दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्यातील आरोपी तसेच नंतर माफीचा साक्षीदार झालेल्या राघव मगुंता रेड्डी यांचे वडील मगुंता श्रीनिवासुलू रेड्डी यांना तेलुगू देसम पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तेलुगू देसम पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

गेल्या २८ फेब्रुवारी रोजी रेड्डी पिता पुत्रांनी वायएसआर काँग्रेसमधून तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून दोघेही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागले होते. मगुंता श्रीनिवासुलू रेड्डी हे चार वेळा ओंगोलचे खासदार राहिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा आपल्या मुलाला ओंगोलमधून उमेदवारी मिळावी, असा श्रीनिवासुलू रेड्डी यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यांच्या मुलाचे नाव दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्यात आल्याने तेलुगू देसम पक्षाने श्रीनिवासुलू रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली. श्रीनिवासुलू रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर तेलुगू देसम पक्षालाही ओंगोलमध्ये आपला प्रभाव वाढवण्यात मदत होईल, असे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाचे म्हणजे एनडीएने आतापर्यंत आंध्रप्रदेशात चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये ओंगोलमधून श्रीनिवासुलू रेड्डी, विजयनगरमधून कालिसेती अप्पलानायडू, अनंतपूरमधून अंबिका लक्ष्मीनारायण आणि कडप्पा येथून भूपेश रेड्डी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशात १३ मे रोजी विधानसभा आणि लोकसभेसाठी एकाच वेळी निवडणुका होणार आहे.

हेही वाचा – राहुल गांधींना आणखी एक धक्का; तीन टर्म खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्याने धरली भाजपाची वाट

दरम्यान, गुरुवारी दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रेड्डी पिता पुत्रांचा उल्लेख केला होता. २०२३ मध्ये राघव रेड्डी यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचे वडील श्रीनिवासुलू रेड्डी यांनी दबावाखाली येऊन माझ्या विरोधात विधान केले होते, असे केजरीवाल म्हणाले होते. राघव रेड्डी यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर ते याप्रकरणातील माफीचा साक्षीदार झाले.