प्रबोध देशपांडे

अकोला : अकोला जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत खदखद चांगलीच वाढली आहे. आमदार अमोल मिटकरी व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेदाने टोक गाठले. गत तीन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आ. मिटकरींवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. १० दिवसांत मिटकरींनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणारे पुरावे जाहीर करणार, असे आव्हानच मोहोड यांनी दिले. त्यामुळे आ.मिटकरींच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते.

अकोला जिल्हा राष्ट्रवादीत गेल्या काही वर्षांपासून प्रचंड असंतोष आहे. राष्ट्रवादीत अनेक ज्येष्ठ नेते असतांना पक्षात नव्यानेचे आलेल्या मिटकरींना थेट विधान परिषदेवर पाठविण्यात आले. अजित पवार यांचा निर्णय असल्याने उघडपणे त्यावर कुणी बोलत नसले तरी पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीला जनाधार नाही. पक्ष गटातटात विभागला आहे. आ. मिटकरींना आमदारकी मिळाल्याने ते त्याचा उपयोग संघटन वाढीसाठी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी केवळ आपले मूळ गाव कुटासा व अकोट विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे सूर जुळत नाहीत. जिल्ह्यात राष्ट्रवादीने मिटकरींना आमदारकी दिल्यावर वाद व गटबाजीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पक्षात अधून-मधून खटके उडत असतात. याचा प्रत्यय पुन्हा प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात आला.

हेही वाचा… मुरलीधर मोहोळ प्रदेश पातळीवरील राजकारणात ? नेता प्रवास योजना समितीमधील समावेशामुळे चर्चा

जिल्हा राष्ट्रवादीतील वाद प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यासमोर चव्हाट्यावर आला. पक्षाच्या आढावा बैठकीत शिवा मोहोड यांनी जयंत पाटील यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचताना आ. अमोल मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देतांना आ. मिटकरी यांनी आरोप करणाऱ्यांचे चारित्र तपासावे असे म्हटले होते. त्यामुळे संतापलेल्या शिवा मोहोड यांनी आ. मिटकरींचा खरपूस शब्दात समाचार घेतला. मोहोड यांनी आ. मिटकरींवर आरोपांची राळ उठवली. ते म्हणाले, ‘‘माझ्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या आमदारांनी एक जरी पुरावा दिला, तर भर चौकात फाशी घेईन. त्यांनी एकदा पुराव्यासह आरोप सिद्ध करावे, अन्यथा दहा दिवसानंतर पुराव्यांसह मिटकरींच्याच घरासमोर पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणार.’’

हेही वाचा… पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने भाजपबरोबर ‘जवळीक’ साधण्याचा कलमाडींचा प्रयत्न, काँग्रेसच्या व्यासपीठावर भाजप नेत्यांची मांदियाळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमोल मिटकरी हे कमिशन घेत नसतील तर शहरातील उच्चभ्रू वस्तीत ८० लाखांचा प्लॉट कसा काय घेतला? ३० लाखांची गाडी कुठून आली? अकोला जिल्ह्यातील पातूरच्या महिला पदाधिकाऱ्याचे काय प्रकरण आहे?, एका काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला १० लाख रुपये कशासाठी दिले? व एका पुण्याच्या महिला पदाधिकाऱ्याचा विश्रामगृहावर तीन दिवस मुक्काम कशासाठी होता? असे अनेक सवाल शिवा मोहोड यांनी उपस्थित केले. अमोल मिटकरी पूर्वी चोरून घासलेट विकत होते. त्यांच्या विषयी सगळं माहीत असलं तरी पक्षाची आचारसंहिता असते. त्यामुळे काही बोलू शकत नाही, असे स्पष्टीकरण देखील शिवा मोहोड यांनी दिले. आता या आरोपांवर मिटकरी काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून राष्ट्रवादीतील वाद शमण्याऐवजी आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.