कर्नाटक राज्यात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती विजय मिळवला होता. आता मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांत लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठीही या पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. असे असतानाच कर्नाटक करकार सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या आरोपांची गंभीर दखल घेत काँग्रेसच्या हायकमांडने भ्रष्टाचार करणाऱ्यांप्रती कसलीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश कर्नाटकचे मंत्री, आमदार तसेच नेत्यांना दिला आहे.
कर्नाटकात बदलीसाठी पैशांची मागणी?
कर्नाटकमध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजपा तसेच जनता दल (सेक्यूलर) पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. सरकारी अधिकाऱ्याच्या बदल्यांसाठी कर्नाटकचे मंत्री रोख रक्कम मागत आहेत, असा दावा भाजपा तसेच जनता दल सेक्यूलर या पक्षांनी केला आहे. विशेष म्हणजे जेडीएस पक्षाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी ४ जुलै रोजी विधानसभेत एक ‘दरपत्रक’ दाखवून कर्नाटकचे मंत्री भ्रष्ट आहेत, असा गंभीर आरोप केला.
भ्रष्टाचार केल्यास गय केली जाणार नाही
त्यानंतर आता कर्नाटक आणि दिल्लीतील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, काँग्रेसचे महासचिव तथा कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यासह ३० अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत भ्रष्टाचाराची प्रकरणं अजिबात सहन केली जाणार नाहीत, असे काँग्रेस हायकमांडे कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. या बैठकीत आागामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.
“विजयासह आपल्यावर काही जबाबदाऱ्याही येत असतात”
“भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी आपण सत्तेत आलो आहोत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कोणत्याही मंत्र्यावर दया केली जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना सांगितले आहे,” असे या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्याने सांगितले आहे. तर आपण स्पष्ट बहुमतात कर्नाटकमध्ये विजयी झालो आहोत. या विजयासह आपल्यावर काही जबाबदाऱ्यादेखील आलेल्या आहेत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकच्या नेत्यांना सांगितले. विशेष म्हणजे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनी सिद्धरामय्या, शिवकुमार तसेच कर्नाटकच्या मंत्र्यांसोबत वेगळी बैठकही घेतली.
कर्नाटकच्या मंत्र्यांविरोधात तेथील नेत्यांची तक्रार
या बैठकीत कर्नाटकमधील नेत्यांनी मंत्री आमचे काम करण्यासाठी उपस्थित नसतात, अशी तक्रार हायकमांडला केली आहे. नेत्यांच्या या तक्रारीवर काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी मंत्री अन्य कामांत व्यस्त असतात. दिवसभर त्यांच्यामागे खूप काम असते, असे सांगितले. त्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेत्याने मंत्री व्यस्त असले तरी, आमच्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर अशा कामांसाठी मंत्र्यांनी एखादा दिवस राखून ठेवावा, असा तोडगा काढण्यात आला.
लोकसभेत २८ पैकी २० जागा जिंकण्याचे लक्ष्य
दरम्यान, या बैठकीबाबत सुरजेवाला यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाने लोकसभेच्या प्रत्येक जागेसाठी एक मंत्री आणि वरिष्ठ नेत्याची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागांपैकी २० जागांवर विजय मिळवणे हे काँग्रेसचे लक्ष्य आहे,” अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.