नागपूर : एखाद्या गोष्टींचा अतिरेक झाला तर त्याचे काय परिणाम  होतात. याचे उत्तम उदाहरण सध्या नागपूर जिल्ह्या भारतीय जनता पक्षात पाहायला मिळते.  विरोधी पक्ष कमकुवत व्हावा म्हणून त्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना पक्षातील जुन्या नेत्यांना काय वाटेल याची तमाच न बाळगल्याने पक्षातील निष्ठावंताचा असंतोष आता उफाळून बाहेर येऊ लागला आहे. याची सुरुवात माजी आमदार सुधीर पारवे यांनी केली. आता सावनेर  तालुक्यातूनही तेच सूर ऐकायला मिळू लागले आहेत.

पार्टी विथ डिफरंनस, निष्ठा, संस्कृती या शब्दांना गुंडाळून ठेवत आता नवा भारतीय जनता पक्ष उदयास आला असून या पक्षात सध्या स्वपक्षातील कतृत्ववान नेत्यांपेक्षा इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांवर अधिक विश्वास दाखवला जात आहे. यामुळे स्वाभाविकपणे पक्षासोबत अनेक वर्षे घालणारे व म्हणून स्वत:ला निष्ठावंत म्हणून घेणारे नेते सध्या पक्षावर, तो चालवणा-या नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तीन प्रमुख नेत्यांच्या नागपूर जिल्ह्यात सध्या निष्ठावंत -विरूध्द  आयात नेते असा वाद पेटला आहे.

वादाचे कारण काय?

वादाची सुरूवात झाली ती जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीवरून. यात बाहेरून आलेल्यांच्या समर्थकांना अधिक प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे जुने नेते संतापले.  त्याची पहिली ठिणगी उमरेड विधानसभा मतदारसंघात तेथील माजी आमदार सुधीर पारवे  यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या नाराजीच्या पत्राच्या रुपात पडली.

उमरेड चे सलग दोन वेळा आमदार राहिलेले सुधीर पारवे पक्षात गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात. २०१९ व २०२४ अशा दोन विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. पक्षाने त्यांचा पर्याय  कॉंग्रेस- शिवसेना आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या राजू पारवे यांच्या रूपात शोधला. सुधीर पारवे ऐवजी पक्ष राजू पारवे यांना अधिक महत्त्व देऊ लागले. त्यामुळे संतापून सुधीर पारवे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून पक्षात आयात नेत्यांना अधिक महत्त्व द्यायचे असेल तर निष्ठावंतासाठी वेगळा सेल उघडा, पक्षासाठी घाम गाळणा-या कार्यकर्त्यांच्या छातीवर बाहेरच्यांना बसवणार का? असा सवाल केला. जिल्हा कार्यकारिणीत राजू पारवे यांच्या समर्थकांचा भरणा अधिक असल्याने ही नाराजी होती.

पारवे विरुद्ध पारवे

२०१९ मध्ये राजू पारवे कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. पण त्यांची जवळिक कायम फडणवीस यांच्या सोबतच होती.त्यामुळे ते भाजपमध्ये जातील व रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशीच चर्चा होती. पण शिवसेनेने रामटेकची जागा भाजपला सोडले नाही.त्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून राजू पारवे शिवसेनेत गेले व २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली, परंतु पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षात घेतले. याला विरोध होता पण तो दडपून  त्यांना पक्षात घेऊन त्याना महत्त्व देणे सुरू केले. त्याची परिणती निष्ठावंतामध्ये असंतोष निर्माण होण्यात झाली.

सावनेरमध्येही नाराजी

कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचे कट्टर समर्थक मनोहर कुंभारे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन सहा महिने झाले नाही तर लगेच त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले त्यामुळे सावनेर भाजपमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे कुंभारे यांनी पक्षाची सुत्रे स्वीकारतात निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवरच कारवाई सुरू केली. केदार यांना शह देण्यासाठी भाजपने कुंभारे यांना पक्षात घेतले. त्यांच्या कार्यशैलीमुळे जुने भाजप नेते नाराज झाले आहेत. कुंभारे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून पक्षाचे ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष अॅड प्रकाश टेकाडे यांना पक्षातून निष्कासित केले.

टेकाडे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. ते भाजपकडून कुंभारे यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झाले आहेत. कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता, माझे म्हणणे ऐकून न घेता कारवाई करण्यात आली, असा टेकाडे यांचा दावा आहे. आयात नेत्यांच्या पाठीशी कोण?
उमरेड आणि सावनेर मतदार संघातील निष्ठावंताच्या नाराजी मध्ये एक धागा समान आहे. तो म्हणजे ते ज्या नेत्यांबाबत आक्षेप आहेत ते बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना पक्षात आले. बावनकुळे कुठलाही निर्णय फडणवीस यांच्या संमती शिवाय घेत नाही. त्यामुळे राजू पारवे असो किंवा मनोहर कुंभारे यांना आवर घालण्याची हिमंत कोणी दाखवत नाही.