मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर १५ दिवसांनी सीपीआयएमच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे समन्वयक म्हणून प्रकाश करात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेपर्यंत ते या पदावर राहणार आहेत. प्रकाश करात यांनी यापूर्वी २००५ ते २०१५ दरम्यान पक्षाचे प्रमुखपद सांभाळलं आहे. प्रकाश करात यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची नियुक्ती तात्पुरत्या काळासाठी करण्यात आली आहे. मात्र, २०२५ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत महासचिवपदी कोणाची निवड होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे सीपीआयएला पक्षाचे अंतर्गत कामकाम सुरू ठेवण्यासाठी एका अनुभवी नेत्याची गरज आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक आहे, त्या दृष्टीने करात यांच्या नियुक्तीकडे बघितलं जात आहे. या संदर्भात बोलताना, “भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) केंद्रीय समितीने कॉम्रेड प्रकाश करात यांची पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. एप्रिल २०२५ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेपर्यंत ते काम बघणार आहेत”, अशी माहिती सीपीआय(एम) च्या एका नेत्याने दिली.

हेही वाचा – Maharashtra Election : काँग्रेस विधानसभेच्या किती जागा लढणार? मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? रणनिती तयार! जाणून घ्या पाच वर्षांत मोठ्या भावाची जागा कशी घेतली?

सीताराम येचुरी यांच्या अचानक निधनामुळे सीपीआयएमसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. कारण २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सीपीआयएमने पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीच्या सदस्यांसाठी ७५ वर्षांची अट लागू केली होती. २०२५ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत हा नियम लागू करण्यात येणार होता. त्यामुळे वृंदा करात, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, सूर्यकांता मिश्रा, सुभाषिनी अली आणि माणिक सरकार यांसारख्या नेत्यांना पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीतून बाहेर जावं लागणार होतं; तर सीताराम येच्युरी हे ७२ वर्षांचे होते. अशा परिस्थितीत महासचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतरही ते पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीच्या सदस्यपदी कायम राहिले असते, तसेच नव्या महासचिवांना मार्गदर्शन करू शकले असते. मात्र, या समितीत नवे चेहरे बघायला मिळण्याची शक्यता आहे.

सीताराम येचुरी यांचे इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. श्रद्धांजली सभेत या नेत्यांनी येचुरी यांनी इंडिया आघाडीच्या निर्मितीत बजावलेली भूमिका आणि पक्षांमधील मतभेद दूर करण्याच्या त्यांच्या क्षमतेचं कौतुक केलं. यावेळी बोलताना, “सीपीआयएमला आता नवीन महासचिव मिळेलही, पण आम्ही सीताराम येचुरी यांना विसरणार नाही”, अशी प्रतिक्रिया आरजेडी नेते मनोज कुमार झा यांनी दिली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा

सीपीआयएमच्या महासचिवपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत

सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर सीपीआयएमच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती होईल, याबाबत आता राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. याबाबत पक्षातही दोन मतप्रवाह आहेत. महासचिवपदी ७५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नेत्याची नियुक्ती करावी, असं मत काही नेत्यांनी व्यक्त केलं आहे; तर ७५ वर्ष पूर्ण झालेल्यांपैकी कुणालातरी महासचिवपदी नियुक्त करावं, अशी इतर काही नेत्यांनी मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे महासचिवपदासाठी प्रकाश करात आणि वृंदा करात यांसारख्या नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. वृंदा करात यांची पक्षाच्या महासचिवपदी निवड झाली तर पक्षासाठी ते फायद्याचं ठरेल, अशी प्रतिक्रिया एका नेत्याने दिली आहे. राज्यसभेच्या खासदार असलेल्या वृंदा करात यांचेही विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत, तर प्रकाश करात हे अनुभवी नेते असून ते सुद्धा महासचिव होऊ शकतात, असं अन्य एका नेत्याने म्हटलं आहे. याशिवाय एम. ए. बेबी आणि बी. व्ही. राघवुलू यांची नावेही महासचिवपदासाठी चर्चेत आहेत.