अलिबाग : अलिबागचे नाव बदलण्याची मागणी करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असूनही नार्वेकर यांनी अलिबागचे नाव बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी अलिबाग येथील वकील राकेश पाटील यांनी रायगडचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
नार्वेकर यांनी अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करा आणि अलिबाग येथे मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक उभारा अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होती. या पत्रावर नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर १५ मार्च २०२४ असा तारखेचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष हे पत्र मुख्यंमंत्री सचिवालय टपाल केंद्रात २२ मार्च २०२४ रोजी देण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही १६ मार्चपासून लागू करण्यात आली आहे. याची पूर्ण कल्पना असूनही नार्वेकर यांनी अलिबागचे नाव बदलण्यासंदर्भातील पत्र २२ मार्च रोजी दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार वकील राकेश पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
नार्वेकरांनी ज्या अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या निवेदनाच्या आधारे मुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. त्यावर २१ मार्च २०२४ अशी तारीख दिसत आहे. नंतर या निवेदनावरील तारखेत खोडखाड केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाती सखोल चौकशी करून, मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य करणे, निवडणुकीत गैरवाजवी प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या कारणांखाली आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र हे समाजाला खूश करण्यासाठी करण्यात आला असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?
अलिबाग नावावरून हिंदू मुस्लिम वाद पेटवणे आणि त्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय फायद्यासाठी हे पत्र दिले आहे. ज्यामुळे अलिबागमध्य असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. – अँड. राकेश पाटील, अर्जदार .