Mahayuti : महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला कौल हा महाप्रचंड आहे यात शंकाच नाही. महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी म्हणजेच भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांना २३० जागा मिळाल्या आहेत. तर त्यांच्या मित्रपक्षांना ९ जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीचं पानिपत झालं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बचाओचा नारा देण्यात आला होता. ४०० पार खासदार झाले तर केंद्र सरकार संविधान बदलेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र विधानसभेत तसं घडलं नाही. महाविकास आघाडीची धूळधाण उडाली. दलित आणि इतर सगळ्या मतांसह भरघोस मतं कशी मिळाली हे आपण जाणून घेऊ.

लोकसभा निवडणुकीत काय घडलं?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली दलित मतं महायुतीपासून दूर गेली होती. कारण महायुती जिंकली तर संविधान बदललं जाईल असा प्रचार महाविकास आघाडीने केला होता. मात्र जून मध्ये लागलेल्या निकालाच्या अगदी विरुद्ध निकाल नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेत लागला. दलित मतांसह अनुसूचित जाती, जमातींची मतंही महायुतीला मिळाली.

महायुतीच्या अभूतपूर्व यशात कसा वाटा?

महायुतीच्या अभूतपूर्व विजयात २९ आरक्षित जागांपैकी २० तर ६७ पैकी ५९ जागांवर महायुती विजयी झाली आहेत. शेड्युल कास्ट अनुसूचित जाती या २०११ च्या जनगणनेनुसार १५ टक्के आहेत तर राज्यभरातली दलित संख्या १२ टक्के आहे. यातली बहुतांश मतं महायुतीकडे वळली आहेत हेच निकाल सांगतो आहे. भाजपाने दहा एससी जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीत काँग्रेसने चार SC जागा जिंकल्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तीन जागा जिंकल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी दोन एससी जागा जिंकल्या

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने किती जागा जिंकल्या?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ६७ जागा अशा होत्या ज्यामध्ये १५ टक्के भाग हा एससी लोकसंख्येचा होता. भाजपाने त्यातल्या ४२ जागा जिंकल्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी ८ जागा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सहा जागा जिंकल्या. या तुलनेत महाविकास आघाडीला ही मतं आपल्याकडे वळवता आली नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीने ही किमया कशी साधली?

बटेंगे तो कटेंगे ही घोषणा असेल किंवा त्यानंतर हाच नारा सौम्य पद्धतीने पसरवत एक है तो सेफची घोषणा असेल. या सगळ्यांनीच महायुतीला प्रचंड यश मिळवून दिलं आहे हे काही नाकारता येणार नाही. मराष्ट्राच्या इतक्या वर्षांच्या राजकीय इतिहासात कुठल्याही एका आघाडी किंवा युतीला इतक्या भरघोस जागा मिळाल्या नव्हत्या. लोकसभेला जो पराभव झाला त्यातून धडा घेत आणि हिंमत न हरता भाजपासह महायुतीने जोरदार तयारी केली आणि प्रचंड मेहनत करुन ही मतं आपल्याकडे वळवली आहेत. शिवाय लाडकी बहीण योजना या लोकप्रिय योजनेमुळे महिलांची मतंही मोठ्या प्रमाणावर महायुतीला मिळाली आहेत. त्यामुळे अत्यंत प्रचंड आणि अभूतपूर्व यश हे महायुतीला मिळालं आहे.