Congress MP Praniti Shinde on PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवार) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे अनेक नेते मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव करीत असून त्यांच्या दीर्घयुष्यासाठी प्रार्थना करीत आहेत. यादरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस हा देशासाठी काळा दिवस असल्याची टीका प्रणिती यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे, त्यामुळे मोदींच्या वाढदिवशीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

प्रणिती शिंदे मोदींबद्दल काय म्हणाल्या?

खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी (तारीख १६ सप्टेंबर) माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाबाबत भाष्य केले. “नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू असून मतांची चोरी होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. माध्यमांचे अधिकारही हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. महायुतीतील अनेक नेत्यांनी प्रणिती यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

प्रणिती शिंदे यांच्या विधानावर भाजपाचा संताप

खासदार प्रणिती शिंदे यांच्या मोदींबद्दलच्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. “काळा दिवस जर तुम्हाला आठवायचा असेल तर आणीबाणीचा दिवस आठवा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा काळा नसून ही काँग्रेसच्या डोळ्यामध्ये आलेल्या आजारपणाची लक्षणे आहेत. त्यांना चांगली गोष्टही काळीच दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही प्रणिती शिंदे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “मला महिलेचा अपमान करायचा नाही. काँग्रेसमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या पंतप्रधानांवर टीका करीत आहेत. त्यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागायला हवी. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या मुलीला समज द्यावी,” असे प्रसाद लाड म्हणाले.

आणखी वाचा : PM Modi Birthday : भाजपा नेत्यांच्या आठवणीतले मोदी; अमित शाह ते देवेंद्र फडणवीस कोण काय म्हणाले?

पंतप्रधानांबद्दलची अशी भाषा चुकीची : राम सातपुते

भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांनीदेखील खासदार प्रणिती शिंदे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. प्रणिती शिंदे या अपघाताने खासदार झालेल्या असून त्या एका लाटेमध्ये निवडून आलेल्या आहेत. देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशा प्रकाराची भाषा वापरणे आणि चुकीचे बोलणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म भारताच्या भूमीला परमवैभवाकडे घेऊन जाण्यासाठी झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाबाबत अशा पद्धतीची टीका करणे ही घाणेरडी आणि विकृत मानसिकता आहे, असे प्रत्युत्तर राम सातपुते यांनी दिले.

मोदी सर्वव्यापी झाले हे काँग्रेसला सहन होत नाही : अजित चव्हाण

प्रणिती शिंदे यांच्या विधानावर भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीला फोनवरून प्रतिक्रिया दिली. प्रणिती शिंदे या राजकारणात खूपच लहान आहेत, हे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे. टीका करणे ही त्यांच्या शिंदे घराण्याची परंपराच आहे. मात्र, या वक्तव्यांची नंतर त्यांना उपरती होते आणि आपण कोणाच्या तरी दबावाखाली बोललो असे ते सांगतात. त्यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांनीही हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद अशी विधाने केली होती. मोदी सर्वव्यापी झाले असल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना सहन होत नाही, कारण त्यांना फक्त एकाच घराण्याचे गोडवे गायची सवय आहे, असं अजित चव्हाण यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसं दिलं प्रत्युत्तर

प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली. “२०१४ पूर्वी देशात अनेक घोटाळे झाले, त्यामध्ये चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा यांसह इतर अनेक घोटाळ्यांचा समावेश होता. पंतप्रधान मोदी यांनी घोटाळेबाजांच्या सरकारला उलथवण्याचे काम केले. त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून ११ वर्षांत मोठे परिवर्तन झाले. मोदींनी विकसित भारताचा नारा दिला आहे, त्यामुळेच काँग्रेस नेत्यांसह त्यांच्या मित्रपक्षांच्या पोटात दुखत आहे”, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींना घडवणारे लक्ष्मणराव इनामदार कोण होते? मोदी त्यांना राजकीय गुरु का मानतात?

मोदींचा वाढदिवस कर्ज काढून का साजरा करत आहात? संजय राऊतांचा प्रश्न

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महायुती सरकारने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. “पंतप्रधान मोदींचा ७५ वा वाढदिवस कर्ज काढून साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी विविध सरकारी योजना राबवण्यात येत आहेत, पण याची काय गरज आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. “जनतेला वाटले तर तेच मोदींचा वाढदिवस साजरा करतील. पंडित नेहरू, महात्मा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनतेकडूनच साजरा केला जातो. मग मोदींचा वाढदिवस सरकारी खर्चातून का करण्यात येत आहे. मोदींनी हे थांबवले पाहिजे. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबले असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणे हा आर्थिक अपराध आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.