पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत ‘मिशन १२५’ चा आदेश ल्याने भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेवर पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी ‘तोडा आणि फोडा’ या नीतीचा अवलंब करण्याच्या सूचना थेट मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने पहिल्या टप्प्यात तत्कालीन शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेतल्यानंतर आता भाजपने काँग्रेसला ‘लक्ष्य’ केले आहे. काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याने त्यांच्या संभाव्य प्रवेशामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र, भाजपवासी होण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमध्ये उत्साह आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या शनिवारी पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत आवश्यक तेथे स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुणे महापालिकेच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यानुसार भाजपने ‘मिशन १२५’ निश्चित केले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला ९७ जागा मिळाल्या होत्या. आता कोणत्याही परिस्थितीत १२५ जागा मिळवण्याचे उद्दिष्ट या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांच्या आदेशानंतर भाजपमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना आकर्षित करण्याची रणनीती आखण्यात सुरुवात केली आहे.
भाजपने सुरुवातीच्या टप्प्यात तत्कालीन शिवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेतले. त्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जवळे, प्राची अल्हाट आणि संगीता ठोसर यांचा समावेश आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) हे पक्षदेखील आपापल्या पक्षाचे बळ वाढवण्यासाठी अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश देत आहे. आता भाजपने या दोन मित्रपक्षांतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यापेक्षा काँग्रेसला ‘लक्ष्य’ करण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचा स्थानिक पातळीवरील जनाधार भाजपकडे वळवल्यास भाजपचे बळ आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नवीन राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
काँग्रेसमध्ये अस्वस्थता, भाजपच्या इच्छुकांमध्ये चिंता
भाजपच्या नवीन रणनीतीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आणि भाजपच्या इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. शहरातील काँग्रेसचा पारंपरिक मतदार आल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या प्रभावी माजी नगरसेवकांना आपल्याकडे आकर्षिक करण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यापैकी पाच माजी नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. संबंधित माजी नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये भाजपच्या इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. मात्र, काँग्रेसचे नगरसेवकच पक्षात आल्यास त्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे संबंधित इच्छुक हे चिंताग्रस्त झाले आहेत.
भाजप प्रवेशासाठी ‘लाल गालिचा’ अंथरला जाण्याच्या शक्यतेने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुन्हा निवडणूक लढवून विजयी होण्याची संधी मिळेल, असा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा कयास आहे.