Lok Sabha Election 2024: ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशमधील इंदूरचे काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने आणि त्यांच्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेस आता आक्रमकपणे ‘नोटा’साठी प्रचार करताना दिसत आहे. स्वतःचा कार्यकर्ता निवडणूक रिंगणात नसतानाही काँग्रेस प्रचारावर जोर देत आहे. काँग्रेस कार्यकर्ते भिंतींवर आणि ऑटो-रिक्षांवर पोस्टर चिकटवीत आहेत. ते मशाल रॅली व सभा आयोजित केल्या जात आहेत आणि मतदारांना १३ मे रोजी ‘नोटा’समोरील बटण दाबा आणि भाजपाला धडा शिकवा असे, असे आवाहन करीत आहेत.

भाजपासमोर ‘नोटा’चे आव्हान

इंदूर मध्य प्रदेशातील सर्वांत मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. इंदूरमध्ये २५.१३ लाख मतदार आहेत. काँग्रेस उमेदवाराने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेस ‘नोटा’साठी प्रचार करून भाजपासमोर मोठे आव्हान उभे करताना दिसत आहे. इंदूर ही जागा भाजपासाठी नेहमीच सोपी जागा राहिली आहे. पक्षाने १९८९ पासून ही जागा जिंकली आहे. २०१९ मध्ये भाजपाने ही जागा ६५.५९ टक्के मतांनी जिंकली होती. भाजपाने विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत इंदूरमध्ये काँग्रेसला ३१ टक्के आणि नोटाला ०.३१ टक्का मते मिळाली होती.

हेही वाचा : भाजपाला समर्थन देणारे आणखी १० आमदार काँग्रेसच्या संपर्कात? हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

नोटाचा प्रचार म्हणजे लोकशाहीवर हल्ला

काँग्रेस उमेदवाराने जरी उमेदवारी मागे घेतली असली तरीही अद्याप १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे इथे सुरतसारखी बिनविरोध निवडणूक होणार नाही. काँग्रेसने नोटाला दिलेल्या समर्थनावर भाजपाने टीका केली आहे आणि याला नकारात्मक राजकारण आणि हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे सांगितले आहे.

लालवानी आणि आता नोटाव्यतिरिक्त १३ जण स्पर्धेत आहेत. त्यात माजी संघ कार्यकर्ता, तरुण समाजवादी नेता, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यापैकी नऊ जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. भाजपाने माघार घेण्यासाठी संपर्क साधल्याचे अनेक दावे सुरू असताना, इंदूर भाजपाचे प्रवक्ते दीपक जैन यांनी पक्ष कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

माघार घेण्यासाठी भाजपाने संपर्क साधल्याचा दावा

शर्यतीत असलेल्यांपैकी जनहित पक्षाचे अभय जैन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “माझा पक्ष अद्याप नोंदणीकृत नसल्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. भाजपाने माघार घेण्यासाठी माझ्याकडे संपर्क साधला. मी आधी संघाबरोबर होतो आणि भाजपाविरुद्ध निवडणूक लढवू नये, असे त्यांनी मला सांगितले. पण मी नकार दिला.” दीपक जैन म्हणाले, “त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी असे विधान केले आहे. निवडणूक लढविणार्‍या इतर अपक्ष नेत्यांमध्ये इंदूरच्या स्थानिक न्यायालयात प्रॅक्टिस करणारे पंकज गुप्ता, बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेले स्थानिक कंत्राटदार अयाज अली, स्थानिक व्यापारी अंकित गुप्ता व मुदित चौरसिया, अभियंता अर्जुन परिहार, बांधकाम व्यावसायिक परमानंद तोलानी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी लॅविश दलीप खंडेलवाल व रवी सिरवैया यांचा समावेश आहे.”

पंकज गुप्ता म्हणाले की, त्यांनी याआधी विधानसभा, महापौर आणि नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली आहे आणि ही त्यांची सहावी निवडणूक आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मला भाजपाने स्पर्धेतून माघार घेण्यास सांगितले आणि सरकारी वकीलपदाची ऑफर दिली. पण, मला लोकसेवा करायची आहे.”

निवडणूक रिंगणात कोण कोण?

रिंगणात असलेल्या इतर पक्षांच्या उमेदवारांमध्ये बसपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे व्यापारी संजय सोळंकी यांचाही समावेश आहे. स्थानिक पत्रकार बसंत गेहलोत जनसंघ पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते व सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट)चे अजित सिंह निवडणूक रिंगणात आहेत आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी पवन कुमार यांना ‘अखिलेश भारतीय परिवार पार्टी’ने उमेदवारी दिली आहे. कुमार यांनी दावा केला की, भाजपाने त्यांना माघार घेण्यास सांगितले. तर गेहलोत म्हणाले, “माझ्याकडे विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.”

“इंदूरमध्ये भाजपाला कोणीही हरवू शकत नाही”

१९८९ ते २०१४ दरम्यान सलग आठ वेळा भाजपसाठी इंदूरची जागा जिंकणार्‍या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंदूरमधील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांना इंदूरमधील प्रमुख लोकांकडून कॉल येत होते; ज्यांनी सांगितले की, ते बम यांनी माघार घेतल्यानंतर ‘नोटा’साठी विचार करीत आहेत. त्यांनी बम यांच्या माघार घेण्याला अयोग्य म्हटले. त्या म्हणाल्या, “मला आश्चर्य वाटले. हे घडायला नको होते. याची गरज नव्हती. कारण- इंदूरमध्ये भाजपाला कोणीही हरवू शकत नाही.”

मध्य प्रदेश भाजपचे प्रमुख व्ही.डी. शर्मा यांनी काँग्रेसच्या नोटा आवाहनाला ‘गुन्हा’ असे संबोधले. काँग्रेस नेतृत्वाला लोकशाही कमकुवत करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “तुमचा (काँग्रेस) उमेदवार शेवटच्या क्षणी स्वेच्छेने उमेदवारी मागे घेतो. तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात आणि वरून तुम्ही जनतेला ‘नोटा‘ला मत देण्यास सांगत आहात.”

“भाजपाला धडा शिकविण्यासाठी नोटाला मतदान करा”

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी सोडण्याची अनेक कारणे असू शकतात. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. पण, भाजपाच्या या कृतीला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळूनही मतदारांसमोर आव्हान आहे. इंदूरच्या मतदारांनी भाजपाला धडा शिकविण्यासाठी नोटाला मतदान करावे. ते पुढे म्हणाले, “जर लोकांनी या राजकीय गुन्ह्याला विरोध केला नाही, तर इंदूरच्या राजकारण्यांना जनतेची भीती वाटणार नाही.”

शुक्रवारी इंदूरमधील सत्र न्यायालयाने उमेदवारी मागे घेतलेल्या बम आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नप्रकरणी अटक वॉरंट जारी केले. सरकारी वकील अभिजितसिंह राठोड यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, त्यांच्या वकिलाने वैयक्तिक हजेरीतून सूट मिळावी म्हणून अर्ज केला आणि अर्जात दावा केला गेला की, बम आवश्यक कामासाठी शहराबाहेर आहेत आणि त्यांच्या वडिलांची तब्येत खराब असल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. “परंतु न्यायालयाने पोलिसांना त्यांना अटक करून ८ जुलैपर्यंत न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले,” असे राठोड म्हणाले.

हेही वाचा : राहुल गांधींचे निवडणुकीच्या घोषणेपासून अदाणी-अंबानींवर मौन, पंतप्रधान मोदींच्या या दाव्यात किती सत्य?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाम न्यायालयात हजर झाले नसले तरी शुक्रवारी ते इंदूरमध्ये मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्याबरोबर परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसले. विजयवर्गीय यांच्या वाढदिवसाबरोबर हा उत्सव साजरा करण्यात आला. बम यांना भाजपामध्ये कधी सामील केले जाईल, असे विचारले असता, भाजपाचे पक्षप्रमुख शर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “आमच्याकडे प्युरिफायर आणि एक्स-रे मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही.”