कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार, केंंद्रीय मंत्री कपील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात कडवी लढत होण्याची चिन्हे असली तरी मुरबाड, शहापूर, भिंवंडी ग्रामीण, शहर, वाडा पट्ट्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी मतदारांच्या बळावर रिंगणात उतरलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश साबळे यांच्या उमेदवारीमुळे भिवंडीतील लढत तिरंगी होईल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

पाटील, म्हात्रे हे आगरी समाजाचे नेते आहेत. सांंबरे हे कुणबी समाजाचे नेते आहेत. त्यांंना वंचित बहुजन आघाडीने पाठिंंबा दिला आहे. मागील दहा वर्षांपासून कपिल पाटील हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. संपूर्ण मतदारसंघात लोकसंपर्क ठेवण्यात पाटील यांना फारसे यश आले नसल्याच्या तक्रारी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून पाटील ओळखले जातात. मुरबाड, शहापूर भागात पाणी पुरवठा, विकासाची कामे झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. शहापूर तालुक्याच्या निम्म भागात नेहमीच पाणी टंचाई उग्र रूप धारण करते. हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी खासदारांनी प्रयत्न केले नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा वातावरणामुळे कपिल पाटील यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही असे सुरुवातीला चित्र होते.

हेही वाचा – मतदानात महिला पुढे; मग उमेदवारीत मागे का? महिलांना उमेदवारी देण्यात केरळमधील राजकीय पक्षांच्या उदासीनतेचे कारण काय?

महाविकास आघाडीकडून एकच सर्व मान्य उमेदवार दिला जावा असे प्रयत्न सुरुवातीच्या काळात दिसत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यावरून घडलेले मतभेदांचे दर्शन पाहता पाटील यांना हे सर्व वातावरण पथ्यावर पडू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणाहून सुरेश मात्रे उर्फ बाळा मामा यांना उमेदवारी दिली आहे. पक्ष बदलण्यात माहीर असणारे बाळा मामा यांच्याविषयी राष्ट्रवादी पक्षातील एका मोठ्या गटातच अविश्वासाचे वातावरण आहे. काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. या पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेचे संस्थापक नीलेश सांंबरे यांंनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ही लढत आता तिरंगी होईल असे चित्र आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या आघाडीवर जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सांबरे हे कार्यरत राहिले आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी हवी होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान सांबरे यांनी या भागात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसने मात्र त्यांना येथून उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे दुखावलेल्या सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांबरे हे कुणबी समाजातली असून कपिल पाटील आणि बाळ्या मामा हे दोन आगरी उमेदवार आहेत. यामुळे कुणबी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सामरे यांच्याकडून केला जातं आहे. या भागातील काँग्रेस नेते सुरेश टावरे यांनी उघडपणे बाळा मामा यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी टावरे यांना मदत केली नव्हती. त्याचा राग काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेसकडून किती साथ मिळते यावर बाळ्या मामा यांचे आव्हान ठरणार आहे.

हेही वाचा – कन्हैया कुमारला काँग्रेसने बिहारऐवजी दिल्लीतूनच उमेदवारी का दिली?

महाविकास आघाडीच्या उमेदवाराची लढाई ही कपील पाटील यांच्याशी नाही तर ती मोदी यांच्या विचाराशी आहे. संंविधान बचावासाठी लढाई आहे. अपक्ष उमेदवार हा फक्त राजकीय स्वार्थासाठी लढत आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही विषय नाही. त्यामुळे आमच्यासमोर सांंबरे हा विषयच नाही. महेश तपासे प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस. (शरद पवार गट)

मागील अनेक वर्ष ठाणे, पालघर भागात जिजाऊ संघटनेने शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्यात काम केले आहे. त्या बळावर आम्ही भिवंडी लोकसभा निवडणुकीत नक्कीच अग्रभागी असणार आहोत. पाटील, बाळ्या मामा यांनी किती लोकहिताची कामे केली आहेत ते आता निवडणुकीत दिसेल. सुदर्शन पाटील शहापूर तालुका अध्यक्ष, जिजाऊ संघटना.

विकास कामांच्या विषयातून मंत्री कपील पाटील आपले अस्तित्व सिद्ध करणार आहेत. त्यांंच्याशी कोणीही लढत देऊ शकत नाही. – नरेंद्र पवार माजी आमदार, भाजप कल्याण पश्चिम.