नर्मविनोदी शैलीतील वक्तृत्त्वाची देण लाभलेल्या अटलबिहारी वाजपेयींची अनेक भाषणं आजही सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार व्हायरल होत असतात. त्यांची ही भाषणं कधी प्रेरणादायी, कधी राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारी, कधी विरोधकांना चितपट करणारी तर कधी सद्यपरिस्थितीवर विचार करायला लावणारी असतात. केवळ संसदेतच नव्हे तर प्रचारसभेतील त्यांची भाषणंही गाजत असत. त्यामुळे संसदेतील भाषणंही त्याकाळी लोक रेडिओवर ऐकत असत. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा बलरामपूर मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे भाषण ऐकून हा मुलगा एक दिवस देशाचा पंतप्रधान होईल, असे म्हटले होते. त्यांचं हे भाकित खरं ठरलं अन् देशाला दशसहस्रेषु वक्ता लाभला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जून २०२२ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पडलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांचं मंत्रिमंडळही बरखास्त झालं. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं एक भाषण तुफान व्हायरल झालं होतं. सरकारे येत-जात असतात, देश वाचला पाहिजे हे त्यांचं अजरामर भाषण. हे भाषण गेल्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत येतंय. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयींनी हे भाषण नेमकं कधी केलं होतं, त्यामागची पार्श्वभूमीवर काय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा >> १९९९ चा सत्तासंघर्ष: वाजपेयींचं सरकार एका मतानं कुणामुळे पडलं? शरद पवार, गिरधर गमांग की मायावती?

काही राजकीय घटना इतिहासाच्या पटलावर कोरल्या गेल्या आहेत. १९९६ ची सार्वत्रिक निवडणूकही त्यातीलच एक घटना म्हणावी लागेल. एप्रिल-मे १९९६ मध्ये झालेल्या अकराव्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. लोकसभेच्या एकूण जागांपैकी १६१ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत प्रथमच भाजपाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवण्यात यश आले.

परंतु, या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. १६१ जागा जिंकून भाजपा नक्कीच सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे खासदार नव्हते. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला १४० जागा मिळाल्या, मात्र त्यांनी सरकार स्थापन न करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >> Video: अटल बिहारी वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांची सूचक टिप्पणी; म्हणाले, “यही सच है!”

भाजपा, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या त्रिशंकूच्या मदतीने अटल बिहारी वाजपेयी यांनी १३ मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मात्र बहुमत जुळवण्यात अटल बिहारी वाजपेयी अपयशी ठरले. त्यामुळे, २८ मे १९९६ रोजी संसदेसमोर भाषण करताना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच पायउतार होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. “माझ्यावर आरोप झाला की, गेल्या १० दिवसांत मी जे काही केलं ते सत्तेच्या लोभापायी केलं. या आरोपामुळे मला मनस्वी वेदना झाल्या आहेत”, असं वाजपेयींनी त्यावेळी आपल्या भाषणात नमूद केलं. त्यांचं हेच भाषण अजरामर ठरलं. या भाषणातूनच त्यांच्यातील राजकीय खिलाडू वृत्तीचंही दर्शन झालं. हेच भाषण या ना त्या कारणाने सतत व्हायरल होत असतं.

१९९६ च्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी नेमकं काय म्हणाले?

“देशात धुव्रीकरण व्हायला नको. धर्म आणि राजकारणात देश विभागला जाता कामा नये. देश आज संकटांनी घेरला गेला आहे. हे संकट आपण तयार केलेलं नाही. जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा आम्ही त्या त्या सरकारला मदत केली आहे”, असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते. जिनिव्हा परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना तत्कालीन लोकसभा विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवलं होतं. त्याचा संदर्भ देत अटल बिहारी वाजपेयींनी देशाची परंपरा कायम राहायला हवी, असं आवाहन केलं होतं.

याबाबत माहिती देताना अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, “नरसिंह राव यांनी भारताचं प्रतिनिधित्व करण्याकरता विरोधी पक्षनेता म्हणून मला पाठवंल होतं. पाकिस्तानी मात्र आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले की हे कसे काय शक्य आहे? कारण त्यांच्याकडचे विरोधी पक्षनेते राष्ट्रीय कार्यातही सहकार्य करत नाहीत. ते सर्व ठिकाणी सरकारला पाडण्याचं काम करतात. पण तशी आपली परंपरा नाही, आपली संस्कृती नाही. त्यामुळे आपल्याकडची ही परंपरा टिकून राहावी. सत्तेचा खेळ सुरूच राहील. सरकारे येतील आणि जातील. पक्ष बनतील आणि तुटतील. पण हा देश राहिला पाहिजे. या देशातील लोकशाही अमर राहिली पाहिजे. आजच्या वातावरणात हे काम कठीण आहे”, असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते.

हेही वाचा >> अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची पहिली भेट कुठे झाली होती? वाचा रंजक किस्सा

“आम्हाला जनाधार नाही. आम्हाला लोकांचं व्यापक समर्थनही नाही. तुम्ही आम्हाला सोडून सरकार स्थापन करू इच्छिता. ते सरकार टिकाऊ असेल असं तुम्हाला वाटतं. मला तर सरकार टिकण्याचं लक्षण दिसत नाही. पहिलं तर सरकारचा जन्म होणंच कठीण आहे. जन्मानंतर त्यांचं जिवंत राहणं कठीण आहे. तसंच हे सरकार अंतर्विरोधातच घेरलं गेलेलं आहे. त्यामुळे हे सरकार देशाला किती लाभदायक ठरेल हा एक मोठा प्रश्नच आहे. या परिस्थितीत तुम्हाला प्रत्येकवेळी काँग्रेसकडे जावं लागेल. त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल. संसदेतही आपण समन्वय साधत असतो. तुम्हाला अख्खा देश चालवायचा आहे. त्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा आहेत. आम्ही आमच्या देशाच्या कार्यात कार्यरत राहू. आम्ही संख्याबळाच्या समोर मान झुकवत आहोत आणि आम्ही विश्वास देतो की जे कार्य हाती घेतलं आहे ते राष्ट्रउद्देश पूर्ण करत नाही तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी आज माझ्या पदाचा राष्ट्रपतींकडे राजीनामा देत आहे”, असं म्हणत अटलबिहारी वाजपेयी यांनी भाषण संपवलं. पण त्यांच्या भाषणानंतर संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

अटल बिहारी वाजपेयींच्या या भाषणाला जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, २५ वर्षानंतरही देशातील राजकीय परिस्थिती बदललेली नाही. काळानुसार फक्त पात्र आणि जागा बदलत गेल्या. परिस्थिती मात्र तीच राहिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayees epic speech in lok sabha 19 no confidence motion maindc sgk
First published on: 05-05-2024 at 16:30 IST