Top Five Political News in Today : आज दिवसभरातील पाच महत्त्वाच्या राजकीय बातम्या : हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला विरोध करणारी पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकाराखाली नवी मुंबई महापालिकेच्या नोटिशीला स्थगिती दिली, अशी विचारणा न्यायालयाने केली. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली; तर लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीसंदर्भात केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
हैदराबाद गॅझेटला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या होत्या. त्यासंदर्भात शासकीय अध्यादेशही काढण्यात आला होता. या अध्यादेशात हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीची मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल झाल्या होत्या. त्यातील पहिल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. वकील विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच सकाळच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले. शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे? अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली. जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सदरील याचिका ही जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. याचिकाकर्त्याला रीट याचिका म्हणून सक्षम कोर्टासमोर दाद मागण्याची मुभा यावेळी न्यायालयाने दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ
लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत जाहीर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ६ हजार ८५० मतांची चोरी झाल्याचा दावा केला. याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. “राजुरा मतदारसंघात मतांची चोरी झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे, त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
आणखी वाचा : Visual Storytelling : राहुल गांधी यांना निवडणूक आयोगातूनच मदत? भाजपाला कोण आणतंय अडचणीत?
कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघात मतचोरी कशी करण्यात आली हे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता मतचोरीचा आणखी एक बॉम्ब राहुल गांधी यांनी फोडला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाच्या मतदार यादीत कसा घोटाळा झाला, हे आज उघड झाले आहे”, असे सपकाळ म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात नोटिशीला स्थगिती दिली? न्यायालयाची विचारणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात नवी मुंबई महापालिकेच्या नोटिशींना स्थगिती दिली, अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयाने केली. नियोजन प्राधिकरणांच्या अशा कारवायांना अशी स्थगिती देण्याचा अधिकार नगरविकासमंत्री म्हणून उपमुख्यमंत्र्यांना आहे का? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकामांना कायदेशीर नोटीस बजावून कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. या नोटिशींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. त्यांच्या या निर्णयाला कॉन्शस सिटीझन्स फोरम या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तसेच, उपमुख्यमंत्र्यांचा आदेश बेकायदा ठरवून तो रद्द करण्याची आणि महापालिकेने बजावलेल्या पाडकाम नोटिशीच्या अंमलबजावणीची मागणी त्यांनी केली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या वेळी प्रकरणाच्या सर्व बाबी तपासल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेतली. तसेच, कायदेशीर कारवाईला अशाप्रकारे स्थगिती देण्याचे अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहेत का? अशी विचारणा करीत २० सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
आगामी काळात राज्यात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबईत ताकद असल्यामुळे त्याचा आम्हाला फायदा होईल. आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दोघे भाऊ एकत्र येऊन आपआपल्या पक्षाची ताकद दाखवतील, यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळे समीकरण बघायला मिळेल,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीत जाणार का? त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : भाजपाचा पराभूत उमेदवार पुन्हा विजयी होणार? काँग्रेसला मोठा धक्का; उच्च न्यायालयाचा आदेश काय?
निवडणूक आयोगाने फेटाळले राहुल गांधी यांचे आरोप
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज राजधानी दिल्लीत जाहीर पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाजपासह निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही पुरावेदेखील दाखवले. राहुल गांधी यांचा रोख हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर होता. निवडणूक आयोगाने कशाप्रकारे भाजपाशी संगनमत करून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील मतदारांची नावे डिलिट केली हे राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी दाखवले. दरम्यान, त्यांचे हे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. “राहुल यांनी केलेले हे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन वगळता येत नाही, तसेच अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही कोणत्याही मतदाराचे नाव वगळता येत नाही. संबंधित मतदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही नाव वगळता येत नाही,” असे आयोगाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगानेच एफआयआर दाखल केल्याचे आयोगाने म्हटले आहे.