चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत राजकीय धुरळा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय पक्ष खुलेपणाने पॅनेल करून उतरले असून, पदवीधर निवडणुकीत राजकीय पक्षांची चुरस अधिक आहे. विद्यापीठ अधिसभा निवडणुकीतच महाविकास आघाडीत फूट पडली असून, काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने त्याचे पडसाद महापालिका निवडणुकांमध्ये उमटणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विद्यापीठ कायदा २०१६ नुसार दर पाच वर्षांनी अधिसभेची निवडणूक होते. त्यात पदवीधर, संस्थाचालक, प्राचार्य असे विविध गट असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ३९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्राधान्यक्रमानुसार मतदान ही पद्धत वापरली जाते. आजवरच्या इतिहासानुसार विद्यापीठ अधिसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्ष खुलेपणाने कधीच निवडणुकीत उतरले नव्हते. पॅनेल करून ही निवडणूक लढवली जायची. मात्र यंदा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल निवडणुकांच्या रिंगणात आहे. मात्र, या पॅनेलमध्ये काँग्रेसच्या इच्छुकांना समाविष्ट न केल्याने आणि पॅनेल बनविताना विश्वासात न घेतल्याने काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीतून बंडाचा झेंडा उगारला आहे.

हेही वाचा… रामचंद्र तिरुके : कुशल संघटक

या निवडणुकीत पदवीधर गटात विद्यापीठ विकास मंचाकडून दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चार, छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलचे सहा उमेदवार रिंगणार आहेत. पदवीधरच्या प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे. पूर्वी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका होत असत. आजचे आघाडीचे अनेक नेते याच विद्यार्थी चळवळ आणि निवडणुकांतून पुढे आले आहेत. अधिसभा हे विद्यापीठाचे महत्त्वाचे अधिकार मंडळ असल्याने या निवडणुकीचे महत्त्व आहे.

हेही वाचा… विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय?

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासाला छेद देत राजकीय पक्षांनी खुलेपणाने आपली पॅनेल उभी केल्याने निवडणुकीत राजकीय धुरळा उडाला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे शहराध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहराध्यक्ष उतरले आहेत. त्यातच या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याचेही स्पष्ट झाले. पॅनेल बनविताना काँग्रेसला विश्वासात घेतले गेले नसल्याने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा… विश्लेषण: पुन्हा विश्वविजेतेपदापासून दूरच! भारतीय संघाची कुठली गणिते चुकली?

आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचे सांगितले जात असताना महाविकास आघाडीतील विसंवादही विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला. त्यामुळेच आता महापालिका निवडणुकीचे गणित कसे बांधले जाणार याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics is at full swing in senate election savitribai phule university print politics news asj
First published on: 14-11-2022 at 11:41 IST