छत्रपती संभाजीनगर : तुंबलेली गटारे, बंद पडलेले पथदिवे आणि चिखलात रुतून बसलेले रस्ते अशी धाराशिव शहराची अवस्था झाली आहे. त्याला कारण आहे भूमिगत गटारांच्या कामाचे. पावसाळा तोंडावर असताना कोणतीही उपाययोजना न करता भूमिगत गटारांसाठी खोदलेले खड्डे आणि उखडलेले रस्ते अनेकांच्या जीवावर बेतत आहेत. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला केवळ रस्ता चिखलात रुतल्याने दवाखान्यात नेता आले नाही. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे प्रसूतीसाठी गर्भवती मातेला घेऊन निघालेली रुग्णवाहिका चक्क दोन फूट खोल चिखलात रुतून बसली. भाजपने त्यावरून रान उठवायला सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनावर खापर फोडत ठाकरे सेनेच्या वतीने चिखलात बसून आंदोलन केले.

एकंदरीत धाराशिव शहरातील रस्त्याची कामे दोन वर्षांपासून रखडली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४० ते ५० कोटींच्या कामांची मान्यता पालकमंत्री तानाजी सावंत यांनी रद्द केली. त्या कामांच्या पुन्हा फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु कामे सुरू केली नाहीत. यामुळे दोन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी केला आहे. चिखलात बसून घोषणाबाजी करत त्यांनी आंदोलन केले. पालिका प्रशासनाला निवेदन देऊन स्थगिती दिलेल्या कामांना मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी लावून धरली.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा भाजपवर मुनगंटीवार यांचेच वर्चस्व

भूमिगत गटारांच्या कामात मोठी अनियमितता असल्यानेच शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा पवित्रा भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी केवळ रस्ता खचलेला असल्याने रुग्णाला दवाखान्यात नेता आले नाही. परिणामी ह्रदयविकाराच्या धक्काने त्या रुग्णाचा मृत्यू झाला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत त्या भागातील रस्त्याची पाहणी केली. मृताच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले. आणि या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार असा सवाल करीत ठाकरे सेनेवर निशाणा साधाला.

हेही वाचा – संसदेत आज विरोधक काळा रंग दाखवून सरकारचा निषेध करणार; तर पंतप्रधान मोदी राजस्थान-गुजरातच्या दौऱ्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भागात चिखलांचे साम्राज्य

रस्ते व भूमिगत गटारीच्या अर्धवट कामामुळे शहरातील अमृतनगर, साईनगर, ज्ञानेश्वर नगर, संत ज्ञानेश्वर नगर, संत ज्ञानेश्वर चौक ते शाळा, मिल्ली कॉलनी गल्ली नं. १, सफा मशीद ते सावित्रीबाई फुले शाळा, प्रेरणा नगर, सुझुकी शोरुम लेन, हजरत निजामोद्दीन कॉलनी, परवीन पल्ला हॉस्पिटल लेन, गालीब नगर, शिरीन कॉलनी, सुलतान पुरा, दत्त नगर, जिजाऊ नगर, लक्ष्मी नगर, मुकुंद नगर, नृसिंह कॉलीन, फकिरा नगर, उमर मोहल्ला, शाहू नगर, राम नगर, आनंद नगर, समता नगर या भागातील नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे.