मुंबई महानगरपालिकेत महापौरपद हे मानाचे तर स्थायी समितीचे अध्यक्षपद अधिक महत्त्वाचे मानले जाते. कारण पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अध्यक्षांच्या हाती असतात. राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, यशवंत जाधव यांना उगाचच नाही स्थायी समितीचे अध्यक्षपद वर्षांनुवर्षे भूषविण्याची संधी मिळाली. (यापैकी वायकर आणि जाधव हे ‘ईडी’च्या कारवाईला घाबरून शिंदे गटात गेले हे वेगळे). शेवाळे यांची महापौरपदाची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. पण त्यांनी गेल्या आठवडय़ात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ही हौस भागवून घेतली. मुंबईतील सागरी किनारा मार्गाचे अलीकडेच लोकार्पण झाले आणि त्याचे श्रेय घेण्यावरून राजकीय नेत्यांमध्ये अहमहमिका लागली. मग खासदार राहुल शेवाळे यांनी या मार्गाचे श्रेय आपलेच, असे सांगत एक नामी शक्कल लढवली. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष व सदस्यांचा त्यांनी सत्कार घडवून आणला. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीच हा समारंभ आयोजित केल्याने प्रशासकीय यंत्रणाही कामाला आली. पालिका सभागृहात झालेल्या या समारंभात शेवाळे थेट महापौरांच्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. महापौरांच्या खुर्चीवरून कामकाज करण्याची संधी कधी मिळाली नव्हती पण ती आज मिळाली. एक दिवसाचा का होईना महापौर बनण्याची संधी मिळाली, अशी मिश्कील भावना शेवाळे यांनी व्यक्त केली.

काखेत कळसा आणि गावाला वळसा..

लोकसभेच्या सांगलीच्या जागेसाठी ठाकरे शिवसेनेने हक्क सांगत असताना आठ दिवसांपूर्वी पक्ष प्रवेश केलेल्या पैलवानासाठी आग्रह धरला आहे. काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असताना ठाकरे शिवसेनेचा जागेचा हट्ट अनाकलनीय वाटत असला तरी यामागे सूत्रबद्ध नियोजन असल्याची चर्चा कट्टय़ावर आहे. काँग्रेसला उमेदवारी मिळू नये यासाठी देव पाण्यात ठेवून विरोधक बसले नाहीत तर आघाडीतील मित्रांचेच हे कारनामे असल्याचे बोलले जाते. काँग्रेसला सांगलीची जागा मिळू नये यासाठी कोण प्रयत्नशील आहे याचा शोध जर घ्यायचा म्हटले तर ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशीच गत व्हायची.

सारेच शरद पवार गटाचे कसे ?

सोलापूरमध्ये सध्या तीन माजी महापौर विविध कारणांमुळे अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आहेत. माजी महापौर महेश कोठे यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या हाणामारीतून गुन्हा दाखल झाला. पक्षाचे दुसरे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजनेतून मिळालेला धान्यमाल परस्पर काळय़ा बाजारात नेताना झालेल्या या कारवाईत संबंधित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून मनोहर सपाटे यांनाही आरोपी करण्यात आले. आणखी एक माजी महापौर जनार्दन कारमपुरी हेसुध्दा एका प्रकरण अडकले आहे. सुमारे पाच कोटींच्या थकीत कर्जामुळे कारमपुरी कुटुंबीयांची मालमत्ता एका बडय़ा उद्योग समूहाशी संबंधित एका वित्तीय संस्थेने जप्तीची नोटीस काढून लिलावाची प्रक्रियाही हाती घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संकलन : इंद्रायणी नार्वेकर, दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर)