Shashi Tharoor Colombia Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानात लष्करी कारवाई करून भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती देण्यात आली. दहशतवाद्यांविरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेचं काही देशांनी समर्थन केलं. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तेथील मृतांप्रती कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारचे शिष्टमंडळ देशात पोहोचल्यानंतर काही तासांतच कोलंबियाने आपला सूर बदलला आहे. पाकिस्तानबद्दल केलेलं ते विधान कोलंबियाने मागे घेतलं आहे. केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळं परदेशात पाठवली आहेत. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर करीत आहेत. आज शनिवारी, शशी थरुर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ कोलंबियाला गेले होते. या शिष्टमंडळात भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कलिता, शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा, लोक जनशक्ती पार्टीचे शांभवी, तेलुगु देशम पक्षाचे खासदार जीएम हरीश बालयोगी आणि अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरणजीत सिंग संधू यांचा समावेश होता.
शशी थरूर यांनी काय सांगितलं?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सातत्याने पाकिस्तानला लक्ष्य करीत आहेत. केंद्र सरकारने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर ते विदेशात भारताची बाजू परखडपणे मांडताना दिसून येत आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तेथील मृतांप्रती संवेदना व्यक्त करण्याच्या कोलंबियाच्या भूमिकेवर भारतीय शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. “एकीकडे दहशतवादी आणि दुसरीकडे निष्पाप नागरिक यांच्यात कोणतीही समानता शक्य नाही. कोलंबियाच्या आधीच्या विधानाबद्दल आमची एकमेव निराशा म्हणजे त्यांनी या फरकाकडे दुर्लक्ष केले आहे,” असे नाराजी थरूर यांनी कोलंबिया सरकारकडे बोलून दाखवली.
आणखी वाचा : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचं मुस्लीम नेत्याकडून कौतुक; काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?
कोलंबियाने अखेर ते विधान घेतलं मागे
भारतीय शिष्टमंडळाने सांगितलेली माहिती ऐकून कोलंबियाला अखेर उपरती झाली. बोगोटा येथील कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा विलाविचेंसियो म्हणाल्या, “आज आम्हाला या संघर्षाविषयी व काश्मीरमध्ये नेमके काय झाले याविषयी सविस्तर माहिती मिळाली आहे. त्यामुळे आम्ही आता संवाद पुढे सुरू ठेवू शकतो. आम्ही पाकिस्तानबद्दल संवदेना व्यक्त करणारे आमचे विधान मागे घेत आहोत.” दरम्यान, कोलंबियाने त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर खासदार शशी थरूर यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, कोलंबियाने आम्हाला निराश करणारे त्यांचे विधान मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता भारताचा दृष्टिकोन समजला आहे. ते आम्हाला पाठिंबा देऊन एक नवीन विधान जारी करतील.
कोलंबियाच्या निर्णयाचे भाजपा खासदारकडून स्वागत
दरम्यान, बोगोटा येथील एका पत्रकार परिषदेत शशी थरूर यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केली आणि ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्टे अधोरेखित केली. या भेटीदरम्यान, भारतीय शिष्टमंडळाने कोलंबियाचे माजी राष्ट्रपती आणि सध्या लिबरल पक्षाचे नेते (कोलंबियाच्या संसदेत सर्वात मोठा पक्ष) सिजर गावीरीया यांचीही भेट घेतली. या शिष्टमंडळात असलेले भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनीही कोलंबियाच्या या भूमिकेतील बदलाचे स्वागत केले. ते म्हणाले की, उपपरराष्ट्रमंत्री आणि अधिकाऱ्यांनी आम्ही मांडलेल्या मुद्द्यांमधील सत्य समजून त्यांनी केलेले पूर्वीचे वक्तव्य मागे घेतले. कोलंबियाने भारताच्या भूमिकेशी पूर्ण सहानुभूती व्यक्त केली आहे आणि ही भारतासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे.
कोलंबियाची भूमिका भारतासाठी का महत्वाची?
तसं पाहता, कोलंबिया हा देश फार शक्तीशाली नाही. परंतु, लवकरच तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य होणार आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केल्यानंतर कोलंबियाने तेथील मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या. त्यांचे पाकव्याप्त काश्मीरबाबतही वेगळेच मत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे भारताला कोलंबियाचा विचार बदलणे गरजेचे होते. कारण, पाकिस्तानला घेरण्यासाठी संयुक्त राष्ट्रातील देशांना हाताशी धरून भारताला व्यूहरचना करण्यासाठी गरज आहे.
हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर का आले आहेत?
पनामा दौऱ्यावेळी शशी थरूर काय म्हणाले होते?
पनामा दौऱ्यावर असताना थरूर यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचं तोंडभरून कौतुक केलं होतं. “२०१६ मध्ये भारताने पहिल्यांदाच भारत व पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषा ओलांडली होती. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. कारगिल युद्धावेळीही भारताने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यावेळी भारतीय जवानांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी भारताने केवळ नियंत्रण रेषाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून एक पाऊल पुढे टाकले होते,” असं थरूर म्हणाले होते.
“शशी थरूर हे भाजपाचे सुपर प्रवक्ते”
दरम्यान, शशी थरूर हे ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करून केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळत असल्याने काँग्रेसचे नेते त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत. काँग्रेस प्रवक्ते उदित राज यांनी थरूर यांचा उल्लेख थेट भाजपाचे सुपर प्रवक्ते म्हणून केला आहे. “शशी थरूर हे भाजपाचे सुपर प्रवक्ते आहेत. भाजपाच्या लोकांना जेवढं बोलता येत, मोदींची चमचेगिरी, त्यांचे गुणगान करता येत नाही, तेवढं शशी थरूर करीत आहेत. यापूर्वीही सर्जिकल स्ट्राईक होत होत्या; पण सर्वसामान्य जनतेला त्याबद्दल काहीच माहीती नव्हते. केंद्र सरकार भारतीय सैन्यदलाच्या कारवाईचा राजकीय फायदा घेत आहे. काँग्रेस पार्टीने असे कधीही केले नाही. शशी थरूर यांचा हा पब्लिसिटी स्टंट आहे,” असं उदित राज यांनी म्हटलं आहे.