जळगाव : हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाशी असलेल्या संबंधाच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी झडत आहेत. लोढाकडील एका सीडीत महाजन यांच्याशी संबंधित माहिती दडल्याचा दावा करुन ती मिळाल्यावर बरेच काही घडले असते, असे विधान खडसे यांनी केले आहे. दुसरीकडे, अनेक वर्षांपासून शोधत असलेली सीडी तुम्हाला अजून कशी सापडली नाही, असा टोला हाणत मंत्री महाजन यांनीही खडसे यांना डिवचले आहे.

मंत्री महाजन यांनी लोढा हा खडसे यांना गुलाबपुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमात टाकले होते. त्यानंतर खडसे यांनीही छायाचित्रातील गाडीत मीच बसलो आहे आणि लोढा रस्त्यात फुले देऊन माझेच स्वागत करत आहे, हे मान्य केले. मात्र, तेव्हा लोढा मला महाजन यांच्याशी संबंधित सीडी देणार होता. ज्यामुळे पुढे जाऊन महाजन उघडे पडले असते, असा गौप्यस्फोट केला. महाजन यांची माहिती सीडीत असल्यामुळेच पोलीस वारंवार लोढाच्या घराची झडती घेत असल्याचा दावाही खडसे यांनी नव्याने केला आहे.

महाजन यांनी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून लोढा याची त्यावेळी मनधरणी केली. त्यासाठी त्याचे मुंबईतील एका हॉटेलमध्ये तीन महिने पाय दाबले. कोणतेच पुरावे माझ्या हाती लागू दिले नाही. ती सीडी मिळाली असती तर बरेच काही घडले असते, असे खडसे यांनी सांगितले.

यापूर्वीही, ईडीसह इतर काही आर्थिक व्यवहाराच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला असताना, खडसे यांनी कथित सीडीचा बऱ्याच वेळा उल्लेख केला होता. तुमच्याकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे, असे ते जाहीर सभांमधून सांगत होते. एक प्रकारे सीडीचा ढालीसारखा वापर करून आपल्यावरील चौकशीच्या संकटांना परतवून लावण्याचा प्रयत्न खडसे यांनी केला. परिणामी, महायुतीतील त्यांचे विरोधक इतकी वर्षे त्यांना थोडे दचकूनच राहिले.

आता हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित लोढा यास अटक झाल्यापासून कथित सीडी चर्चेत आली आहे. लोढा याच्याकडे असलेली ती सीडी शोधण्यासाठीच त्याच्यावर कारवाईचे पाऊल उचलल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्या सीडीमुळे मंत्री महाजन यांची राजकीय कारकीर्द धुळीला मिळविण्याची भाषा करणाऱ्या लोढाची जुनी चित्रफीतही खडसे यांनी बाहेर आणली. जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या त्या सीडीचे गूढ आणखी जास्त वाढले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित माहिती असलेली सीडी अजूनही प्रफुल्ल लोढा याच्याकडेच आहे. त्यासाठीच पोलीस देखील त्याच्या विरोधात पुन्हा पुन्हा कारवाई करत आहेत. – एकनाथ खडसे (आमदार, शरद पवार गट)