नागपूर : पक्षाच्या नेत्यांवरच कठोर शब्दात टीका करणारे डॉ. आशीष देशमुख यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात प्रबळ प्रतिस्पर्धी राहणार नाही अशी चतुर राजकीय खेळी केली आहे. रविवारी देशमुख यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला. यानिमित्ताने मार्च महिन्यात झालेल्या पुणे जिल्ह्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आठवण झाली. या निवडणुकीत बालेकिल्ल्यातच भाजपला काँग्रेसने धूळ चारली. त्यावेळी देशमुख काँग्रेमध्ये होते व त्यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना नागपुरातील दक्षिण-पश्चिम या फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघात कसब्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा आधार होता. त्यावेळी देशमुख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध निवडणूक लढवून त्यांचे मताधिक्य कमी केले होते. देशमुखांची प्रतिक्रिया याच अनुषंगाने होती. आता फडणवीस यांनी देशमुखांनाच पुन्हा पक्षात घेऊन कसब्याच्या पुनरावृत्तीची शक्यताच संपुष्टात आणली. यामुळे आता काँग्रेसला त्यांच्या विरोधात नवा उमेदवार शोधावा लागेल शिवाय कुणबीबहुल या मतदारसंघात भाजप देशमुखांचा काँग्रेस विरोधात योग्य वापर करून घेण्याची शक्यता आहे. पण देशमुख यांच्या राजकीय भवितव्याचे काय? असा प्रश्न उरतो. त्याचे उत्तर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खुद्द फडणवीस यांनीच देऊन टाकले. हेही वाचा - सिद्धरामय्या यांची सांगलीत सभा, काँग्रेसची लोकसभेची तयारी सुरू देशमुख आता पक्ष सोडणार नाहीत, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार आहेत, संयम आणि सबुरी ते ठेवणार आहेत, असे उभय नेत्यांनी सांगून देशमुख यांच्या कामाची दिशा पुढे काय असेल हे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात भाजप देशमुखांचा नुसताच वापर करणार की त्यांच्या राजकीय भवितव्याला उभारी देणार हे काळच ठरवणार आहे. सध्यातरी दक्षिण-पश्चिममधील कसब्याच्या पुनरावृत्तीची शक्यता संपुष्टात आलेली आहे हेच देशमुखांच्या भाजप प्रवेशाचे फलित आहे.