Kranataka Assembly Election 2023 : “हिंदू आणि मुस्लीम यांनी भाऊ-बहीण या नात्यांप्रमाणे एकमेकांशी वागावे आणि हिजाब, हलालवरून जो वाद सुरू आहे, तोदेखील अनावश्यक आहे,” अशी भूमिका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी मांडली आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना कर्नाटकमध्ये ज्या विषयांवरून वादंग सुरू आहेत, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न येडियुरप्पा यांनी केलेला दिसतो. मात्र यामुळे भाजपाकडून गेल्या काही काळापासून जे मुद्दे रेटले जात होते, त्यांवर एक प्रकारे घरचा अहेर देण्याचे काम येडियुरप्पा यांनी केले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “हिजाब, हलालसारख्या मुद्द्यांना मी महत्त्व देत नाही. माझ्या मते हिंदू आणि मुस्लीम एकमेकांचे बांधव आहेत. सुरुवातीपासून माझी हीच भूमिका राहिलेली आहे. जे अनावश्यक वाद उपस्थित केले गेले, त्यांना मी पाठिंबा देत नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येडियुरप्पा यांचे हे विधान १० मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी आलेले असल्यामुळे त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपाने पहिल्याच यादीत उडीपी विधानसभा मतदारसंघातून यशपाल सुवर्णा यांना तिकीट दिले आहे. सुवर्णा यांनीच हिजाबला महाविद्यालयात बंदी घालावी, अशी मागणी पुढे केली होती. ज्यामुळे ते उडीपी जिल्ह्यात हिंदू आणि मुस्लीम समुदायांमध्ये मोठे वादाचे कारण बनले होते.

हे वाचा >> भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, एकाही मुस्लीम नेत्याला तिकीट नाही, येडियुरप्पांच्या समर्थकांना ‘अच्छे दिन’

हिजाबसोबतच हलाल मांसाचाही मुद्दा पुढे करण्यात आला होता. उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी कर्नाटकमधील उगडी या नवीन वर्षाच्या स्वागत समारंभावेळी हलाल मांसावर बहिष्कार घातला होता. तसेच मंदिराशी निगडित उत्सावामध्ये मुस्लीम विक्रेत्यांना सहभागी होण्यास विरोध केला होता. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सी.टी. रवी यांनी याचे समर्थन करत असताना याला ‘अर्थकारणाचा जिहाद’ म्हटले होते. गेल्या काही काळापासून कर्नाटकमधील भाजपाची भूमिका ही हिंदू-मुस्लीम वादाच्या अवतीभोवती फिरताना दिसली. तर काँग्रेस आणि जेडीएसकडून भाजपाच्या अनेक भूमिकांवर वेळोवेळी टीका करण्यात आली. भाजपा विभाजनकारी राजकारण करत असून त्यांना मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे, असा आरोप विरोधकांनी केला.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना चर्चकडून कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले असूनही ते उपस्थित राहिले नाहीत, याबाबत प्रश्न विचारला असता येडियुरप्पा म्हणाले, “मी ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदायांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आलो आहे. तसेच इतर समाजांच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतो. बोम्मईसुद्धा अशा कार्यक्रमांना जातात. जर चर्चने त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते, तर त्यांनी अशा कार्यक्रमांना हजेरी लावायला हवी होती. अशा कार्यक्रमांना महत्त्व दिले गेले पाहिजे.”

८० वर्षीय येडियुरप्पा हे सध्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर गेलेले आहेत. ते सध्या भाजपा संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. तिकीटवाटपावरून भाजपामध्ये बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, बंडखोरांचा पक्षाला काहीही त्रास होणार नाही. काही मतदारसंघांत बंडखोर पक्षातून गेल्यामुळे थोडासा फरक नक्कीच जाणवेल, पण पक्षाच्या एकूण निकालावर त्याचा फारसा प्रभाव होणार नाही.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांनी आपला मुलगा बी. वाय. विजयेंद्र याचा शिकारीपुरा मतदारसंघातून नक्कीच विजय होईल, असाही विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, केंद्राच्या कल्याणकारी योजना आणि माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले सामाजिक विकासाचे निर्णय, तसेच बोम्मई यांनी केलेल्या कामामुळे भाजपाचा एकहाती विजय होईल, असेही ते मुलाखतीत म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bs yediyurappa says hijab halal issues not necessary hindus and muslims should live like brothers kvg
First published on: 15-04-2023 at 15:41 IST