Latest News on Maharashtra Politics Today :एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या आठ योजना फडणवीस सरकारने बंद केल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला. राज ठाकरे यांची काँग्रेसलादेखील बरोबर घेण्याची इच्छा असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले, तर मला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी भाजपाने पाच कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. महाराष्ट्रातील पाच महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेंच्या योजनांना फडणवीसांचा ब्रेक?

सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. आमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील, अशी टीकाही त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर केली. अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, १ रुपयात पीकविमा, स्वच्छता मॉनिटर, १ राज्य १ गणवेश, लाडक्या भावाला अपरेंटीसशिप, योजनादूत योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यांसारख्या शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना फडणवीस सरकारने बंद केल्याचा दावा केला.

पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार?

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळी तालुक्यात उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कथित विक्रीमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हा कारखाना विकला असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांच्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या कथित निर्णयाविरोधात संघटनेकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. “सदरील कारखाना हा ओमकार ग्रुपला १३२ कोटी रुपयांमध्ये विकण्यात आला असून १४ ऑगस्ट २०२५ रोजी त्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. कारखाना विक्रीचा निर्णय कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेण्यात आला, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

आणखी वाचा : Shiv Sena-MNS Alliance : मुंबईतील २२७ पैकी ‘इतक्या’ प्रभागांमध्ये मनसेचा दरारा; ठाकरे बंधूंची युती झाल्यास कुणाला फटका?

राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार?

मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचे कयास राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. यादरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना एक मोठे विधान केले. ‘राज ठाकरे यांची महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलादेखील बरोबर घेण्याची इच्छा आहे’, असे राऊत म्हणाले. ‘राज ठाकरे यांची ही भूमिका असली तरी अद्याप तसा निर्णय झाला नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर राज ठाकरे हे खरंच काँग्रेसला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, राऊतांच्या विधानावर मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संग्राम जगतापांचे पवारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष?

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. दिवाळीला केवळ एका ठरावीक समाजाच्या व्यावसायिकांकडेच खरेदी करा, असे आवाहन त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना केले होते. त्यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत अजित पवार यांनी जगताप यांना नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, जगताप यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे.‘खरेदी’ प्रकरणात आपण प्रथम सुरुवात केलेली नव्हती. दरवर्षी एकाच ठरावीक समाजाकडून खरेदी करण्याबाबत आव्हानात्मक मजकूर असलेली पत्रके वाटली जातात. त्यानंतरच आपण भूमिका घेतली. यापुढे असे काही घडले तर आधी प्रत्युत्तर दिले जाईल, मग मोर्चा काढला जाईल, असा इशाराही संग्राम जगताप यांनी दिला.

हेही वाचा : Bihar Election 2025 : बिहारच्या निवडणुकीत पुन्हा ‘कांटे की टक्कर’; यंदाही ‘त्या’ ५२ जागा ठरणार निर्णायक? कारण काय?

धर्मराव बाबा आत्राम यांचा भाजपावर गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी भाजपाने पाच कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. भाजपाने डमी उमेदवार म्हणून माझ्या पुतण्याला निवडणुकीत माझ्याविरोधात उभे केले, पण जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला, असेही आत्राम म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही भाजपाला एक तुकडाही देणार नाही. या निवडणुकीत गडचिरोलीत केवळ घड्याळ (राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह) चालेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातच महायुतीत वादाची ठिगणी पडल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. हा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पुढाकार घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.