पालघर : डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपाची असणारी सत्ता रोखण्यासाठी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा एकास एक मुकाबला करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे संभाव्य असणारे उमेदवार माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांनी अचानकपणे शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डहाणूमध्ये भाजपाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीच्या छुप्या साथीने विरोधक एकवटल्याचे दिसून आले आहे.

सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने नगराध्यक्ष पदासह २४ नगरसेवक पदांपैकी १४ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आठ तर शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळवला होता. नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या भरत राजपूत यांची सलग दुसऱ्यांदा भाजपाच्या जिल्हाप्रमुखपदी नेमणूक झाली असून डहाणूमध्ये भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न केले होते.

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यावेळी उमेदवारी देण्यावरून झालेला वादंग तसेच पक्षांतर्गत मतभेद कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणूची जागा राखताना संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

भाजपशी सामना करण्याकरिता महाविकास आघाडी सरसावली होती. नगराध्यक्षपद व २७ नगरसेवक पदांच्या निवडणुकीत आमने-सामने लढत झाल्यास भाजपाला शह दिला येऊ शकतो या धारणेने सर्व विरोधक एकत्र झाले होते. दरम्यान शिवसेना शिंदे पक्षाकडून निवडणूक लढवली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने तसेच भाजपाचा अटकाव करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून संभाव्य मानले जाणारे उमेदवार माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांनी अचानकपणे शिवसेना शिंदे पक्षात १२ नोव्हेंबर रोजी प्रवेश केला. यामुळे विरोधक एकत्रितपणे शिवसेना शिंदे पक्षाच्या निशाणीवर नगराध्यक्ष पद लढतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

नगराध्यक्ष पदाकडे लक्ष ठेवून यापूर्वी माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी तसेच डॉ. अमित नाहर यांनी शिवसेना शिंदे पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. या दोन संभाव्य उमेदवारांची आगामी काळातील भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची शहराच्या काही भागात ताकद असून या पक्षाकडून देखील भाजपा विरुद्ध एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत कोणती भूमिका घेतली जाईल याबाबत देखील निश्चित भूमिका जाहीर झाली नाही.

डहाणू तालुक्यात वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदराची उभारणी आगामी काळात सुरू होणार असून यादृष्टीने डहाणू नगरपालिकेवर वर्चस्व असणे हे प्रत्येक राजकीय पक्षाला महत्त्वपूर्ण आहे. भाजपामध्ये असणारा अंतर्गत गटबाजीचा विशेष प्रभाव डहाणू भागात जाणवत नसला तरीही भाजपाला अटकाव करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित मोट बांधण्याचा हा प्रयत्न सध्यातरी जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.