प्रल्हाद बोरसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी मालेगाव दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेत उभी फूट पाडून भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदावर आरुढ झालेल्या शिंदे यांनी राज्यभर दौरे सुरू केले असून त्याची सुरुवात मालेगावपासून होत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे गटाला शह देणे आणि बंडखोर आमदारांना ताकद देणे, यावर शिंदे गटाचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची नामुष्की आली. शिंदे यांच्या या बंडामुळे सेनेची सर्वाधिक पडझड मराठवाड्यात झाली. त्या खालोखाल नाशिक विभागात सेनेला फटका सहन करावा लागला. मराठवाड्यातील नऊ आमदार आणि एक खासदार तर नाशिक विभागातील सात आमदार आणि एक खासदार या बंडात सहभागी झाले. महत्वाचे म्हणजे या दोन्ही विभागातील बंडखोरांमध्ये तत्कालीन कॅबिनेटमंत्री दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश असल्याने शिंदे गटाचा उत्साह द्विगुणित झाला. त्यामुळे नाशिक, मराठवाडा या दोन्ही विभागात पक्ष संघटनेची बांधणी करत आगामी काळात राजकीय उत्कर्ष साधण्याचा शिंदे गटाचा इरादा स्पष्टपणे दिसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालेगाव दौऱ्याकडे त्याच नजरेने पाहिले जात आहे.

हेही वाचा… पिंपरी पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव

सेनेतील बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे, भिवंडीमार्गे नाशिक आणि मराठवाड्याचा दौरा केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेही या भागाचा लवकरच दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या दौऱ्यात आदित्य यांनी बंडखोरांचा उल्लेख गद्दार असा केला. त्यांच्या दौऱ्याप्रसंगी जागोजागी मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आमदार, खासदार शिंदेंच्या कळपात गेलेले असले तरी पक्ष संघटनेवर ठाकरेंचाच वरचष्मा असल्याचा संदेश लोकांमध्ये गेला. त्याला प्रत्युत्तर देण्याबरोबरच जनमत अधिकाधिक अनुकूल करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे.

मालेगाव बाह्यचे दादा भुसे आणि शेजारच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुहास कांदे हे दोन्ही आमदार आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा शिंदे गटात दाखल होणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या तिघांच्या बंडखोरीविरोधात नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मालेगाव आणि नांदगावमध्ये भुसे आणि कांदे यांच्या भूमिकेला मात्र फारसा विरोध नाही, असे चित्र आहे. अर्थात असे असले तरी या दोघांना पर्याय शोधण्यासाठी ठाकरे गटातर्फे जोरदार प्रयत्न सुरु असल्याने भविष्यात उभयतांची वाट बिकट होऊ नये आणि स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत असलेले त्यांचे प्रभुत्व अबाधित रहावे, यासाठी त्यांना बळ देण्याचाही शिंदे गटाचा प्रयत्न आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणूनच मालेगावची निवड करणे, हा त्याच प्रयत्नांचा एक भाग मानला जातो.

हेही वाचा… वडेट्टीवारांच्या कृत्रिम अभयारण्याच्या संकल्पनेविरुद्ध प्रतिभा धानोरकरांची मोर्चेबांधणी, वडेट्टीवार-धानोरकर संघर्ष पुन्हा तीव्र

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभी येथील तालुका क्रीडा संकुलात नाशिक महसूल विभागाची महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील रखडलेले प्रकल्प व भविष्यकालीन आवश्यक विकास कामे या विषयावर मंथन होणार आहे. त्यानंतर काॅलेज मैदानावर कार्यकर्ता मेळावा होणार आहे. मेळाव्यात मालेगावकरांच्या वतीने मुख्यमंत्री झाल्याबद्दल शिंदे यांच्या जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. खास शक्तीप्रदर्शन करत हा दौरा धुमधडाक्यात होण्यासाठी भुसे समर्थकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रशासनातर्फेही दौऱ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकरवी भुसे यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी काही लोकप्रिय घोषणा होण्याचेही संकेत मिळत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on malegaon tour on saturday for giving strength to rebels print politics news asj
First published on: 28-07-2022 at 17:00 IST