विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विरोधी विचारांचे तीन पक्ष एकत्र आले, त्यांनी भाजपला सत्तेवरून दूर करीत सत्तेचा कब्जा मिळवला. शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून त्यांनी निवडणूकपूर्व युती करूनही सत्ता स्थापनेच्या क्षणी भाजपशी फारकत घेऊन भाजपला एकाकी पाडले. कायम सत्तेच्या उबेत वाढलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला पाच वर्षे विरोधी बाकावर बसण्याचा वनवास नकोसा झाला होता. त्यांनी शिवसेनेशी हात मिळवणी केली आणि सत्तेचा वाटाही पदरात पाडून घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता काही घडणार नाही, असे वाटत असतानाच, एकनाथ शिंदे यांच्या तगड्या बंडाने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले आणि भाजपने पुन्हा राज्याच्या सत्तेत शिरकाव केला. सत्तेसाठी एकत्र आलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्ता गेल्यावर एकत्र राहतील का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. सत्तांतरनानंतर झालेल्या विधिमंडळाच्या तिन्ही अधिवेशनात तिन्ही पक्षांची आघाडी म्हणून एकजूट दिसली, परंतु काँग्रेस व शिवसेना यांच्यातील वैचारिक मतभेदामुळे आघाडीत बिघाड होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा – ‘वज्रमूठ’ सभा यशस्वी पण, काँग्रेसमधील नाराजी नाट्याचीच चर्चा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या विरोधात कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात या यात्रेला शिवसेनेने केवळ पाठिंबाच दिला नाही, तर पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे त्यात सहभागी होऊन राहुल गांधी यांच्यासोबत काही पावले चालून आगामी राजकीय वाटचालीतील एकोपाचा संदेश दिला. शिवसेनेचे खासदार संजय राऊतही यात्रेत सहभागी झाले होते. परंतु मध्येच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केलीत, त्याला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर आक्षेप घेतला. सावरकरांचा अपमान करायचा नाही, असा इशारच त्यांनी मालेगावच्या जाहीरसभेतून दिला. त्यामुळे काँग्रेसची पंचाईत झाली. परंतु हा मानापमानाचा व प्रतिष्ठेचा विषय न करता काँग्रेस व राहुल गांधी यांनीही भाजपविरोधी आघाडीच्या एकजुटीच्या आड सावरकर हा मुद्दा येत असेल तर तो सोडून देण्याचे राजकीय शहाणपण दाखविले. इतकेच नव्हे तर, दिल्लीस्थित अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले काँग्रेसचे नेते, के.सी. वेणुगोपाल यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, काही वादाच्या मुद्द्यांवर चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात काडीमोड होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु काँग्रेसने जो राजकीय सामंजस्यपणा व पोक्तपणा दाखविला, त्यामुळे सध्या तरी तसे काही घडले नाही.

वास्तविक पाहता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवी राजकीय समिकरणे जुळवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. तसे काँग्रेस व शिवसेनाचा अनेकदा राजकीय व वैचारिक संघर्ष झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आघाडीच्या प्रस्तावाला काँग्रेस पाठिंबा देईल का हा प्रश्न होता, परंतु काँग्रेस नेतृत्वाने व्यवहारी भूमिका घेतली आणि राज्यात तिन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांची आघाडी अस्तित्वात आली.

हेही वाचा – सीमाभागात मतांच्या फाटाफुटीमुळे एकीकरण समितीत अस्वस्थता

सावरकरांच्या मुद्यावरून काँग्रेस व शिवसेना यांच्यात काहीसे ताणले गेलेले संबंध वेणुगोपाल-ठाकरे भेटीने पूवर्वत झाल्याचा संदेश दिला गेला आहे. या भेटीतून आणखी एक संकेत दिला गेला आहे, तो म्हणजे काँग्रेस व शिवसेना अधिक जवळ येताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थिती करून सत्ताधारी भाजपला घाम फोडला. त्याचवेळी शरद पवार यांनी वेगळाच सूर लावल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकोप्याला तडे जातायत की काय, अशी चर्चा सुरू झाली. परंतु या मुद्यावर काँग्रेसनेही सबुरीची भूमिका घेतली आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पवारांऐवजी राहुल गांधी यांच्या भूमिकेचे जाहीरपणे समर्थन केले. काँग्रेस व शिवसेनेला जवळ आणण्याचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे सावरकर मुद्यावरून काँग्रेस व शिवेसनेचे बिनसले असले तरी, हिंदुत्वाच्या विचारसणीची मक्तेदारी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेस विशेषतः राहुल गांधी जेवढा तीव्र हल्ला चढवितात, तसाच वर्मावर घाव घालणारा हल्ला उद्धव ठाकरेही संघावर चढवतात. संघाचा आणि स्वांतत्र्य लढ्याचा काय संबंध, असा उघड प्रश्न विचारून भाजप वा संघाच्या तथाकथित राष्ट्रवादाचा बुरखा फाडायला ठाकरे मागेपुढे पहात नाहीत. इतकी सडोतोड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कधीच घेत नाही. दुसरे असे की, राजकारणात कोणी कुणाचा कधीच शत्रू वा मित्र नसतो, हे खरे असले तरी, भाजप व शिवसेनेचा वाद खरोखरच टोकाला गेला आहे, त्यामुळे एवढ्यात त्यांच्यात दिलजमाई होईल, असे वाटत नाही. तर काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे आहे, त्यासाठी शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्यक वाटते. त्यामुळेच सावरकरांचा मुद्दा फार ताणून न धरता तो सोडून देऊन शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही वेणुगोपाल यांनी देणे आणि आम्ही दोस्ती निभावतो, ती एका नात्यासारखी असे ठाकरे यांनी वचन देणे, हे भविष्यातील राजकीय वाटचालीतील काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress shiv sena rapprochement increased print politics news ssb
First published on: 19-04-2023 at 13:15 IST