आसाममध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षनेतृत्वासाठी तरुण चेहऱ्याची निवड केली आहे. काँग्रेसने सोमवारी गौरव गोगोई यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. लोकसभेच्या विजयानंतर गौरव गोगोई यांना नवीन अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवताना काँग्रेसने मुख्यमंत्री हिमंता सरमा यांना खुलं आव्हान दिलं आहे. सरमा आणि गोगोई यांच्यामध्ये आधीपासूनच वाद आहेत. तसंच गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात शाब्दिक युद्धही सुरू आहेच.
जोरहाटचे खासदार गौरव गोगोई आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या बरोबर एक वर्ष आधी आणि पक्षाची परिस्थिती डळमळीत असताना हा पदभार स्वीकारत आहेत. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत आसाममधील १४ पैकी फक्त तीन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. यावेळी सरमा यांनी त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. गेल्या वर्षी झालेल्या महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने पाचही जागा गमावल्या आणि अलीकडच्या पंचायत निवडणुकीतही त्यांची कामगिरी निराशाजनक झाली.
गोगोई यांच्या नियुक्तीव्यतिरिक्त काँग्रेसने तीन कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. सारुखेत्रीचे आमदार जाकीर हुसेन सिकदर, सरूपथरचे माजी आमदार रोसेलिना तिर्के आणि अभयपुरी दक्षिणचे आमदार प्रदीप सरकार. सिकदर हे बंगाली वंशाचे मुस्लीम आहेत, तर तिर्के हे आसाममधील चहाच्या व्यवसायातील टोळीचे नेते आहेत आणि सरकार हे बंगाली हिंदू आहेत. हे सर्व जण राज्यातील मतदान करणाऱ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात.
राज्यातील प्रचार समितीचा कार्यभार माजी काँग्रेस अध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांच्याकडे आणि समन्वय समितीचा कार्यभार विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांच्याकडे देण्यात आला आहे. काँग्रेसने नागावचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आणि प्रचार समितीची जबाबदारी मोहम्मद रकीबुल हुसेन यांच्याकडे दिली आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये ४१ वर्षीय गोगोई यांनी काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाचे या नियुक्तीबद्दल आभार मानले आहेत. “आसाममधील काँग्रेस पक्षातील इतक्या समर्पित आणि प्रेरणादायी ज्येष्ठ नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत काम करणे हा एक आशीर्वादच आहे. त्यांच्या अनुभवाने आणि पक्षाप्रती असलेल्या समर्पणाने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. जोई ऐ एक्सोम! जय हिंद!”, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे.
सैकिया आणि बोरदोलोई यांना पीसीसी (प्रदेश काँग्रेस समिती) प्रमुखपदासाठीचे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जाते. आसाममधील एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, पक्षाच्या एका मोठ्या गटाने गोगोई यांना आसाममध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी आग्रह धरला होता.
“कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपाच्या विरोधी पक्षांमध्ये अशी धारणा आहे की, गोगोई सरमा आणि त्यांच्या पक्षाला तोंड देऊ शकतात. ते एक कुशल संघटक असल्याचे सिद्ध करतील की नाही हे वेळच सांगेल”, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. शिवाय त्यांनी असेही कबूल केले की, “मुख्यमंत्री सरमा गोगोईंच्या कुटुंबाबद्दल जे काही बोलत आहेत त्याचा सामना कसा करावा हेदेखील काँग्रेससमोर मोठं आव्हान आहेच, कारण भाजपा हा मुद्दा पुढे आणखी तीव्रतेने ताणू शकते.”
आसाममधील काँग्रेसच्या इतर नेत्यांचं असं मत आहे की, नेतृत्व बदलामुळे पक्षातील निराशाजनक परिस्थिती वाढूही शकते. “हे खरे आहे की, काँग्रेस सध्या चांगल्या स्थितीत नाही आणि निवडणुकीसाठी खूप कमी वेळ आहे. पंचायत निकालानंतर पक्षाचे बरेच कार्यकर्ते निराश झाले आहेत, त्यामुळे त्यांना आता लढण्यासाठी थोडा ऑक्सिजन मिळाला पाहिजे,” असे एका नेत्याने सांगितले.
गोगोई यांच्या सकारात्मक बाजूबाबत बोलताना एका नेत्याने म्हटले की, “एक म्हणजे तरुण मतदारांना त्यांचे आवाहन, तर दुसरे म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही कलंक नाही. गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांनी केलेल्या पक्षबदलामुळे लोकांना नेत्यांच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी गोगोई यांच्याविरोधात हे असंच काहीसं शस्त्र उगारलं. यावरून असे दिसून येते की, काँग्रेसचा हा किंवा तो नेता प्रत्यक्षात भाजपाशी संगनमत करून काम करत असावा. मात्र, आसामच्या लोकांना विश्वास आहे की गौरव गोगोई काँग्रेस आणि त्यांच्या भाजपाविरोधी भूमिकेशी समन्वय साधून राहतील.”
“आसाममधील विधानसभा लढाई दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढाई ठरणार आहे. “राज्यातील राजकारण आणि पुढील वर्षीचा प्रचार सरमा विरुद्ध गोगोई यावर केंद्रित असेल. गोगोईंचं नेतृत्व हे अप्पर आसाममध्ये बरंच प्रभावशाली आहे. गोगोई वैयक्तिकरित्या खूप लोकप्रिय नेते आहेत आणि याची पक्षाला मदतच होईल”, असे आसाममधील एका काँग्रेस नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
जुने शत्रू
सरमा आणि गोगोई यांच्यातील शत्रुत्व ते काँग्रेसमध्ये असल्यापासूनचे आहे. राज्यात पक्षाची सूत्रे हाती घेण्याची सरमा यांची इच्छा होती. गौरव गोगोई यांनी त्यांचे वडील आणि काँग्रेसचे तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांची प्रतिमा लोकप्रिय झाल्यानंतर सरमा यांनी हुकूमशाही कुटुंबकेंद्रित राजकारण अशी टीका करत काँग्रेस पक्ष सोडला.
गेल्या काही महिन्यांत सरमा यांनी गोगोई आणि त्यांची पत्नी एलिझाबेथ यांच्यावर आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप केला. फेब्रुवारीमध्ये त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. गोगोई यांनी अनेक वेळा सरमा आणि त्यांची पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्यावर राज्यात जमीन बळकावण्याचा आणि भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये गौरव गोगोई यांनी मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाचे नेतृत्व केले होते.
२०२४ च्या लोकसभा निकालानंतर सरमा यांनी त्यांच्यावर हल्ले सुरू केले. गोगोई यांनी जोरहाटमधून विजय मिळवत भाजपाच्या विद्यमान खासदारांचा १.४४ लाख मतांनी पराभव केला होता. सरमा यांनी गोगोई यांना पराभूत करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. गोगोईंचं नेतृत्व जोरहाटमध्ये कमकुवत असल्याचे मानले जात होते.