नितीन पखाले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : येथे शुक्रवारी भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत भाजप महिला मोर्चाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये प्रश्न विचारण्यावरून मोठे वादंग झाले. वाघ आणि पत्रकारांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्र ढवळून निघत असताना, भाजपच्या नेत्यांना पत्रकारांनी अडचणीचे प्रश्न विचारलेले का आवडत नाहीत, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.

भाजप केंद्रात व राज्यात सत्ताधारी झाल्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी केवळ आपण म्हणू ते लिहून घेतले पाहिजे अडचणीचे प्रश्न विचारू नयेत अशी या पक्षाचे नेत्यांची भावना झाली आहे. मध्यंतरी भाजपची राज्यात सत्ता नसताना विदर्भ दौऱ्यात आलेले भाजपचे असेच एक नेते त्यांच्यावरून विचारलेल्या प्रश्नांवरून वैतागून निघून गेल्याचे दिसले होते. ‌ दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी रान उठविले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता. तेव्हापासून चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्यात विळ्या – भोपळ्याचे सख्य पाहायला मिळते. जिथे संधी मिळेल तिथे चित्रा वाघ या संजय राठोड यांच्यावर सातत्याने आरोप करून हल्लाबोल चढवितात. त्यांना गुन्हेगार, खुनी अशी संबोधने लावून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असत. वाघ यांनी एवढी उठाठेव करूनही राज्यात झालेल्या सत्तांतरात संजय राठोड पुन्हा मंत्री झाले आणि चित्रा वाघ यांची कोंडी झाली. पोलिसांनी क्लीनचिट दिल्याने राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश केला, अशी सारवासारव त्यावेळी विद्यामान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. तरीही वाघ यांनी मात्र संजय राठोड हेच पूजा चव्हाण प्रकरणात दोषी आहेत आणि आपली लढाई सुरूच राहील, असा पवित्रा घेतला होता.

हेही वाचा… विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यात आघाडीत बिघाडी

यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत याच मुद्यावरून एका वार्ताहराने चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला वाघ यांचा तोल ढळला. राठोड यांच्या विरोधात इतके रान उठवूनही भाजपचा सहभाग असलेल्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. त्यामुळे तुमच्या आरोपांना तुमच्याच पक्षाने गांभीर्याने घेतले नाही, असा ‘त्या’ वार्ताहराच्या प्रश्नाचा उपरोधिक रोख होता. मात्र प्रश्नातील उपरोधिकता न कळाल्यामुळे वाघ आणि त्यांच्या समवेत असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांची चिडचिड झाली. त्यामुळे पुढील वादनाट्य घटले. वाघ यांनी त्या पत्रकारावर थेट संजय राठोड यांच्याकडून सुपारी घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला. त्यामुळे हा वाद पेटला आणि वाघ यांना पत्रकारांच्या रोषाचा सामना करावा लागला. मात्र या पत्रकार परिषदेत वाघ यांनी सुरूवातीपासूनच पत्रकारांनी प्रश्न विचारूच नये, केवळ त्यांचेच म्हणणे ऐकून घ्यावे, या पद्धतीने आपली भूमिका ठेवली होती. शिवाय संजय राठोड यांच्या गृह जिल्ह्यात पत्रकार पूजा चव्हाण प्रकरणावरून अडचणीचे प्रश्न विचारतील, तेव्हा नवे वादंग निर्माण करून माध्यमे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा वाघ आणि त्यांच्या कंपूचा हा पूर्वनियोजित प्लॅन तर नव्हता ना, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी आता पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी उपस्थित पत्रकारांना स्वत:च प्रश्नावली देवून त्याची उत्तरे देण्याची प्रथा सुरू करावी, असा उपरोधिक सल्ला यवतमाळच्या पत्रकारांनी यानिमित्ताने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि आ. अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. निलय नाईक हे उपस्थित असूनही त्यांनी वाघ यांना रोखण्याचा किंवा समजाविण्याचा प्रयत्न न करता उलट पत्रकारांविरोधातच शाब्दिक हल्ला केल्याने भाजपच्या सुसंस्कृतपणालाचा या नेत्यांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. यवतमाळच्या पत्रकारांनीही आता या प्रकरणी माघार न घेता, चित्रा वाघ व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा… रामचंद्र तिरुके : कुशल संघटक

तर गप्प बसायचे होते ! – संध्या सव्वालाखे

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळच्या पत्रकारांबाबत केलेले वर्तन निंदनीय आहे. संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत येथील पत्रकार प्रश्न विचारणारच हे वाघ यांनी गृहीत धरायला हवे होते. या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नव्हते तर गप्प बसायचे होते. प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यवतमाळच्या पत्रकारांना महिला प्रदेश काँग्रेसचे समर्थन असल्याचे काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी म्हटले आहे. सत्तेची हवा डोक्यात शिरू देवू नका, असा सल्लाही सव्वालाखे यांनी वाघ यांना दिला आहे.

हेही वाचा… विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय?

दौरा भाजपसाठी, भेटी राष्ट्रवादी नेत्यांच्या !

यवतमाळ येथे महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व भाजपचे महिला संघटन वाढविण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या चित्रा वाघ यांचा पत्रकार परिषदेत तोल ढळल्याने स्थानिक भाजपमध्येही दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. चित्रा वाघ यांनी रागावर नियंत्रण आणि संयम ठेवला नाही तर त्यांची राजकीय वाटचाल धोक्यात येऊ शकते, असे भाजपचेच काही पदाधिकारी या प्रकरणानंतर खासगीत बोलत होते. काही वर्षांपूर्वी वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आल्या आहे. यवतमाळात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याप्रती दाखवलेली जवळीक स्थानिक भाजप नेत्यांनाही खटकली. राष्ट्रवादीचे माजी आमदार ख्वॉजा बेग, माजी महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे-राऊत आदी नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याने भाजपात मात्र वाघ या नेमक्या कोणाच्या भेटीसाठी आल्या होत्या, असा प्रश्न विचारला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh was angry on reporters questions mixed reactions within bjp print politics news asj
First published on: 14-11-2022 at 12:41 IST