मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी (२२ जुलै) साजरा झालेल्या वाढदिवसानिमित्ताने प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाहिराती, रस्त्यांवर बँनर-पोस्टरही लावले गेले. त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन झाले.
वाढदिवसानिमित्ताने फलकबाजी, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाहिराती करू नयेत, अशा सूचना फडणवीस यांनी जाहीरपणेही दिल्या होत्या आणि प्रदेश भाजपनेही तसे आवाहन केले होते. जे नेते व पदाधिकारी या सूचनांचा भंग करतील, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही पक्षाने दिला होता. पण अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी या सूचनांकडे काणाडोळा केला आणि पक्षानेही त्यांच्या कृतीकडे दुर्लक्ष केले.
वाढदिवसाची फारशी प्रसिद्धी करू नये, जाहिरातबाजी करू नये, असा फडणवीस यांचा कल असतो. त्यांना ते फारसे आवडत नाही. जाहिरात फलक लावल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, असे त्यांनी नुकतेच सांगितले होते. तरीही आपल्याला चांगली राजकीय संधी मिळावी, आपल्या नेत्याला खूश करावे, या भावनेतून नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते फलकबाजी करतात. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी व मंत्रालय परिसरात फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लागले होते.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांनी फडणवीस यांना शुभेच्छा देणाऱ्या मोठ्या जाहिराती प्रसिद्धीमाध्यमांमधून केल्या. फडणवीस यांचा गुणगौरव त्यातून करण्यात आला. तर फडणवीस यांच्यातील नेतृत्व गुण, राजकीय कसब आदी जनतेसमोर आणण्यासाठी त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी कॉफी टेबल बुकच प्रकाशित केले. तेही थेट राज्यपालांच्या हस्ते.
या कॉफी टेबल बुकमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी दिग्गज नेत्यांना फडणवीस यांच्याबद्दल काय वाटते, त्यांचे कोणते गुण भावतात, याविषयी त्यांच्या भावना मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत फडणवीस यांच्यावर कडवट टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांनीही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
फडणवीस यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. महारक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, आधार व आभा कार्ड वाटप शिबीर आदी अनेक जनतेला उपयुक्त कार्यक्रमांचेही आयोजन राज्यभरात करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अनेकांनी देणग्याही दिल्या.
पण वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी व फलकबाजीही झाली. हे करणाऱ्यांना दरवर्षी पक्षाकडून नाराजी व्यक्त करणारे व समज देणारे पत्र पाठविण्याची प्रथा आहे. मात्र जाहिरातबाजी करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात. यंदाही त्याच पद्धतीने नाराजीची पत्रे पाठविली जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.