वंचित बहुजन आघाडी (VBA) ने इंडिया आघाडीशी वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रात एकट्याने लोकसभा निवडणूक लढवली. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्यांनी पक्षाची कामगिरी आणि मोदींशी दिलेल्या लढ्यासंदर्भात दिलखुलास बातचीत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत तुमची भूमिका काय?

मला विश्वास आहे की, सर्व ४८ जागांवर निकराची लढत झाली होती. कोणतीही आघाडी मग ती NDA किंवा महाविकास आघाडी (MVA) जिंकली तरी मागील निवडणुकांपेक्षा मार्जिन फारच कमी असेल, जिथे उमेदवार मोठ्या फरकाने जिंकले होते.

वंचित बहुजन आघाडीची कामगिरी कशी झाली असे तुम्हाला वाटते?

आम्ही लढलेल्या ३८ जागांपैकी तीन जागा जिंकणार असल्याचा विश्वास आहे. आमची मतांची टक्केवारी २०१९ मध्ये मिळवलेल्या ६.७५ टक्क्यांवरून वाढली आहे.

हेही वाचाः ‘लक्ष्मी भंडार योजने’वरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये का जुंपली आहे?

मागील मतदानाच्या तुलनेत तुम्ही या मतदानातील काय फरक सांगू शकता?

मोदींनी या निवडणुकांचे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रूपांतर केले, कारण प्रचार जोरदार होता. वैयक्तिक हल्ले झाले आणि पंतप्रधानांनी वापरलेली भाषा घृणास्पद होती. त्यांनी पंतप्रधानपदाचा दर्जा खाली आणला. केंद्रीय एजन्सी किती असुरक्षित आहेत आणि त्या सत्ताधारी सरकारची हत्यारे कशी झाली आहेत हेही यातून समोर आले आहे.

पंतप्रधानांनी यापूर्वीही त्यांच्या पक्षांचा प्रचार केला आहे का?

होय, प्रत्येक पंतप्रधानांनी प्रचार केला आहे. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी फक्त लोकसभा निवडणुकीत प्रचार केला आणि विधानसभा निवडणुकीत दोन-दोन सभा घेऊन आपली उपस्थिती दर्शवली. मोदींच्या बाबतीत त्यांनी जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार केला. विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते असेच करतात. प्रत्येक मतदानाला त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप दिले आहे.

त्याचा भाजपाला फायदा होणार नाही का?

मला वाटते लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नुकसान होईल, तर देशभरातील प्रादेशिक पक्ष चांगले प्रदर्शन करतील. २०१९ मध्ये कमी पडलेल्या काँग्रेसलाच आता याचा फायदा होईल. मतदानाचे आणखी दोन टप्पे बाकी असल्याने आकड्यांचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. भाजपाच्या ‘४०० पार’ मिशनला मोठा फटका बसणार आहे.

लोकशाही आणि संविधानावर केंद्रित असलेल्या इंडिया आघाडी मोहिमेबद्दल तुमचे काय मत?

इंडिया आघाडीने समर्पक मुद्दे मांडले, पण मला वाटते की, काँग्रेसने प्रचारात म्हणावा तसा मोदींवर हल्लाबोल केला नाही. उदाहरणार्थ, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना लिहिलेले पत्रातून (मालमत्तेच्या वितरणाबाबत) मुस्लिमांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्याची गरजच कुठे होती? भाजपा आणि मोदींचा दलित, मुस्लिम विरोधी आणि गरीब विरोधी चेहरा उघड करण्यासाठी काँग्रेसने भाजपाने दिलेल्या आयत्या मुद्द्यांचा वापर करायला हवा होता. ती उणीव भासत होती.

‘संविधानाला धोका’ या मुद्द्याचा दलितांवर परिणाम झाला का?

नक्कीच, भाजपाच्या विरोधात मतांचे एकत्रिकरण पाहून समाजातील सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही हे दिसून आले. दलित भाजपाला पुन्हा पाठीशी घालणार नाहीत. त्यांना आरएसएसची विचारधारा आणि हिंदु राष्ट्राची कल्पना याविषयी भीती वाटत होती. मोदींच्या विकासाच्या फळीबद्दलही त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

देशभरात मोदी फॅक्टरवर भाजपाची व्होट बँक अवलंबून आहे का?

१० वर्षांच्या मोदी सरकारच्या अपयशावर पांघरूण घालण्याच्या उद्देशाने ही एक धोरणात्मक चाल आहे. मी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये फिरलो आहे, जिथे मी तरुणांना बेरोजगारीचे प्रश्न सतावत आहेत. वस्तू आणि सेवा कर (GST) मुळे लघु गुंतवणूकदार आणि उद्योग संतप्त झाले आहेत, तर महागाई ही राज्यांमध्ये मोठी समस्या आहे.

जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे विरोधकांच्या शक्यतांवर परिणाम झाला आहे का?

महाराष्ट्रात संपूर्ण मराठा विरुद्ध ओबीसी ध्रुवीकरण झाले आणि त्याचा काही भागांत भाजपावर परिणाम झाला. भाजपाने जातीयवादी मोहीम सुरू केली होती, जिथे मोदींनी मंगळसूत्र आणि संपत्ती हिसकावून अल्पसंख्याकांना सुपूर्द केल्याबद्दल सांगितले. पंतप्रधानांकडून अपेक्षित असलेली सर्व शालीनता नष्ट झाली असून, मोदींनी आता ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi converted lok sabha elections into gram panchayat elections and crossed the laxman line says prakash ambedkar vrd
First published on: 22-05-2024 at 17:49 IST