पुणे : देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सरळ लढत होत असली, तरी खरी लढाई माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये आहे. एकीकडे शरद पवार यांच्याविषयी सहानभूतीची लाट, तर दुसरीकडे अजित पवारांच्या विकासकामांच्या उपकाराखाली दबलेला मतदार अशा द्विधा मनस्थितीतील बारामतीच्या मतदारांपुढे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न पडला आहे. प्रचारात अजित पवारांबरोबर; पण मनाने शरद पवारांबरोबर असलेल्या मतदारांपुढे कोणाच्या पारड्यात मते टाकायची, हाच यक्षप्रश्न पडला आहे.

या लोकसभा मतदार संघांमधील सहा विधानसभा मतदार संघांपैकी बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण आहे. भोरमधून आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे सुळे यांना साथ मिळेल, असे चित्र आहे. दौंडमधील आमदार राहुल कुल, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील या अजित पवार यांच्या आतापर्यंतच्या कट्टर राजकीय विरोधकांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र, त्यांच्याकडून दिलेला शब्द पाळला जाणार की, मागील निवडणुकांचे उट्टे काढले जाणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांना या तीन मतदार संघांतून प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत खडकवासला विधानसभा मतदार संघ हा निकालाबाबतीत निर्णायक भूमिकेत असणार आहे.

हेही वाचा…नारायण राणेंच्या राजकीय कौशल्याची सत्त्वपरीक्षा

‘खडकवासल्या’कडे लक्ष

या मतदार संघात शहरी मतदारांची संख्या जास्त आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या मतदार संघात मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे भीमराव तापकीर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद आहे. तसेच मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सुळे यांना कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीने या मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या ठिकाणी शरद पवार, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे खडकवासल्यातील मतदार कोणाच्या बाजूने झुकणार, यावर या मतदार संघातील निकाल अवलंबून असणार आहे.

तीन नवीन मित्र काय करणार?

पुणे जिल्ह्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढविताना अनेकांशी राजकीय वैर पत्करले. त्यामध्ये शिवतारे, हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल हे तीनजण आहेत. आता हे तिघेही अजित पवार यांचे नवे मित्र बनले आहेत. राजकीय क्षेत्रात उड्डाण घेताना या तिघांचेही पंख छाटण्याचे काम अजित पवार यांनी वेळोवेळी केले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आल्याने ते आता चांगले मित्र झाले आहेत. मात्र, पूर्वानुभवामुळे कलुषित झालेली मने गुप्तपणे कोणती भूमिका घेणार, यावर सुनेत्रा पवार यांचे भवितव्य अवलंबून आहे.

हेही वाचा…भाजपा सरकार असतानाही माजी पंतप्रधान वाजपेयींचे गाव अनेक दशकांपासून महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत

कौटुंबिक कलह आणि मतदार अस्वस्थ बारामती तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, विकासकामे आणि त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना मिळालेला रोजगार यामुळे अनेक लाभार्थी अजित पवार यांना प्रचारात उघडपणे पाठिंबा देत आहेत. जुनेजाणते मतदार हे सुळे यांना साथ देत आहेत. मात्र, नवीन फळी ही अजित पवार यांच्या सोबत असल्याने सुनेत्रा पवार यांच्या सभांना गर्दी दिसत आहे. मात्र, या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्याचे आव्हान अजित पवारांपुढे आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला. अजित पवार यांच्यासोबत कुटुंबातील एकही व्यक्ती नसल्याने ही नाराजी ते सातत्याने भाषणांतून बोलून दाखवत आहेत. कुटुंबात एकमेकांवर आरोपही करण्यात आले आहेत.

हेही वाचा…सरकारी पैशांचा अपव्यय ते नैराश्य; सूरत मतदारसंघातून माघार घेणाऱ्या आठ जणांनी काय कारणे दिली?

बेरजेच्या राजकारणाला वेग

या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार या दोघांकडूनही बेरजेचे राजकारण खेळण्यात आले आहे. त्यांच्याकडून राजकीय शत्रुत्त्व विसरून भेटीगाठी घेण्यावर भर देण्यात आला. भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. दिवंगत खासदार संभाजीराव काकडे यांचे कुटुंबीय; तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांची भेट शरद पवार यांनी घेतली. भेटीगाठी घेण्याबरोबरच फोडाफोडीचे राजकारणालाही वेग आला. इंदापूर परिसरात प्राबल्य असलेले शरद पवार यांचे साथीदार सोनाई डेअरीचे प्रवीण माने यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे.

प्रचार यंत्रणा काबीज ?

मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये सुळे यांच्या प्रचाराची यंत्रणा ही अजित पवार यांच्याकडे होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणते डावपेच आखायचे, याची अजित पवार यांना चांगलीच जाण आहे. तो अनुभव अजित पवार हे पत्नीला निवडून आणण्यासाठी पणाला लावत असल्याचे चित्र या मतदार संघात आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचे परिचय पत्रक मतदारांपर्यंत पोहोचू न देणे, प्रचाराच्या रिक्षा मतदार संघात फिरणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा काबीज करण्यात आल्याची चर्चा या मतदार संघात आहे.

हेही वाचा…लातूरात पुन्हा ‘मामुली’ चा प्रयोग !

‘वंचित’ आणि धनगर समाजाची भूमिका निर्णायक

वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांच्यासाठी उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे ही मते सुळे यांच्या बाजूने असणार आहे. या मतांबरोबर या मतदार संघात धनगर समाजाची मते ही मोठ्या प्रमाणात आहेत. बारामती, दौंड आणि इंदापूर या भागात या समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे वंचितबरोबरच धनगर समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या माध्यमातून अजित पवार हे मतदारांशी संपर्क साधत आहेत. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांना कटाक्षाने प्रचारापासून दूर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : कोल्हापूर; राजा विरुद्ध प्रजा स्वरुप प्राप्त झालेल्या लढतीत कोण सरस ठरणार ?

भाजपचे ‘मिशन बारामती’चे स्वप्न

भाजपने निवडणुकांपूर्वी ‘मिशन बारामती’ची घोषणा केली आहे. त्यानुसार अजित पवार यांना आपल्या गटात आणून त्यांनी पहिला टप्पा गाठला आहे. आता या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करून भाजपचे मिशन बारामती यशस्वी होणार का? याबाबत उत्सुकता असणार आहे.