लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : भारतीय जनता पार्टीने आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. ज्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण या दोन मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. मात्र पेण मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यावी यावरून पक्षात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

पेण मतदारसंघात भाजपचे रविंद्र पाटील हे आमदार आहेत. एकदा काँग्रेसकडून तर एकदा भाजपकडून असे दोन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मात्र तरीदेखील भाजपने त्यांची उमेदवारी पक्षाने पहिल्या यादीत जाहीर केलेली नाही त्यामुळे पक्षात त्यांच्या उमेदवारी वरून संभ्रम निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात महायुतीत बंडाचे वारे

पाटील कुटुंबातील तीन जण यावेळी पेण मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. रविंद्र पाटील हे स्वतः पुन्हा एकदा निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा मुलगा वैकुंठ पाटील आणि सून प्रितम पाटील हे दोघे देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे पाटील कुटुंबातून उमेदवारी कोणाला द्यावी यावरून पक्षातच मतभिन्नता दिसून येत आहे.

वैकुंठ पाटील हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांनी जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून यापुर्वी काम केले आहे. तर प्रितम पाटील यांनी पेण नगर परिषदेचे दोन वेळा नगराध्यक्ष पद भुषविले आहे. त्यामुळे दोघेही उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. पाटील कुटुंबातील विसंवादामुळेच पक्षाने पेण येथील उमेदवार जाहीर करणे टाळले असल्याची चर्चा मतदारसंघात सरू झाली आहे.

आणखी वाचा-Onion Belt in Maharashtra: कांदा उत्पादक पट्ट्यात भाजपा यावेळी कशी कामगिरी करणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून पेण मतदारसंघाकडे पाहीले जात आहे. मात्र एकाच कुटुंबातील तीन इच्छुक उमेदवार तयार झाल्याने, पक्षाने आज उमेदवारी जाहीर करणे टाळले आहे.