एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ मंदिरात लोटांगण घालून वंदन करण्यासाठी असंख्य भाविकांची मांदियाळी असते. परंतु याच अक्कलकोट तालुक्यातील राजकारणातही ‘ घालीन लोटांगण, करीन वंदन ‘ चे प्रयोग होत आहेत. कधी रक्तरंजित तर कधी तडजोडीच्या मतलबी व्यवहारामुळे चर्चेत राहिलेल्या येथील राजकारणावर भाजपची असलेली मजबूत पकड आणि गलितगात्र झालेल्या विरोधकांची अवस्था पाहता पाहता याच पक्षाचा अभेद्य गड म्हणून अक्कलकोटची ओळख प्रस्थापित झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालपर्यंत भाजपच्या स्थानिक नेत्यांशी दोन हात करूनही सपशेल निराशाच पदरी पडल्यामुळे भविष्यात आणखी अडचण नको म्हणून की काय, काही विरोधकांनी भाजपसमोर लोटांगण घालण्याची भूमिका पत्करली आहे. धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याचे अध्वर्यू दत्ता शिंदे यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची साथ सोडून आणि उपमुख्यमंत्री अजित पवारप्रणीत राष्ट्रवादी काँग्रेसची चोखळलेली वाट सोडून भाजपचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक वजनदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी पायघड्या अंथरल्याचे पाहिल्यानंतर ‘ जिस की लाठी उसकी भैंस ‘ हाच व्यवहार अक्कलकोटच्या राजकारणात लागू पडतो, हे दिसून येते.

आणखी वाचा-भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर जेडीएसमध्ये खदखद, युती करताना अंधारात ठेवल्याचा बड्या मुस्लीम नेत्याचा आरोप!

अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश भाग कन्नड भाषकांचा असून वीरशैव लिंगायतांसह इतर वीरशैव ओबीसी मुस्लीम, मराठा, धनगर, लमाण, दलित आणि ओबीसींचा प्रभाव या तालुक्यात आहे. वर्चस्वाच्या लढाईत कधी काँग्रेस तर कधी भाजप बाजी मारतो. अलिकडे भाजपने आपली पकड अधिक मजबूत केली असताना त्या तुलनेत काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे. याच तालुक्यातील बलभीम शिंदे हे एकेकाळी भाजपमध्ये राहिलेले आणि पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळलेले. नंतर ते राजकारणातून बाहेर फेकले गेले असता त्यांचे बंधू भगवान शिंदे आणि उद्योजक पुत्र दत्ता शिंदे यांनी दहा-बारा वर्षांपूर्वी काँग्रेसचे अक्कलकोट तालुक्यातील सर्वेसर्वा, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्याशी व्यावसायिक संबंध जुळवून त्यांच्याच दुधनी गावाजवळ मातोश्री लक्ष्मी शुगर नावाचा साखर कारखाना भागीदारीतून उभारला होता. त्यासाठी बँकांकडून अर्थसाह्य घेताना शिंदे कुटुंबीयांनी स्वतःची मालमत्ता तारण ठेवली होती. परंतु तो कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आणि थकीत बँक कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे इकडे शिंदे कुटुंबीयही आर्थिक कचाट्यात सापडलेले. त्यामुळेच नऊ-दहा वर्षांपूर्वी शिंदे कुटुंबीयांनी स्वतःच्या व्यावसायिक सोयीसाठी धोत्रीजवळ गोकुळ साखर कारखाना उभारला होता. पुढे म्हेत्रे कुटुंबीयांशी पूर्वीसारखे मधूर संबंध न राहिल्यामुळे पर्यायी राजकीय आशीर्वाद मिळविण्यासाठी गोकुळ साखर कारखान्याचे तरूण सर्वेसर्वा दत्ता शिंदे हे कौशल्य वापरत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आले. त्यांची धडपड आणि जिद्द पाहून अजित पवार यांनीही ताकद देत, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे कर्ज मिळवून दिले. अन्य एका बँकेचेही कर्ज मिळाल्याने दत्ता शिंदे यांचा हुरूप वाढला. त्यातूनच त्यांनी शेजारच्या नळदुर्गचा (ता. तुळजापूर) बंद पडलेला तुळजाभवानी सहकारी साखर कारखानाही भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला. इकडे आपण अजित पवार यांच्या जवळ आहोत, हे दाखविण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे व अन्य मंत्र्यांना गोकुळ कारखान्यावर आमंत्रित केले. एव्हाना, अक्कलकोट भागात पक्षाला मजबूत पाय रोवण्यासाठी दत्ता शिंदे यांच्यासारख्या युवक नेत्याची पक्षालाही गरज वाटत होती.

आणखी वाचा-ठाण्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम शिवसेनेकडून हायजॅक

या पार्श्वभूमीवर दत्ता शिंदे यांची राजकीय महत्वाकांक्षाही काही थांबत नव्हती. त्यांना आमदारकीचे स्वप्नही पडू लागले. आमदार होण्याची ही सुप्त इच्छा त्यांनी कुरनूरसारख्या काही गावांमध्ये जाहीरपणे बोलून दाखवतानाच आपले प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आव्हानही देण्यासही सुरूवात केली. दरम्यान, अक्कलकोट कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे यांनी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या सोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. अक्कलकोटच्या राजकारणात जेथे कल्याणशेट्टी, तेथे तेथे दत्ता शिंदे ताकदीने पुढे येणार, असे उघडपणे आव्हान दत्ता शिंदे यांनी दिले खरे; परंतु अक्कलकोट कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यामुळे शिंदे कुटुंबीयांचे धाबे दणाणले. कारण पुढे वाढून ठेवलेले संकट त्यांना माहीत होते. योगायोगाने त्याच सुमारास बंद पडलेल्या मातोश्री लक्ष्मी साखर कारखान्याच्या कर्जवसुलीसाठी, तारण मालमत्तेचा बँकांनी लिलाव पुकारला. यात शिंदे यांच्याही मालमत्तेचा लिलाव होणार असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. यातून सहीसलामत वाचण्यासाठी त्यांना एकच पर्यात समोर दिसत होता, तो म्हणजे आमदार कल्याणशेट्टी यांना शरण जाणे. त्यासाठी त्यांनी हर त-हेने प्रयत्न केले तरी सुरूवातीला चाणाक्ष आमदार कल्याणशेट्टी यांनीही त्यांना प्रतिसाद न देता तिष्ठत ठेवले. तेव्हा कल्याणशेट्टी यांचे सहकारी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची मदत घेतली. पवार यांनीही पुरेपूर लाभ उठवत अखेर दत्ता शिंदे आणि कल्याणशेट्टी यांच्यात समझोत्यासाठी मध्यस्थी केली. त्यानुसार लगेचच गोकुळ साखर कारखान्याच्या नवव्या अग्निप्रदीपन सोहळा आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होण्याचा घाट घातला आणि कारखान्यावर त्यांच्या जंगी स्वागतासाठी पायघड्या अंथरल्या. यावेळी दत्ता शिंदे हे आमदार कल्याणशेट्टी यांचे गुणगाण करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. यातून ‘ सचिनदादा आम्हाला वाचवा ‘, हीच याचना झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र यात दत्ता शिंदे यांची राजकीय कोंडी झाली असली तरी दुसरीकडे त्यांचे समर्थकांची कल्याणशेट्टी यांचे नेतृत्व मानण्याची मानसिकता दिसत नाही. भाजपअंतर्गत स्थानिक राजकारणात आमदार कल्याणशेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेणारे दिवंगत माजी आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या कुटुंबीयांसह अन्य मंडळींनीही कल्याणशेट्टी यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे बोलले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps strong grip on akkalkot some opponents have taken position of prostrate front of bjp print politics news mrj
First published on: 02-10-2023 at 11:03 IST