नांदेड : तब्बल १५ वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काही महिन्यांपुरते एकत्र आलेले खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात आता जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतील प्रमुख कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षांमध्ये दाखल करुन घेण्याची स्पर्धा लागली आहे.

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी चिखलीकर यांना भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करावा लागला. या पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी भाजपा फोडण्याचे अभियान सुरू केले आहे.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्यासह लोहा – कंधार भागातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना चिखलीकर यांनी ‘राष्ट्रवादी’ मध्ये दाखल करुन घेतले. त्यानंतर नायगाव तालुक्यातील भाजपाचे तरुण नेते शिवराज पाटील होटाळकर व त्यांच्या अनेक समर्थकांनी गुरुवारी मुंबईला जाऊन ‘राष्ट्रवादी’त प्रवेश घेतला. होटाळकर हे जि.प.चे माजी सभापती आहेत. भाजपाच्या स्थानिक आमदारांसोबत काम करणे शक्य नसल्यामुळे आपण पुन्हा ‘स्वगृही’ परतलो आहोत, असे त्यांनी शुक्रवारी येथे परतल्यावर स्पष्ट केले.

‘राष्ट्रवादी’ त फूट पडल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकार्यांनी पक्ष संस्थापक खासदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. अजित पवार यांना तेव्हा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, पण या पक्षातर्फे चिखलीकर आमदार झाल्यावर त्यांनी पक्ष वाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून जिल्ह्यातील भाजपा आणि इतर पक्षांतील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून खासदार अशोक चव्हाण यांना शह देण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.

खासदार चव्हाण यांना नेता मानणारे लोहा न. प. चे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी यांनीही अलीकडे चिखलीकरांमार्फत ‘राष्ट्रवादी’ त प्रवेश केला. शेकापचे एकेकाळचे प्रमुख नेते, दिवंगत केशवराव धोंडगे यांचे पुत्र अॅड. मुक्तेश्वर यांनीही ‘राष्ट्रवादी’ त प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून चिखलीकरांच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’ त होणाऱ्या भरतीच्या बातम्या येत असताना खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ‘राष्ट्रवादी’ चे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचे बंधू डॉ. सुनील धोंडगे आणि माजी जि. प. सदस्य विजय धोंडगे यांचा भाजपामध्ये प्रवेश घडवून आणला. त्याआधी चव्हाण यांनी काँग्रेसच्या दोन तालुकाध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्याना आपल्या पक्षात दाखल करून घेतले होते.

जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षांना उतरती कळा लागत असताना, महायुतीत असलेल्या दोन पक्षांच्या दोन नेत्यांत मात्र पक्ष विस्ताराची स्पर्धा लागल्याचे दिसत असून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करुन चव्हाण व चिखलीकर कार्यरत झाल्याचे मानले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिखलीकरांच्या कन्या भाजपमध्येच

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशाचे अभियान सुरु केलेले असताना त्यांच्या कन्या प्रणिता देवरे- चिखलीकर ह्या मात्र अद्यापही भाजपामध्ये असून त्यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे.