटोले यांना लढत देण्यासाठी भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर, परिणय फुके यांना त्यांच्या मर्जीतील उमेदवार अजूनही गवसला नसल्याचे सांगितले जाते.