दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा अखेरचा आठवडा असून भाजपविरोधात आम आदमी पक्षाच्या मदतीला काँग्रेस धावून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस सर्वच्या सर्व ७० जागांवर लढत असला तरी पक्षाने फक्त ७-८ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘आप’विरोधात राहुल गांधी अचानक आक्रमक झाले असले तरी, त्यामागे काँग्रेसचा स्वतःची ४ टक्के मते कायम राखण्याचा प्रयत्न आहे. त्याचा ‘आप’ला अधिक फायदा होऊ शकेल असे मानले जात आहे.

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. पण, ‘आप’विरोधातील काँग्रेसची प्रचारातील आघाडी टिकू शकली नाही. त्यामागे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचा दबाव कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, ‘द्रमुक’चे सर्वेसर्वा स्टॅलिन या सगळ्यांनी ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला. दिल्लीमध्ये भाजपविरोधात स्वबळावर जिंकण्याची काँग्रेसकडे क्षमता नसल्याने ‘आप’चे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी राहुल गांधी व त्यांच्या सल्लागारांना केली होती व यासंदर्भात स्टॅलिन यांनी राहुल गांधींना फोन केला होता अशी चर्चा दिल्लीमध्ये रंगली होती.

दिल्लीतील प्रचाराची सुरुवात राहुल गांधींनी दोन आठवड्यांपूर्वी मुस्लिमबहुल सीलमपूर भागातून केली होती. पण, त्यानंतर सचिन पायलट वगैरे दुसऱ्या फळीतील नेते वगळता मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी वा राहुल गांधींच्याही सभा झाल्या नाहीत. राहुल गांधींच्या सलग तीन प्रचारसभा रद्द करण्यात आल्या. राहुल गांधींची प्रकृती बिघडल्याचे कारण काँग्रेसकडून देण्यात आले. पण, काँग्रेसने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मोहिमेअंतर्गत बेळगावीमध्ये जंगी सभा घेतली. तिथे या तीन दिग्गज नेत्यांसह अख्खा काँग्रेस पक्ष उपस्थित होता. त्यानंतर पक्षाचे तमाम नेते या मोहिमेच्या सांगता समारंभासाठी मध्यप्रदेशात मऊला गेले. मऊ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव असल्यामुळे तिथे संविधानसंदर्भातील सभा घेण्यात आली. या सर्व काळात काँग्रेसने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता अखेरच्या टप्प्यात काँग्रेस पुन्हा सक्रिय झाला असून बुधवारी राहुल गांधींनी प्रचारसभेत अरविंद केजरीवाल यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. यमुनेतील प्रदूषण, कथित मद्यघोटाळा, ‘आप’ सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी केजरवालांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल गांधींच्या आक्रमकतेमागे काँग्रेसचा ४ टक्के मते कायम राखण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. २०२० मध्ये काँग्रेसला ९ टक्के मते मिळाली होती, त्यामध्ये २०२४ मध्ये ५ टक्क्यांची घट झाली. ही मते ‘आप’ला नव्हे तर, भाजपला मिळाली होती. शेवटच्या पाच दिवसांमध्ये काँग्रेसने धडाक्यात प्रचार केला नाही तर काँग्रेसच्या मतांमध्ये आणखी घट होण्याची भीती असून त्याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने दिल्ली निवडणुकीची रणनिती बदलल्याचे मानले जात आहे.