सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे सध्या उपोषणाला बासले होते. सध्या त्यांनी राज्य सरकारच्या विनंतीनुसार आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे. जरांगे उपोषणाला बसलेले असताना मराठा समाज आक्रमक झाला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. याच पार्श्वूमीवर या मराठा आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. तर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली करत आगामी निवडणुकीत भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

फडणीसांना केले जातेय लक्ष्य?

गेल्या काही दिवासांपासून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात होत असलेली जाळपोळ आणि तोडफोड यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारणामुळे राज्याचे गृहमंत्री असेलल्या फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. याला उत्तर म्हणून मी ब्राह्मण असल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

जरांगे पाटलांची फडणवीस यांच्यावर टीका

राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली. या जाळपोळीमागे जे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. “फडणवीस यांना खोडसाळपणा करायची सवय आहे. ते दोन समाजात भांडणं लावतात. या इशाऱ्यानंतर आम्ही घाबरून जाऊ असे तुम्हाला वाटते का? फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांमुळेच अनेक राज्यांत भाजपाची सत्ता गेलेली आहे. महाराष्ट्रातही लवरच त्यांना झटका बसेल,” अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली.

“राज्यातील अशांतता हे देवेंद्र फडणवीस यांचे अपयश”

मराठा आंदोलन तीव्र झाल्यापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही फडणवीस यांनाच लक्ष्य केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांवर टीका केली. “राज्यातील अशांतता हे देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. नैतिकता म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. निरापराध मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला जात आहे. आमदारांची घरे जाळली जात आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोठे आहे,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

“जरांगे यांनी अन्य कोणाच्या हातचे खेळणे होऊ नये”

जरांगे आणि राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे भाजपाच्या नेत्यांनी जरांगे यांना लक्ष्य केले आहे. जरांगे यांनी मराठा आंदोलनाचे राजकारण करू नये, असे आवाहन भाजपातील अनेक नेत्यांनी केले आहे. “मराठा आरक्षणाचे आंदोलन हे एका समूहाकडून चालवण्यात आले होते. या आंदोलनाला चेहरा नव्हता हेच या आंदोलनाचे वैशिष्य आहे. मात्र जेव्हा एखाद्या विशिष्ट नेत्याला लक्ष्य केले जाते, तेव्हा अशा प्रकारच्या आंदोलनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. जरांगे यांनी अन्य कोणाच्या हातचे खेळणे होऊ नये, असे आमचे त्यांना आवाहन आहे. या आंदोलनाचा काही लोक गैरफायदा घेत आहेत,” असे आवाहन भाजपाचे नेते अजित चव्हाण यांनी केले.

“फडणवीसांच्याच काळात मराठा समाजाला आरक्षण”

जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या बाजूने कसे आहेत? हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. “फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार मराठा समाजाला शिक्षणात १३ तर शासकीय नोकरीत १२ टक्के आरक्षण देण्यात आले होते,” असे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. तर भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी “मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. असे असूनही जरांगे फडणवीसांवर टीका का करत आहेत. ही टीका कोणाच्या आदेशावरून केली जात आहे? राजकीय सूडभावनेतून अशा प्रकारची टीका केली जात आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा >> “शिंदे सरकारने दगाफटका केला तर आम्ही…”, आरक्षणासाठी मुदत वाढवून देताना मनोज जरांगेंचा इशारा

“फडणवीस पक्षातील सर्वोच्च नेते”

महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही. ते पक्षातील सर्वोच्च नेते आहेत. हजारो, लाखो कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते, असे बावनकुळे म्हणाले. तर “जरांगे पाटील जे बोलत आहेत, त्याची स्क्रीप्ट अन्य कोणीतरी लिहिलेली आहे. असे नसते तर त्यांनी आरक्षणाचा मुद्दा सोडून राजकीय भाष्य केले नसते,” अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते नितीश राणे यांनी दिली.

हे ही वाचा >> “सरसकट आरक्षणाची मागणी नाही, ज्यांच्या…”, मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य

भाजपा राबवणार खास मोहीम

मराठा आंदोलनात फडणवीस यांना लक्ष्य केले जात असल्यामुळे भाजपाकडून आगामी काळात फडणवीस सरकारच्या काळात कोणकोणती कामे झालेली आहेत, हे जनतेत जाऊन सांगण्याचे ठरवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (३१ ऑक्टोबर) महाराष्ट्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या हिंसाचाबद्दल नापसंदी व्यक्त करण्यात आली. तसेच जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मराठा आंदोलकांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असेही या बैठकीतील नेत्यांनी आवाहन केले होते.