अविनाश पाटील

शिवसेनेमुळे राजकारणात मंत्रिपदापर्यंत पोहचता आल्याने ठाकरे घराण्याविषयी असलेली निष्ठा एकीकडे तर, ऐन तारुण्यात आनंद दिघे यांच्या विचारांच्या पगड्यामुळे मिळालेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा जीवाभावाचा मित्र दुसऱ्या बाजूला. ठाकरे घराणे आणि शिंदे या दोघांना संकटसमयी आधाराची गरज असताना निष्ठेवर मैत्रीने मात केली. आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारात मंत्री असलेले दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेतील बंडाळीत भुसे-शिंदे मैत्रीच्या अध्यायाची चांगलीच चर्चा आहे.

शिवसेनेत बंड करून थेट पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना पक्षातील इतरही बहुसंख्य आमदारांनी साथ दिल्यानंतर या बंडामुळे भविष्यातील राजकारणात होणारी उलथापालथ हळूहळू राजकारणी मंडळींच्या लक्षात येऊ लागली. शिंदे यांना मंत्र्यांचीही साथ मिळू लागली. त्यामागे वेगवेगळी कारणे असली तरी मालेगाव बाह्य मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे दादा भुसे हे शिंदे यांच्याशी असलेली मैत्री आणि महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर गेल्या अडीच वर्षात शिंदे यांनी केलेल्या उपकारांमुळे त्यांच्या सोबत गेले. भुसे हे नोकरीनिमित्त ठाण्यात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यावेळी युवा एकनाथ शिंदे यांच्या ते संपर्कात आले. तेव्हापासूनच त्यांच्यात मैत्रीचा धागा विणला गेला.

समाज कार्याच्या विचारांनी भारलेले भुसे हे मालेगाव तालुक्यातील सोयगाव या आपल्या गावी परतल्यावर १९९२ मध्ये त्यांनी जाणता राजा मंडळ स्थापन केले. शिवसेनेचे कार्य जसे चालायचे, अगदी तशीच कार्यपध्दत ठेवत भुसे यांनी या मंडळाच्या माध्यमातून लहानमोठ्या स्वरुपात समाजकार्य सुरू केले. आपण कधीच निवडणूक लढविणार नाही, असा निर्धार त्यावेळी भुसे यांनी जाहीरपणे व्यक्त केलेला होता. कालांतराने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जाणता राजा मंडळही सेनेत विलीन झाले. त्यानंतर भुसे यांना मिळालेली कार्यकर्त्यांची साथ, प्रत्येकाच्या सुखदु:खाप्रसंगी धावून जाण्याची वृत्ती यामुळे ते राजकारणात एकेक वरची पायरी चढत गेले. सलग चारवेळा विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या भुसे यांनी ठाकरे घराण्यावरील निष्ठा अनेकवेळा बोलून दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या भुसे यांच्यावर विश्वास दाखवित महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री केले. विधानसभेच्या मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे हे भुसे यांच्यासाठी प्रचारात उतरले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाचे पर्व सुरू झाल्यावर उध्दव ठाकरे यांच्या भेटीगाठींवर निर्बंध आले. नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याशीच आमदारांचा अधिक संपर्क होऊ लागला. एप्रिल २०२१ मध्ये मालेगावात भुसे यांचे पुत्र आविष्कार यांचा विवाह ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येशी झाला. त्यावेळी करोना निर्बंधांमुळे या विवाहास अगदी मोजकेच जण उपस्थित होते. त्यात एकनाथ शिंदेही होते. भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासही शिंदे हे उपस्थित राहिले. एवढेच नव्हे तर, त्यांनी मतदार संघातील विविध विकास कामांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याची घोषणाही केली. शिंदे यांच्या याच उपकारांची परतफेड भुसे यांनी त्यांना बंडात साथ देवून केली असे म्हणावयास हवे.