दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मोदींवरील माहितीपटाच्या प्रदर्शनावरून कोल्हापुरात डावे, पुरोगामी पक्ष, संघटना आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. पुरोगामी, डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्याची भूमिका घेतली. या माहितीपटावर बंदी असल्याने त्याचे प्रदर्शन करता येणार नाही, अशी पवित्रा भाजपने घेतला आहे. पुरोगामी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात हा माहितीपट पाहिला. शिवाय तो एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे इरादा व्यक्त केला आहे. या माहितीपटात चुकीची माहिती असल्याने मोदीं प्रश्नी खुल्या चर्चेला येण्याचे आव्हान भाजपकडून डाव्यांना देण्यात आल्याने या वादाचे लोण पसरताना दिसत आहे.बीबीसीने तयार केलेल्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या माहितीपटावरून देशभरामध्ये वादाचे चित्र निर्माण झाले आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठांसह काही शिक्षण संस्थांमध्ये या माहितीपटांवरून गोंधळ सुरू आहे. कोल्हापुरातील या माहितीपटावरून डावे ,पुरोगामी पक्ष, संघटना व भाजप यांच्यात संघर्षाची ठिणगी उडालेली आहे.

डावे पक्ष रस्त्यावर

हा माहितीपट कोल्हापुरात जाहीररीत्या दाखवला जाणार असल्याचे पुरोगामी संघटनांनी स्पष्ट केले होते. याची याची दखल घेऊन कोल्हापूर पोलिसांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या संघटनेस केंद्र शासनाने या माहितीपटावर बंदी घातली असल्याने तो दाखवण्यात येऊ नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली. त्यानंतर पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या. पोलिसांनी दडपशाही केली तरी मोदींवरील बीबीसीचा माहितीपट कोणत्याही परिस्थितीत बिंदू चौकात दाखवणारच असा पवित्रा घेतला. अभिव्यक्ती स्वातंत्र समर्थनार्थ या पक्षांनी गेल्या रविवारी बिंदू चौकात माहितीपट बंदी विरोधात निषेध सभा आयोजित केली होती. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्यासह भाकप, माकप, जनता दल या पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापुरातील मध्यवर्ती बिंदू चौक येथे जमले. संयोजक गिरीश फोंडे, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंत पाटील, व्यंकाप्पा भोसले. प्रशांत आंबी. हरीश कांबळे आदींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य झिंदाबाद, भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणा दिल्या.

भाजपचे आव्हान

याचवेळी या माहितीपटावर बंदी असल्याने तो दाखवता येणार नाही अशी म्हणत भाजपने विरोधाची भूमिका घेतली. यामुळे संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत माहितीपट दाखवता येणार नाही, असे सांगितले. कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून गनिमी काव्याने पक्ष कार्यालयात ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ हा बीबीसीचा माहितीपट सामूहिकरीत्या पाहिल्याने भाजप समोर पेच निर्माण झाला. आता मोदींच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘ बीबीसीच्या माहितीपटामध्ये चुकीची माहिती दाखवली असल्याने त्यावर बंदी घातली आहे. गुजरात दंगली प्रकरणी मोदी यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. तरीही माहितीपट दाखवला असेल, त्याचा प्रसार केला असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका घेतली जाणार आहे,’ असे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विजय खाडे पाटील यांनी म्हटले आहे. दुसरीकडे गिरीश फोंडे यांनी ‘ हा माहितीपट १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. या आठवड्यात तो ३० हजारांपर्यंत पोहचला जाईल. माहितीपटात मोदी यांच्या विषयी प्रश्न उपस्थित केले असल्याने त्यांनीच उत्तरे द्यावीत. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना उत्तर देण्याची गरज आम्हाला वाटत नाही.’ असे उत्तर दिले आहे. कोल्हापुरात बिंदू चौकाच्या अल्याड – पल्याड पक्ष कार्यालय असलेले डावे आणि भाजप हे पक्ष मोदींच्या माहितीपटावरून आमने-सामने आल्याने संघर्ष वाढत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash in the progressive party bjp in kolhapur over the documentary on modi amy
First published on: 02-02-2023 at 16:13 IST