scorecardresearch

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पदयात्रेतून काँग्रेसची पक्षबांधणी आणि जनमानसाला साद

स्वातंत्र्यसैनिक व त्यांची मुले, तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या आई-वडिलांना व्यासपीठावर सन्मानाने बोलावले,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पदयात्रेतून काँग्रेसची पक्षबांधणी आणि जनमानसाला साद

सुहास सरदेशमुख

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना काँग्रेस पक्षाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ७५ किलोमीटरची पदयात्रा केली. स्वातंत्र्यसैनिक व त्यांची मुले, तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या आई-वडिलांना व्यासपीठावर सन्मानाने बोलावले, त्यांचा सत्कार केला. त्यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र व्यासपीठाच्या खाली बसले. ‘आम्ही काही भाषणे करायला आलो नाहीत, पण भविष्यात भारताचा श्रीलंका होणार नाही, याची काळजी घ्या बरं !’, असा संदेश त्यांनी आवर्जून दिला. ९ ऑगस्ट क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिनापर्यंत या पायी यात्रेदरम्यान मतदारांच्या चेहऱ्यावर सकारात्मकता दिसत असल्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकीय पटावर मोठे शून्य आहे. ना आमदार, ना खासदार. महाविकास आघाडी सरकार असतानाही विधान परिषदेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून कोणाचाही विचार झाला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवणे हे इथे एक आव्हानच होते. मात्र, ‘आझादी का गौरव’ या कार्यक्रमातून औरंगाबाद जिल्ह्यातील २०० गावांशी संपर्क करत ५८ गावांपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी गावातच मुक्काम केला. ही सारी बांधणी करताना स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य आणि सैनिकांच्या पालकांना व्यासपीठावर बसविले. यात्रेचा उद्देश सांगितला. राष्ट्रध्वजांचे प्रेम सर्वांनाच आहे. पण तो राष्ट्रध्वज घडवताना केलेला राजकीय संघर्ष काँग्रेसचा हाेता. ब्रिटिशांविरोधातील तो काँग्रेसचा लढा देणाऱ्या महात्मा गांधी यांनी केलेल्या आंदोलनाची उजळणीही काँग्रेसच्या नेत्यांनी केली. ‘ जीएसटी’चा भार अधिकाधिक होताना मीठावर कर लावण्याच्या विरोधातील आंदोलनाची आवर्जून आठवण करून देण्यात आली. या सात दिवसांत ‘याद करो कुर्बानी’ म्हणत काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत होते – ‘पूर्वी ५० किलो खताची पिशवी ५०० रुपयांना मिळायची. आता ती १५०० रुपयांना मिळते. त्याचे वजनही आता ४० किलोच झाले आहे. आता दूध, दह्यावर जीएसटी आहे. बघा कर परवडतो का ? पुन्हा हे सारे सांगितले नाही असे म्हणू नका. जर देशाचा श्रीलंका होऊ द्यायचा नसेल तर थोडे काँग्रेसकडे लक्ष द्या’ या बोलण्यानंतर मतदारांमध्ये काँग्रेसविषयीची सहानुभूती वाढत असल्याचे दिसून येते, असा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार कल्याण काळे यांनी केला. या अभियानाची सुरुवात लाडसावंगी येथील काशीराम म्हातारबा मस्के हुतात्मा स्मारकातून करण्यात आली. प्रत्येक गावात पायी जाताना भेटतील त्या व्यक्तींना काँग्रेसची परंपरा आणि भाजपची वर्तणूक समजावून सांगण्यात आली. 

पाऊस चांगला सुरू असल्याने खत टाकताना त्याचे वाढलेले दर आणि त्यावरुन केंद्र सरकारचे सुटलेले नियंत्रण यावर भाष्य करत काँग्रेसने काढलेली यात्रा यशस्वी ठरल्याचा दावा केला जात आहे. भाजपकडून होणारी बांधणी, सत्ताधारी पक्षात येणाऱ्यांचे प्रमाण यामुळे भाजपच सशक्त असल्याचा संदेश आवर्जून पसरविला जात असताना काँग्रेसकडूनही मतदारसंघ बांधणीचे प्रयोग सुरू झाले आहेत. 

खोटे बोलत असेल तर आणा हरिभाऊंना 

यात्रेदरम्यान काँग्रेसने फुलंब्री मतदारसंघात चांगलाच जोर लावला हाेता. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्याकडे आहे. त्यामुळे या यात्रेदरम्यान जिल्हाध्यक्ष कल्याण काळे म्हणायचे, खताचे दर वाढले की नाही, गॅसचे दर वाढतच गेले की नाही, दूधावर जीएसटी लावला की नाही ? सैन्यभरती २० वर्षांवरुन चार वर्षांवर आणली की नाही ‌?, हे जर खोटे असेल तर बोलवा हरिभाऊंना, त्यांना विचारू हे सारे प्रश्न. मग लोकांनाही पटू लागायचे. आझादी गौरव यात्रेतून अनेक ठिकाणी काँग्रेसने अशीच बांधणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातील यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही सहभागी झाले होते. 

सर्वसामान्यांना झळ बसल्यानेच यात्रेला प्रतिसाद

‘‘ २०१४ नंतर काँग्रेस नेत्यांची भाषणे ऐकताना मतदारांच्या चेहऱ्यावर फारसे बदल दिसून येत नसत. आता मात्र भाजप सरकारकडून उचलल्या गेलेल्या पावलांमुळे सर्वसामान्यांना झळ बसत असल्याने या यात्रेला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. २०० गावांपर्यंत पायी पोहोचण्याचा हा अनुभव अधिक समृद्ध करणारा होता. 

कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.