सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना महाविकास आघाडीची ताकद दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रासह शेजारच्या मराठवाड्यात आणखी बळकट करण्याचा निर्धार अकलूजमध्ये दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात केला गेला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याचे निमित्त होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह कोल्हापूरचे छत्रपती, खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ ही मंडळी यानिमित्ताने एकत्र आली होती. याचवेळी महाविकास आघाडीच्या डझनाहून अधिक खासदारांनाही सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा >>>मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान

सुमारे ५० हजार जनसमुदायाच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या हस्ते आणि बाळासाहेब थोरात यांचे अध्यक्षतेखाली सुशीलकुमार शिंदे यांचा थाटात सत्कार करण्यात आला. मोहिते-पाटील कुटुंबीयांनी घडवून आणलेल्या या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महायुतीशी निगडित काही प्रमुख नेतेमंडळीसह महाविकास आघाडीची प्रत्येक तालुक्यातील नेते मंडळी झाडून उपस्थित होती. याशिवाय सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड या भागातील नेत्यांनीही अकलूजमध्ये हजेरी लावली. मुख्य कार्यक्रमाशिवाय मोहिते-पाटील यांच्या ‘शिवरत्न’ बंगल्यावरही शरद पवार, मोहिते-पाटील आदींना भेटण्यासाठी नेत्यांची गर्दी उसळली होती.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत सीमारेषेवर राहिलेले सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे दोघे मागील लोकसभा निवडणुकीत मनापासून एकत्र आले. त्यासाठी शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता. त्याचाच भाग म्हणून शरद पवार यांच्या सांगण्यानुसार अकलूजमध्ये मोहिते-पाटील कुटुंबीयांनी सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार सोहळा घडवून पूरक संदेश दिला. यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्र पुन्हा अकलूज असल्याचे पाहावयास मिळाले.

हेही वाचा >>>पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वावरून महायुती, महाविकास आघाडीत आकड्यांचा खेळ रंगात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या. सत्कार सोहळ्यात चालू राजकीय घडामोडींवर कोणतेही थेट भाष्य झाले नाही. मात्र महाविकास आघाडीची ताकद आणखी बळकट करण्याचा संदेश दिला गेला. शरद पवार यांनी, नवीन पिढी राजकारणात येत असताना त्यांना समता, पुरोगामी विचारांचे आणि विकासात्मक राजकारण घेऊन पुढे जाण्याचे आणि तरूणांना नव्याने ताकद देण्याचे काम एकत्रितपणे करू या, असे वक्तव्य केले. सध्या भाजपमध्ये असलेले आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी, सोलापूर जिल्ह्यातील सामान्य जनतेने दिलेल्या उदंड प्रेमापोटी राजकारणात विकासासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचे सांगत, आगामी काळातील आपल्या राजकीय भूमिकेविषयी वेगळे संकेत दिले. तर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी, पवार, शिंदे आणि मोहिते-पाटील यांच्याकडे बघून नवीन पिढी राजकारण शिकत आहे. पाठीमागे या दिग्गज नेत्यांनी राजकारणापूरते राजकारण केले. कधीही बाह्या मागे सारून भांडले नाहीत. सध्या मात्र परिस्थिती वेगळी आहे. राजकारणात. नुसत्या बाह्या मागे सारून नव्हे तर ओरखडे सुद्धा काढले जातात. हे कुठेतरी नव्या पिढीसमोर थांबायला हवे, असे भाष्य केले. हाच धागा पकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सांगलीचे खासदार विशाल पाटील, कोल्हापूरचे छत्रपती, खासदार शाहू महाराजांपासून ते सुशीलकुमार शिंदे व शरद पवार यांच्यापर्यंत सर्व नेत्यांनीही राजकारणात नवीन पिढीला ताकद देण्याचे आणि महाविकास आघाडी बळकट करण्याचे स्पष्ट संकेत दिले.