छत्तीसगडमधील अतिदुर्गम अबूझमाड़ जंगलात झालेल्या चकमकीत कुख्यात माओवादी प्रमुख नेता नंबाला केशवराव ऊर्फ बसव राजू ठार झाला. बसव राजू ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या या कारवाईत बसव राजूसह एकूण २६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. बसव राजू याच्या हत्येनंतर सुरक्षा यंत्रणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) नेतृत्व कोण करेल हे शोधण्याच्या प्रक्रियेत आहेत. ७० वर्षीय बसव राजू हा बंदी घातलेल्या संघटनेचा सरचिटणीस होता. तो संघटनेचा वैचारिक व लढाऊ प्रमुख म्हणून काम करीत होता.
भारताच्या गुप्तचर विभागाच्या रडारवर दोन नावे आहेत आणि ती म्हणजे थिप्पिरी तिरुपती ऊर्फ देवुजी आणि मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ सोनू. देवुजी हा माओवादी पक्षाच्या सशस्त्र शाखेचा केंद्रीय सैन्य आयोग (सीएमसी) प्रमुख आहे; तर वेणुगोपाल राव ऊर्फ सोनू हा सध्या पक्षाचा वैचारिक प्रमुख असल्याचे मानले जाते. हे दोघेही पार्टीचे पॉलिटब्यूरो आणि केंद्रीय समिती सदस्य आहेत.
देवजी हा तेलंगणातील माडिगा (दलित) समुदायाचा आहे; तर सोनू हा ब्राह्मण आहे. “जर देवुजी यानं नेतृत्व स्वीकारलं तर त्याचं नेतृत्व निर्णायक ठरणार आहे. कारण- तो एका दुर्लक्षित पार्श्वभूमीतून आलेला आहे आणि तो आदिवासींसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करू शकतो,” असं तेलंगणातील एका उच्च गुप्तचर अधिकाऱ्यानं दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या दोन माजी सरचिटणीसांचं नेतृत्व तुलनेत ठार झालेल्या दोघांच्या नेतृत्वापेक्षा दुसऱ्या श्रेणीतलं मानलं जातं- मल्लोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी (वय ५६) याची २०११ मध्ये हत्या झाली आणि मंगळवारी बसव राजू याची हत्या झाली. “जुन्या नेतृत्वातील अनेक जण मारले गेल्याने आता दुसऱ्या श्रेणीचे नेतृत्व पक्षाचे मार्गदर्शन करणार आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. देवजी ६२ वर्षांचा आहे आणि सोनू ७० वर्षांचा आहे.
देवुजी हा तेलंगणातील जगतियाल इथला आहे आणि सोनू हा राज्याच्या पेद्दापल्ली प्रदेशातील आहे. “या संकटकाळात पक्ष त्यांच्या सशस्त्र नेतृत्वाला पाठिंबा देत पक्षाची सूत्रे हाती देईल की वैचारिक मनोऱ्यांवर अवलंबून राहत नेतृत्वाशिवाय तरंगत राहील हे आपल्याला पाहावं लागेल,” असे तेलंगणातील एका उच्च गुप्तचर अधिकाऱ्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
पक्ष कोणाची निवड करतो आणि त्यांचे आकर्षण किती आहे हा मुद्दा पक्ष विचारात घेऊ शकतो. “पक्षाला वेणुगोपाल राव ऊर्फ सोनू याच्यासारख्या वारशाची गरज असू शकते,” असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. सोनू हा २०११ साली चकमकीत ठार झालेल्या किशनजीचा भाऊ आहे. “पक्षात असेही लोक आहेत, जे अजूनही किशनजीला संघटनेतील सर्वांत मोठ्या नेत्यांपैकी एक मानतात. राव ऊर्फ सोनू ही पोकळी भरून काढू शकतो”, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
तेलुगू राज्यांमधून पक्षात भरती जवळजवळ थांबली आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात माओवादी नेत्यांची हत्या होत असल्यामुळे पक्ष संकटात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पक्ष केंद्राशी शांतता चर्चेची मागणी करीत असला तरी अद्याप ते प्रत्यक्षात आलेले नाही किंवा तशी पावलेही उचलली गेलेली नाहीत. “बहुतेक जुने कार्यकर्ते मारले जात नाहीत तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहील. ही आत्मसमर्पणाची पूर्वअट आहे आणि हे दुर्दैवी वास्तव आहे”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तेलंगणासह काँग्रेस सत्तेत असलेली काही राज्ये माओवादी नेतृत्वाला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहेत.
देशभरात नक्षलवादी कारवायांना वेग आल्यामुळे चारही बाजूंनी कोंडीत सापडलेल्या नक्षलवाद्यांसमोर आता पक्षाचा नवा नेता निवडण्याचेही आव्हान आहे. त्यात देवुजी आणि सोनू या दोघांनी साठी पार केल्यामुळे बऱ्याचदा त्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. हा विचार केल्यास पार्टी ऐन वेळेवर नव्या दमाच्या सदस्याची निवड करू शकते, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.