Discord in Lalu Prasad Yadav Family : तेजस्वी यादव यांचे सल्लागार संजय यादव यांच्या वाढत्या हस्तक्षेपावरून राष्ट्रीय जनता दल पक्षात पुन्हा मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले. पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून लालूंसह त्यांचे बंधू तेजस्वी यादव यांना अनफॉलो केल्यानंतर हे मतभेद उघड झाले. गेल्या आठवड्यात लालूंच्या सात मुलींपैकी द्वितीय असलेल्या रोहिणी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट तेजस्वी यादव यांच्या बिहार अधिकार यात्रेतील एका घटनेवर टीका करणारी होती. या पोस्टमधील एका फोटोत संजय यादव हे यात्रेदरम्यान बसच्या पहिल्या सीटवर बसल्याचे दिसून आले. याच घटनेमुळे रोहिणी यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी संजय यादव यांना अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केले.

लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यांच्यासाठी ही पहिल्या क्रमांकाची सीट असून, त्यांच्या अनुपस्थितीत ती रिकामी ठेवली जावी, असे रोहिणी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले. वास्तविक ही पोस्ट राष्ट्रीय जनता दल पक्षाचे कार्यकर्ते आलोक कुमार यांनी शेअर केली होती. “समोरील सीट नेहमीच पक्षातील सर्वोच्च नेतृत्वासाठी राखीव असते. नेते उपस्थित नसले तरी त्यावर कोणीही बसू नये; पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःला मोठं समजण्याचा गैरसमज होतो, तेव्हा वेगळाच प्रकार घडतो. लालू प्रसाद किंवा तेजस्वी यादव यांनाच त्या सीटवर बसलेले पाहण्याची सवय बिहारच्या जनतेसह आरजेडीच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. त्यामुळे इतर कुणीही त्या सीटवर बसलेले आम्हाला सहन होत नाही. मात्र, स्वत:ला अद्वितीय रणनीतिकार, सल्लागार व तारणहार म्हणणाऱ्या चापलुसांवर आम्ही भाष्य करू शकत नाही,” असे आलोक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादंग?

राष्ट्रीय जनता दलातील एका सूत्राने सांगितले की, रोहिणी यांनी ही टीका करणारी पोस्ट पुन्हा शेअर केल्यानंतर लालूंच्या कुटुंबात मोठा वादंग निर्माण झाला. संजय यादव यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्यामुळे रोहिणी यांना टीकेला सामोरे जावे लागले. सारवासारव करण्यासाठी त्यांच्यावर दबावही आणण्यात आला. या वादावर पडदा टाकण्यासाठी पक्षाने दलित नेते शिव चंद्र राम आणि रेखा पासवान यांना यात्रेदरम्यान बसच्या पुढील सीटवर बसवले. त्यामुळे रोहिणीला बचावासाठी संधी मिळाली आणि त्यांनी गेल्या गुरुवारी त्या संदर्भात पुन्हा एक्सवर पोस्ट शेअर केली. “वंचित आणि सामाजिक स्तरातील सर्वांत खालच्या पायरीवरील लोकांना पुढे आणण्याचे आरजेडीचे प्रयत्न राहिलेले आहेत. लालू प्रसाद यांच्या सामाजिक-आर्थिक न्यायाच्या मोहिमेचे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या समाजातील व्यक्तींना पुढील सीटवर बसलेले पाहून समाधान वाटते,” असे रोहिणी यांनी पोस्टमध्ये म्हटले.

आणखी वाचा : Visual Storytelling : महायुती सरकारची चोहोबाजूने कोंडी, कारण काय? राज्यात नेमकं काय घडतंय?

रोहिणी आचार्य कोण आहेत?

रोहिणी आचार्य यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले असून, त्यांची मोठी बहीण मीसा भारतीप्रमाणेच त्याही डॉक्टर आहेत. २०२२ मध्ये वडिलांना किडनी दान केल्यानंतर रोहिणी चर्चेत आल्या होत्या. सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यार्पणाची ही शस्त्रक्रिया झाली होती. पाटण्यात परतल्यावर लालू प्रसाद यांनी रोहिणीचे कौतुक केले होते. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत लालूंनी सारण लोकसभा मतदारसंघातून रोहिणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपाचे विद्यमान खासदार व माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी त्यांचा अत्यंत कमी मताधिक्याने पराभव केला.

राजकीय महत्त्वाकांक्षेच्या कथित आरोपांवरून ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागल्यानंतर रोहिणी यांनी आपले मत स्पष्ट केले. २०२२ मधील सिंगापूरमधील रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जातानाचा एक व्हिडीओ पुन्हा शेअर केला. त्यानंतर त्यांनी लालू प्रसाद व तेजस्वी यादव यांच्यासह अनेकांना अनफॉलो केले. सध्या त्या फक्त तीन अकाउंट्स फॉलो करतात, ज्यामध्ये पती समरेश सिंग, उर्दू कवी राहत इंदोरी आणि एका वृत्तपत्राचा समावेश आहे. रविवारी रोहिणी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक सूचक पोस्ट शेअर केली.

रोहिणी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

“माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या सर्व अफवा निराधार आहेत. माझी बदनामी करण्यासाठी हा एक घृणास्पद कट असून, त्यामागे अनेकांचे कट-कारस्थान आहे. माझ्या कोणत्याच राजकीय महत्त्वाकांक्षा नसून भविष्यातही राहणार नाहीत. मी कधीही आमदार किंवा खासदार होण्याची आकांक्षा बाळगली नाही. मला राज्यसभा सदस्य व्हायचे नाही आणि माझी कुटुंबातील कोणत्याही सदस्याबरोबर स्पर्धा नाही. पक्षात किंवा भविष्यातील सरकारमधील कोणत्याही पदांबाबत माझा आकस राहणार नाही. आई-वडिलांबद्दलची निष्ठा आणि कुटुंबाची प्रतिष्ठा हाच माझ्यासाठी स्वाभिमानाचा सर्वोच्च मुद्दा आहे,” असे रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

दरम्यान, रोहिणी यांच्या पोस्टवर आणि आरजेडीतील वादावर लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कुटुंबापासून दुरावलेले रोहिणी यांचे भाऊ आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी या पोस्टचे समर्थन केले. माझ्या बहिणीने खूप महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले असून, तिच्या चिंता योग्य असल्याचे तेज प्रताप यांनी म्हटले आहे. दरम्यान, तेज प्रताप यांनी संजय यादव यांच्या पक्षातील वाढत्या प्रभावाबाबत काळजी व्यक्त केली असली तरी त्यांचे थेटपणे नाव घेणे टाळले.

हेही वाचा : BJP Strategy of BMC Election : भाजपासमोर कोणकोणती आव्हानं? ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाला फटका? अमित साटम काय म्हणाले?

कोण आहेत संजय यादव?

राष्ट्रीय जनता दलाचे विद्यमान राज्यसभा खासदार असलेले संजय यादव हे मूळ हरियाणाचे रहिवासी आहेत. २०१२ मध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संजय यांची भेट तेजस्वी यादव यांच्याबरोबर करून दिली होती. तेजस्वी यांच्या राजकीय पदार्पणात आणि त्यांना राजकीय क्षेत्रात तयार करण्यात संजय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी तेजस्वी यांना समाजवादी साहित्यात परिचय करून दिला आणि माध्यमांबरोबर संवाद साधण्यासाठी प्रशिक्षणही दिले. २०२० पर्यंत संजय यादव आणि राज्यसभा खासदार मनोज कुमार झा हे दोघेही राष्ट्रीय जनता दलाच्या सत्ता संरचनेत एकसमान मानले जात होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत संजय हे पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या पुढे निघून गेले आहे. सध्या तेजस्वी यांच्या जवळजवळ सर्व बैठका आणि माध्यमांशी होणारा त्यांचा संवाद हा संजय यांच्या माध्यमातूनच होतो. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी लालूंचे पुत्र तेजप्रताप हे त्यांच्यापासून दुरावले होते. आता त्यांना किडनी दान करणाऱ्या रोहिणीदेखील कुटुंबापासून दुरावणार का? अशी चर्चा बिहारमध्ये सुरू आहे.