अकोला : ‘स्थानिक’ निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने संघटनेत फेरबदल केले. वरिष्ठ नेतृत्वाकडून प्रदेश कार्यकारिणीमध्ये नव्या-जुन्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या नादात काँग्रेस अंतर्गत खदखद वाढल्याचे चित्र आहे. प्रदेश कार्यकारिणीतून अनेक ज्येष्ठ प्रस्थापित नेतृत्वाला नारळ देण्यात आल्याने अंतर्गत नाराजी वाढली. पक्ष सोडण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. अकोल्यातून काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसला. माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पडझडीमुळे पक्षाला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची मरगळ दूर करून ‘स्थानिक’ निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नव्याने बांधणी केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. अखेर मंगळवारी रात्री उशीरा काँग्रेसने त्यावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही जुन्या पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले. या कार्यकारिणीत नव्यांचा भरणा अधिक आहे. पक्षातील प्रस्थापित व ज्येष्ठ नेत्यांना हे फारसे रुचले नाही. प्रदेश कार्यकारिणीतून वगळल्याने पक्षांतर्गत अपमानजनक वागणूक मिळत असल्याची भावना ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे. नव्या प्रदेश कार्यकारिणीमुळे पक्षांतर्गत उत्साहाऐवजी नाराजीचे वातावरण दिसून आले. ही कार्यकारिणी जाहीर होताच पक्षाला पहिला मोठा हादरा अकोल्यातून बसला आहे.
अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा गुरुवारी राजीनामा दिला. डॉ.पाटील यांनी काँग्रेसच्या तिकीटावर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत भाजपला काट्याची टक्कर दिली होती. वैयक्तिक, सामाजिक, वैद्यकीय कारणामुळे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे डॉ. अभय पाटील सांगतात. पक्ष सोडला असला तरी विचारधारा सोडलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत डॉ. पाटील यांनी दिलेल्या तुल्यबळ लढतीमुळे पराभवानंतरही काँग्रेसला अकोल्यात नवी उभारी मिळाली होती. डॉ. पाटील यांनी काँग्रेसला ‘राम राम’ करण्यामागे अनेक कंगोरे असल्याचे बोलल्या जाते. प्रदेश कार्यकारिणी जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी डॉ.पाटील यांनी राजीनाम्याचा मुहूर्त का निवडला? असा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी बोलून दाखवले नसले तरी त्यांची नाराजी लपून राहिली नाही. नाना पटोले यांच्या कार्यकारिणीत अभय पाटलांकडे मानाचे प्रदेश सरचिटणीस पद होते. नव्या कार्यकारिणीत त्यांना डच्चू देण्यात आला. शिवाय जिल्ह्यातून प्रदेशवर घेतलेल्या नावांसंदर्भात ज्येष्ठ नेते तथा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून पक्षाने त्यांचे मत देखील विचारात घेतले नसल्याने नाराजी होती, अशी काँग्रेस वर्तुळात चर्चा आहे.
उच्चशिक्षित व मराठा समाजाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. अभय पाटलांनी तडकाफडकी पक्ष सोडल्याने काँग्रेसला धक्का बसला. आगामी निवडणुकांमध्ये त्याचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. डॉ. पाटलांच्या पुढील भूमिकेकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
‘विरोधात काम करणाऱ्यांना पदांचे बक्षीस तर नाही ना?’
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षातील काही नेते व पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केल्याचे आरोप असून यासंदर्भात तक्रारी देखील झाल्या होत्या. काही जणांवर कारवाई सुद्धा झाली. आता मात्र चित्र बदलले. निवडणुकांमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पदांचे बक्षीस तर दिले जात नाही ना? अशी कुजबूत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
‘नवख्यांना थेट प्रदेश, ज्येष्ठ उपेक्षित’
नव्या कार्यकारिणीमध्ये काही अत्यंत नवख्यांना प्रदेशवरील पदे दिल्याने पण पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक दशके पक्षात कार्य करणाऱ्यांना उपेक्षित ठेवले अन् नवख्यांना थेट प्रदेशवर पदांची खिरापत वाटली, अशी तीव्र नाराजी एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. जिल्ह्यातील सात जणांची प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे.