नागपूर : केद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात भूमिका घेणे विरोधी पक्षातील नेते टाळतात. टीका केली तरी तरी राजकीय स्वरुपाची असते, ती व्यक्तिगत नसते. कारण गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेले सौहार्दाचे संबध. ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या रस्ते व महामार्ग खात्याच्या माध्यमातून गडकरी पक्षभेद न पाळता प्रत्येकाला निधी देतात.
रस्ते, महामार्ग सर्वांना हवे असतात. त्यामुळे सर्वांशी त्यांची मैत्री घट्ट. पण त्यांच्याच नागपुरातील कॉंग्रेसचा एक आमदार त्यांना थेट भिडतो. त्यांच्या प्रकल्पाला जाहीर विरोध करतो. त्यांचे नाव आहे विकास ठाकरे. लोकसभा निवडणुकीतही ठाकरे विरुद्ध गडकरी लढत रंगली होती. तेच ठाकरे शनिवारी गडकरी यांना त्याच्या घरी जाऊन भेटले. निमित्त होते उत्तराखंडच्या रस्त्याचे. राजकारणात जे दिसते त्यावर विश्वास ठेवायचा नसतो, पडद्या आड काय घडते हे महत्वाचे असते. ठाकरे यांनी गडकरींची भेट घेणे याला त्यामुळेच राजकीय वर्तुळात महत्व आहे.
गडकरी कट्टर भाजपचे तर ठाकरे कट्टर काँग्रेसचे, दोघांचेही पक्षांतर्गत विरोधक अधिक आणि इतर पक्षात मित्र भरपूर. गडकरी राष्ट्रीय राजकारणातील खेळाडू तर ठाकरे काँग्रेसचे स्थानिक नेते. त्यामुळे या दोघांचे राजकीय वैर तसे नव्हते. पण २०१४ मध्ये गडकरींनी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठऱवले आणि तेथून या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष सुरू झाला.कारण ठाकरेंचे राजकीय गुरू विलास मुत्तेमवार हे या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. ठाकरेंनी मुत्तेमवार यांच्यासाठी सर्वप्रतिष्ठा पणाला लावली तर गडकरी प्रथमच लोकसभा निवडणूक लढत होतो त्यामुळे सर्व ताकद त्यांनी झोकून दिली होती.काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा उचलत गडकरी यांनी मुत्तेमवार यांचा पराभव करीत दिल्ली गाठली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
दुसरीकडे २०१४ नंतर नागपूर शहरात भाजपच्या ‘आरे ला लकारे ने ’उत्तर देण्याची तागद निर्माण करून ठाकरे यांनी काँग्रेसला जीवंत ठेवले. एकीकडे भाजपला विरोध करताना ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले. २०१९ मध्ये ते आमदार झाले. पण गडकरींशी त्यांचे पटले नाही. मेट्रो प्रकल्प असो, मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांचा भ्रष्टाचार असो किंवा नागपुरात एक लाख कोटींची विकास कामे केल्याचा गडकरींचा दावा असो या सर्व मुद्यांवर ठाकरे यांनी गडकरींवर थेट आरोप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कर गडकरींनी नागपुरात बांधलेले उड्डाण पुल असो की सिमेट रस्ते कसे निरर्थक ठरले, शहराचा सत्यानाश त्यांनी केला, असे गंभीर आरोप ठाकरे यांनी केले होते.
अलीकडेच गडकरींच्या दाभ्यातील प्रकल्पाला एनआयटीने दिलेल्या जागेवरही ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. प्रकरण विधिमंडळातही गाजले होते. एकूणच ठाकरेंचा गडकरी विरोध दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागला होता. पण अचानक असे काय झाले की ठाकरे चक्क गडकरींच्याच घरी जाऊन भेटून आले. त्यांच्या मतदारसंघातील रस्ते व तत्सम प्रश्नासाठी ते गेले आले असते तर या भेटीला तो आधार ठरला असता. पण ठाकरे हे उत्तराखंडमधील रस्त्यासाठी गडकरींना भेटले. या दोघांच्या भेटीचे छायाचित्र ठाकरे यांच्याकडूनच माध्यमांकडे पाठवण्यात आले. त्यात ठाकरेंची छबी प्रसन्न दिसत असली तर गडकरींच्या चेहऱ्यावरचा अवघडलेपणा लपून राहिलेला नाही. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती ? हा प्रश्न उरतो.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर
महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत या निवडणुकीत अटळ आहे. शहरअध्यक्ष असल्याने काँग्रेसकडून विकास ठाकरे यांची भूमिका तिकीट वाटपात महत्वाची ठरणार आहे, दुसरीकडे भाजपमध्ये या निवडणुकीची सर्व सुत्रे गडकरी यांच्याकडे असते. १५ वर्षापासून भाजप महापालिकेतसत्तेत आहे तर यंदा ती खेचून आणण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे, वर्षभराने पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे,यातही भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष अटळ आहे. या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची भेट होणे ही राजकारणाच्या नव्या समीकरणाची नांदी तर नाही ना ? अशी चर्चा आहे.