साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीतील गट-तट आणि मतदारांच्या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कौशल्याची सत्त्वपरीक्षा होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. गेली दहा वर्षे खासदार असलेले राऊत यंदा हॅटट्रिक साधण्यासाठी ताकदीने रिंगणात उतरले आहेत.

हेही वाचा…भाजपा सरकार असतानाही माजी पंतप्रधान वाजपेयींचे गाव अनेक दशकांपासून महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत

स्वातंत्र्यानंतर २००९ पर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांच्या काळात या दोन जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी आणि राजापूर हे दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ होते. त्यापैकी रत्नागिरी मतदारसंघावर काँग्रेसची जास्त पकड होती, तर शेजारच्या राजापूर लोकसभा मतदारसंघात १९५७ ते १९९१ ही सुमारे २५ वर्षं बॅ. नाथ पै आणि प्रा. मधू दंडवते यांच्या रूपाने समाजवादी विचारसरणीचा प्रभाव राहिला. १९९१ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मेजर सुधीर सावंत यांनी दंडवते यांचा पराभव केला. पण त्यानंतर१९९६ ते २००९ या काळात शिवसेनेतर्फे उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत सुरेश प्रभू यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. देशातील मतदारसंघ फेररचनेनुसार २००८ मध्ये या दोन मतदारसंघांचा मिळून एक मतदारसंघ झाला. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीतर्फे काँग्रेसचे तरुण, ताज्या दमाचे उमेदवार निलेश राणे यांनी अनुभवी प्रभू यांच्यावर सुमारे पन्नास हजार मतांनी विजय मिळवला. पण हे यश तात्पुरतं ठरलं. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विद्यमान उमेदवार विनायक राऊत यांनी नीलेश यांचा दणदणीत पराभव केला. यंदाच्या निवडणुकीत खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव असला तरीही त्यांची लोकसभा निवडणूक पहिलीच आहे.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीचं चित्र पाहिलं तर या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूणचे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे वजनदार नेते पालकमंत्री उदय सामंत, कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे आणि सावंतवाडीचे मंत्री दीपक केसरकर या चारजणांच्या मतदारसंघांमध्ये राणे समर्थक मताधिक्याची अपेक्षा बाळगून आहेत. त्याचबरोबर, गेल्या निवडणुकीत निलेश यांना मिळालेली अडीच लाखांपेक्षा जास्त मतं ते यंदाही गृहीत धरत आहेत. या व्यतिरिक्त, या दोन जिल्ह्यांमधील भाजपाचे निष्ठावान मतदार मिळून कागदोपत्री राणे यांचा विजय सोपा वाटत आहे. पण प्रत्यक्ष वास्तव वेगळं आहे. त्याचं मुख्य कारण, राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या तोडफोडीच्या राजकारणाबद्दल येथील भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे निकम, सामंत आणि केसरकर यांचे मतदार या निवडणुकीत त्यांच्या इशाऱ्यानुसार मतदान करतील, याची हमी देणं कठीण आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून सामंत आणि केसरकर बाहेर पडले असले तरी कार्यकर्त्यांची फळी अजून ठाकरे यांच्या पाठीशी आहे. त्यातच उदय सामंत यांचे थोरले बंधू आणि या निवडणुकीतील दुसरे प्रबळ दावेदार किरण सामंत यांनी थोड्याच दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयावरील सामंत यांचं छायाचित्र असलेले फलक हटवण्याचं प्रकरण खूपच गाजलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, कल्याण आणि नाशिक या जागा पदरात पाडून घेताना या मतदारसंघाचा बळी दिला, अशीही या दोघांच्या कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. यावर नंतर कितीही सारवासारव झाली असली तरी या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणजे, सामंत बंधुंचे कार्यकर्ते निवडणुकीचं काम करण्याबाबत संभ्रमात पडले आहेत आणि याचा थेट फटका राणेंना बसणार आहे.

हेही वाचा…सरकारी पैशांचा अपव्यय ते नैराश्य; सूरत मतदारसंघातून माघार घेणाऱ्या आठ जणांनी काय कारणे दिली?

सिंधुदुर्गातल्या तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कणकवली मतदारसंघात राणे यांना मताधिक्याची हमी असली तरी उरलेल्या दोन मतदारसंघांपैकी कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक त्यांना जोरदार विरोध करतील, हे उघड आहे. पण मंत्री केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, केसरकर आणि राणे या तिघांमधील संबंध गेल्या काही वर्षांत ताणलेले राहिले आहेत. निवडणुकीच्या मतदानावर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही.

या मतदारसंघात सुमारे दीड लाख मुस्लिम मतदार आहेत. इथेच नव्हे, तर देशभरात ते भाजपापासून दुरावल्याचं चित्र आहे. त्यातच गेल्या शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘औरंगजेब फॅन्स क्लब’ अशा शब्दात संभावना केल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. हा मतदार भाजपाला मत देण्याची शक्यता अतिशय कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ३० ते ३५ हजार ख्रिश्चन मतदार आहे. आत्तापर्यंत ठाकरे यांच्या शिवसेनेकडे फारसे न वळलेले हे दोन्ही समाज यावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असं चित्र आहे. शिवाय, भाजपाला निर्विवाद बहुमत मिळालं तर संविधान बदललं जाण्याच्या चर्चेमुळे दलित मतदार दुरावला आहे. राणेंना मानणारा मोठा वर्ग इथं आहे, पण त्याचबरोबर, नकार देणाराही वर्ग धीट होत गेला आहे. म्हणूनच दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत (तेही गृह मैदानावर) राणे पिता-पुत्रांना हार पत्करावी लागली.

हेही वाचा…लातूरात पुन्हा ‘मामुली’ चा प्रयोग !

राणेंच्या विजयाच्या दृष्टीने अशी काहीशी आव्हानात्मक परिस्थिती असली तरी गेली सुमारे चार दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात असलेले आणि या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांची नस माहित असलेले मुरब्बी राजकारणी राणे सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीत. महाविकास आघाडीच्या गोटात शिरुन गोंधळ उडवून देण्याचीही त्यांची क्षमता आहे. ‘महाशक्ती’ची यंत्रणा त्यांच्या दिमतीला आहे. तरीसुद्धा ही निवडणूक म्हणजे त्यांच्या या सर्व गुण आणि अनुभवाची सत्त्वपरीक्षा ठरली आहे.