दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची या प्रकरणात चौकशी केली जात होती. मनिष सिसोदिया यांच्या अटकेनंतर दिल्लीमधील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनिष सिसोदिया हे आप पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत. सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे सिसोदिया यांचे दिल्लीच्या राजकारणातील स्थान, आप पक्षात असलेले त्यांचे महत्त्व आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांची असलेली जवळीकता याची नव्याने चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “मित्रांची साथ, मित्रांचा विकास”, अदाणी प्रकरणावर प्रियांका गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई

दिल्लीमधील केजरीवाल सरकारने नवे उत्पादन शुकल धोरण लागू केले होते. हे धोरण राबवताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. याच कारणामुळे दिल्लीचे नायब राजपाल विनय सक्सेना यांनी या उत्पादन शुल्क धोरणाची सीबीआयकडून चौकशी करावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर या कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आप पक्षाच्या उदयापासूनचा मनिष सिसोदिया यांच्यावर हा सर्वात मोठा आरोप आहे. सिसोदिया यांनी या आरोपाला फेटाळले आहे. अटक होण्यापूर्वी सिसोदिया यांनी आपला आईसोबतचा एक फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. तसेच राजघाटावरही ते काही काळासाठी थांबले होते.

हेही वाचा >> ‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ?

अगोदर पत्रकारिता, नंतर समाजकारण अन…

सिसोदिया हे भाजपावर टीका करणारे एक महत्त्वाचे नेते आहेत. आप पक्ष रेवडी संस्कृतीचा पुरस्कार करतो, असा आरोप भाजपाकडून केला जातो. याच आरोपाला तेवढ्याच क्षमतेने उत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये सिसोदिया हे अग्रस्थानी राहिलेले आहेत. सिसोदिया यांनी शासकीय शाळेतच शिक्षण घेतलेले आहे. तर भारतीय विद्या भवन येथून पत्रकारितेची पदविका संपादन केलेली आहे. राजकारणात सक्रिय होण्याअगोदर त्यांनीवृत्तावाहिनी तसेच रेडिओमध्येही काम केलेले आहे. एकीकडे नोकरी करत असताना ते हळूहळू समाजकारणाकडे वळले. अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांनी परिवर्तन या संस्थेत सोबत काम केलेले आहे. त्यांनी एकत्रितपणे रेशन, वीजबिलाची समस्या, माहितीचा अधिकार अशा विषयांवर काम केलेले आहे. या दोघांनीही पूर्व दिल्लीमध्ये उल्लेखनीय समाजसेवा केलेली आहे. त्याचाच फायदा पुढे त्यांना राजकारणात झाला.

हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अर्थ काय? पुन्हा युती होणार?

मनिष सिसोदिया केजरीवालांचे राईट हँड

अनेकांना मनिष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांचे ‘राईट हँड’ वाटतात. याबाबत सिसोदिया यांच्या टीममधील एका सदस्याने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “मनिष सिसोदिया यांनी राजकीय निर्णय तसेच सरकारचा कारभार समर्थपणे हाताळलेला आहे. अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यात विश्वासाचं नातं आहे. केजरीवाल यांच्या दृष्टीकोनाला दिशा देणारे सहकारी म्हणून सिसोदिया यांच्याकडे पाहिले जाते,” असे या व्यक्तीने सांगितले.

सिसोदियांनी सांभाळली अनेक महत्त्वाची खाती

केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यात विश्वासाचं दृढ नातं आहे. आप सरकारच्या २०१३, २०१५, २०२० या सालातील कार्यकाळात सिसोदिया यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडाल्या. त्यांच्याकडे सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती होती. अर्थ, शिक्षण, आरोग्य, गृह, नियोजन, नगरी विकास अशी महत्त्वाची खाती सिसोदिया यांनी समर्थपणे सांभाळलेली आहेत. सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर त्यांचे खातेदेखील सिसोदिया यांच्याकडे सोपवण्यात आले होते. यावरूनच केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यातील नाते कसे आहे, हे स्पष्ट होते.

हेही वाचा >>Manish Sisodia Arrested : मोठी बातमी! मनिष सिसोदियांना सीबीआयकडून अटक, ९ तासांच्या चौकशीनंतर कारवाई

भाजपाकडून भ्रष्टाचाराचा आरोप

सिसोदिया हे आप सरकारमधील एक महत्त्वाचा चेहरा आहेत. त्यांनी दिल्लीमधील शिक्षण व्यवस्था सुधारण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. दिल्लीमधील शाळांचा चेहरामोहरा बदलण्यात सिसोदिया यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र विरोधकांकडून केजरीवाल सरकारकडून दिल्लीमधील शाळांच्या प्रगतीची चुकीची प्रतिमा उभी केली जात आहे, असा दावा केला जातो. दिल्लीमधील शाळा उभारताना बांधकामात भ्रष्टाचार झालेला आहे, असा दावा भाजपाने २०२१ साली केला होता. यावेळी भाजपाने सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

आप पक्षाला मोठा झटका

दरम्यान, आम आदमी पार्टीने राष्ट्रीय राजकारणात उडी घेतलेली आहे. आप पक्षाने पंजाबची निवडणूक जिंकून येथे एकहाती सत्ता स्थापन केलेली आहे. तसेच गुजरात, हिमाचलप्रदेशमध्येही आप पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत आपने आपल्या प्रचारात सिसोदिया यांनी राबवलेले दिल्लीमधील शिक्षण धोरण, येथील शाळांची उदाहरणं दिली आहेत. याआधी आप पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सिसोदिया यांच्या रुपात आप पक्षाला हा दुसरा मोठा झटका आहे. त्यामुळे आगामी काळात आप पक्षाची वाटचाल कशी असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colleague of arvind kejriwal face of delhi education policy who is manish sisodia prd
First published on: 27-02-2023 at 14:53 IST